तुमचा आम आदमी पक्षाला पाठिंबा आहे.. ‘आप’ला आर्थिक मदत करायचीही तुमची तयारी आहे.. मात्र, मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कशी हा तुमच्यापुढील प्रश्न असेल तर त्याचे उत्तर येथे आहे. तुम्ही फक्त तुमच्या हातातील मोबाइलद्वारे ‘आप’ला निधी पोहोचता करायचा आहे. तुम्हाला एकदम मोठी रक्कम देणे परवडत नसेल तर दर महिन्याला ठरावीक रक्कम देण्याची तरतूदही आहे. पक्षासाठी निधी गोळा करण्याच विविध पर्यायच आम आदमी पक्षाने इच्छुकांपुढे सादर केले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भरघोस मते मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला दिल्लीत सत्ता काही राबवता आली नाही. असे असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात त्यांनीच आघाडी घेतली आहे. आता पक्षासाठी निधी जमवण्यासाठीही विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. इच्छुक देणगीदारांना पक्षाला देणगी द्यायची असेल तर त्यांना फारसा त्रास पडू नये यासाठी मोबाइलद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची योजना त्यापैकीच एक. मोबाइलद्वारे निधी हस्तांतरित करता यावा यासाठी आम आदमी पक्षाने एअरटेलशी संधान साधले असून त्यांची एअरटेल मनी ही सेवा त्यासाठी घेण्यात येणार आहे. केवळ दिल्लीतीलच नव्हे तर देशभरातील देणगीदारांना ही सुविधा प्राप्त व्हावी यासाठी व्होडाफोनशीही चर्चा सुरू असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे निधी संकलक कुमार गौरव यांनी स्पष्ट केले.
देणगीदारांना निधी हप्त्याहप्त्याने द्यायचा असेल तर तीही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम आदमी पक्ष प्रयत्नरत आहे. अनेकांनी आमच्याकडे त्यासाठी विचारणा केल्याचे गौरव म्हणाले. मोठय़ा रकमेऐवजी देणगीदारांना थोडीथोडी ठरावीक रक्कम आम आदमी पक्षाकडे सुपूर्द करायची असेल तर त्यासाठी आम्ही एटीएमद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे गौरव यांनी सांगितले. एखाद्या इच्छुकाची सर्व माहिती आमच्या संकेतस्थळावर साठवली जाईल व त्याच्या खात्यातून महिन्याच्या विशिष्ट तारखेला ठरावीक रक्कम पक्षाच्या निधीकडे वळती केली जाणार आहे.

केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर पक्षनिधीत वाढ
पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या देणगीदारांमध्ये वाढ झाल्याची नोंद आहे. केजरीवालांनी १५ फेब्रुवारीला राजीनामा दिला त्या दिवशी पक्षाच्या खात्यात २७ लाख रुपयांचा निधी जमा झाला. यापूर्वी त्याची दिवसाची सरासरी तीन ते चार लाख होती. मंगळवापर्यंत पक्षाकडे साडेनऊ कोटींचा निधी जमा झाला होता. त्यातील निम्म्याहून देणग्या इंग्लंड, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, हाँगकाँग व सिंगापूरस्थित अनिवासी भारतीयांकडून जमा झाली आहे.