यूपीए सरकारने नियुक्त केलेल्या काही राज्यांच्या राज्यपालांना पदावरून हटविण्याच्या हालचालींना आता हळूहळू वेग येऊ लागला आहे. गेल्या सरकारने नियुक्त केलेले राज्यपाल पदावरून पायउतार झाले की त्यांच्या जागेवर भाजपच्या काही ज्येष्ठांची वर्णी लावण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी यापूर्वीच राजीनामा दिला असून अन्य अनेक राज्यपालांना पायउतार होण्यास सांगण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. सत्तारूढ पक्षाने नव्या राज्यपालांच्या नावांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. एकदा ही यादी अंतिम झाली की राज्यपालांना पायउतार होण्यास सांगण्यात येणार आहे, असे कळते.
एकूण किती राज्यांचे राज्यपाल बदलण्यात येणार आहेत, असे विचारले असता सूत्रांनी किमान १० राज्यपाल बदलण्याचे संकेत दिले. गोव्याचे राज्यपाल बी. व्ही. वांछू यांना प्रदेश भाजपने लक्ष्य केले असून मंगळवारी त्यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. राजनाथसिंह यांच्या भेटीनंतर वांछू यांनी पत्रकारांना टाळले. हरयाणाचे राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांनीही गृहमंत्र्यांची भेट घेतली.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन हे राज्यपालपदासाठी इच्छुक असून त्यांनीही मंगळवारी गृहमंत्र्यांची भेट घेतली. एनडीए सरकारच्या दबावामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे अश्वनीकुमार (नागालॅण्ड) आणि एम. के. नारायणन (पश्चिम बंगाल) यांनी केंद्र सरकारला कळविले आहे.

राज्यपालांच्या मुद्दय़ावर केंद्राचा हस्तक्षेप नाही -अल्वा
जयपूर:राज्यपालांच्या मुद्दय़ावर केंद्र सरकार कोणताही हस्तक्षेप करीत नाही, असे राजस्थानच्या राज्यपाल मार्गरेट अल्वा यांनी स्पष्ट केले. याबाबत कुठलाच मुद्दा नसल्याचे त्यांनी सांगितले.काही राज्यपालांनी मुदतीपूर्वीच राजीनामे दिले आहेत. माझी राज्यपालपदाची मुदत ५ ऑगस्टला संपत आहे.