भाजप द्वेषाचे राजकारण करत असून, गुजरातचे प्रारूप देशभर लागू करणे अशक्य आहे. एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला लढवत ठेवण्याची भाजपची नीती असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आसाममधील दौऱ्यात प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली.
भाजपच्या विजयाचा आभास निर्माण केला जात असून, २००४ आणि २००९ मध्ये असेच चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र त्या वेळी काँग्रेसने विजय मिळवला होता याची आठवण राहुल यांनी करून दिली. हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात झुंजवणे आणि गरीब विरुद्ध श्रीमंत असा संघर्ष निर्माण करणे हे भाजपच्या राजकारणाचे वैशिष्टय़ असल्याची टीका राहुल यांनी केली. इंडिया शायनिंगसारख्या घोषणांमध्ये ते गरिबांना विसरले. निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. गरिबांना शक्ती देण्यात काँग्रेसचा विश्वास आहे. हाच उपेक्षित वर्ग भाजपचा पराभव करेल असे भाकीत राहुल गांधींनी वर्तवले. अमूलच्या माध्यमातून गुजरात देशाला दूध पुरवत असल्याचा बडेजाव मोदी करतात, मात्र त्यात मोदींचे श्रेय काहीच नाही अशी खिल्लीही राहुल यांनी उडवली. १९५० पासून अमूल अस्तित्वात असल्याचे राहुल यांनी सांगितले. केवळ जाहिरातबाजी करून भाजप त्यांच्या बाजूने वातावरण असल्याचे दाखवून देत आहे. मात्र जनता त्यांना पराभूत करुन जागा दाखवून देईल असे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर लालूंसोबत जाणार?
बिहारमध्ये पुढील आठवडय़ात राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत. लालूप्रसाद यांच्या राजदशी काँग्रेसची युती असली तरी लालूंसमवेत ते व्यासपीठावर येणार काय हे स्पष्ट झालेले नाही. राहुल औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. तर लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्या सासाराम मतदारसंघात सोनियांची तीन एप्रिलला सभा होणार आहे.