आम आदमी पक्षाचे मार्गदर्शक शांती भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वगुणांबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा, असे मत पक्षाच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनी व्यक्त केले आहे. शांती भूषण हे ‘आप’साठी दिशादर्शक आहेत. त्यांचे मत हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असे इल्मी यांनी सांगितले. पक्षात अंतर्गत लोकशाही हवीच. ही बाब मी वेळोवेळी मांडली होती. आता शांती भूषण पक्षाच्या व्यासपीठावर त्या मांडण्याचा प्रयत्न करतील, असे इल्मी यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी विधेयक लोकसभेत मंजूर
देशातील पदवीधरांच्या कौशल्य विकासास प्रोत्साहन देणारे अ‍ॅप्रेंटिस अर्थात प्रशिक्षणार्थी विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. देशातील अभियांत्रिकीव्यतिरिक्त अन्य पदवीधारक आणि पदविकाधारकांना प्रशिक्षित करून देशातील कुशल मनुष्यबळ विकसित करण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.सदर विधेयकास कामगार संघटनांनी विरोध केला होता; तर संसदेच्या स्थायी समितीकडे सदर विधेयक पाठविले जावे, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून केली जात होती. मात्र, आवाजी मतदानाने हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.