लोकसभा निवडणुकीत पाच-सहा जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीच्या जागा वाटपात फक्त एकच आणि तोही शिवसेना व भाजपला अडचणीचा ठरणारा सातारा मतदारसंघ देण्यात आला. विशेष म्हणजे सेनेच्या या मतदारसंघात आरपीआयच्या नावाने भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. अशी ही साताऱ्याची आणि रामदास आठवले यांच्या राजकारणाची तऱ्हा आहे.  
रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केल्याने लोकसभेची एकही जागा देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला. आता प्रश्न राहिला फक्त शिवसेनेचा. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठवले यांच्याशी चर्चा न करताच रिपाइंला सातारा मतदारसंघ सोडण्यात आल्याचे जाहीर करून टाकले. त्याव्यतिरिक्त आता आठवले यांना काहीही मिळणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे सातारा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला. या संदर्भात शिवसेना भवनात सोमवारी झालेल्या बैठकीला सेनेचे सुभाष देसाई, अनिल देसाई व दिवाकर रावते आणि रिपाइंतर्फे रामदास आठवले, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, भूपेश थूलकर उपस्थित होते. साताऱ्यातून उमेदवारी मागण्यासाठी सेनेचे तीन पदाधिकारी आले होते. मात्र त्यांनी धनुष्यबाण चिन्हाची मागणी केली. त्याला सेना नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे रिपाइंचा उमेदवार म्हणून भाजपच्या वर्षां मालगुडकर यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील. म्हणजे मतदारसंघ सेनेचा, सोडली जागा रिपाइंला आणि लढणार भाजप. अर्थात त्यासाठी राबणार रिपाइंचेच कार्यकर्ते. अशा प्रकारे एका व अडचणीच्या मतदारसंघावर रिपाइंची बोळवण केली जात असेल तर, मग काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप यांच्यात काय फरक, असा सवाल रिपाइंचे कार्यकर्ते करीत आहेत.