मुस्लिमांनो जातीयवादी व्हा, असे वक्तव्य करणाऱ्या आपच्या शाझिया इल्मी यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. विरोधकांच्या टीकेसह स्वपक्षानेदेखील हात वर केल्यामुळे आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचे सांगत शाझिया इल्मी यांनी बुधवारी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
अनौपचारिक गप्पांच्या ओघात केलेल्या आपल्या वक्तव्याचा चुकीचा रंग देऊन वातावरण तापवण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहेत. आपल्या विधानाचा उद्देश धार्मिक द्वेष पसरविण्याचा नव्हता तर कुणाचेही मिंधे होऊ नका असे आपल्याला म्हणायचे होते. निवडणुकीत आपला वापर होऊ नये म्हणून अधिक धर्मनिरपेक्ष होऊ नका, स्वतच्या फायद्यासाठी जातीयवादी व्हा आणि मतदान करा, असे आपण म्हटले होते, असे इल्मी यांनी सांगितले.
‘आदर्शवादाचा बुरखा फाटला’
आम आदमी पक्ष स्वतला धर्मनिरपेक्ष म्हणून लोकांसमोर मांडत असला तरी त्यांची भूमिका ही प्रसिद्धी आणि मते मिळवण्याचीच आहे. त्यामुळे मते मिळवण्यासाठी जातीयवादाचा आधार घेणाऱ्या आपचा आदर्शवादाचा बुरखा फाटला आहे. शाझिया इल्मी यांचे नाव न घेता जेटली म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष वा पक्षाचा प्रतिनिधी खासगीतही अशा प्रकारचे वक्तव्य करीत नाही. आप उमेदवाराचे हे वक्तव्य त्यांची मानसिकताच दाखवून देते. अशा वक्तव्याने  आदर्शवादाचा जो भ्रम निर्माण केला होता, तो दूर झाला आहे,अशी टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केली आहे.
आपनेही हात झटकले
शाझिया इल्मी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर आपनेही नाराजी व्यक्त करीत हात झटकले आहेत. पक्षाच्या सर्व सदस्यांनी बोलताना भान राखावे तसेच असे कोणतेही विधान करू नये, ज्यामुळे वाद निर्माण होतील, अशी सूचना पक्षाने ट्विटरवरून केली आहे.