भाजप आणि मनसेत छुपी युती झाली असून, शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची दोघांची योजना आहे. अशा वेळी युतीत शिवसेना किती काळ अपमान सहन करणार, असा सवाल करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढविण्याचा प्रयत्न केला.
भाजप नेत्यांच्या भेटीमुळेच मनसेने शिवसेनेचे उमेदवार असलेल्या बहुतांशी मतदारसंघातच उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचा पराभव व्हावा हा मनसेचा प्रयत्न असून, त्याला भाजपची फूस आहे. शिवसेनेला एकटे पाडून भविष्यात मनसेला बरोबर घेण्याची भाजपची योजना दिसते, असे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, पण शिवसेनेला चुचकारण्याचे ऐवढे कारण काय, या प्रश्नावरील उत्तर मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळले.
 गेल्या दहा वर्षांंमध्ये आघाडीतील दोन पक्षांमध्ये कधी नव्हती तेवढी चांगली एकवाक्यता निर्माण झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला गेल्या वेळच्या तुलनेत यंदा चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला. मात्र नारायण राणे यांनी राष्ट्रवादीबद्दल केकेली टीका किंवा काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने असहकार्याची घेतलेली भूमिका याकडे लक्ष वेधले असता ४८ पैकी चार ते पाच मतदारसंघांमध्ये काही तक्रारी असून कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. मोदी यांची लाट राज्यात कोठे दिसत नाही. भाजपचा जाहीरनामा म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासनांची उचलेगिरी आहे. विकासाचा मुद्दा प्रभावी ठरत नसल्यानेच भाजपने आता राम मंदिर, हिंदुत्व हे मुद्दे कार्यक्रमपत्रिकेवर आणले आहेत असा आरोपही त्यांनी केला.