नक्षलवाद्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही आणि त्यांनी हल्ला केल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले होते ते बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी अमान्य केले आहे.
राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत नाही, बंदुकीच्या जोरावर नक्षलवादाचा प्रश्न सोडविता येणार नाही, तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत. समाजाचा सर्वसमावेशक विकास हाच त्यावर एकमेव तोडगा आहे, असेही मांझी यांनी म्हटले आहे.
सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाचा अभाव आणि बेरोजगारी त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायामुळे नक्षलवाद फोफावत चालला आहे. त्याचे उत्तर केवळ विकासावरच अवलंबून आहे, असेही मांझी म्हणाले.
नक्षलवादाचा प्रश्न आपोआपच मिटला जाईल, असा बिहारमध्ये विकास करावयाचा आहे, विकासाची गंगा झोपडपट्टय़ांपर्यंत गेल्यास नक्षलवाद निश्चितपणे संपुष्टात येईल, असेही मांझी म्हणाले.
नक्षलवादी जर निष्पापांवर असेच नृशंस हल्ले करणार असतील तर त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांना तोडीस तोड उत्तर द्या. आणि अग्रसक्रियतेने नक्षलवाद्यांचा प्रश्न हाताळा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी दिल्या होत्या.