लोकसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेसला भलताच वर्मी लागला असतानाच या पराभवाचा आढावा घेताना भिवंडीतील पदाधिकारी बुधवारी आमनेसामने आले आणि त्यातून बाचाबाची आणि शिवीगाळ करण्यात आली. पराभूत उमेदवाराचे समर्थक माजी खासदाराच्या अंगावर धावूनही गेले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पक्षाच्या टिळक भवन मुख्यालयात पराभवाचा मतदारसंघनिहाय आढावा बुधवारपासून सुरू केला. पहिल्या दिवशी सात मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. भिवंडी मतदारसंघाचा आढावा पूर्ण झाल्यावर कार्यकर्ते खाली आले आणि नगरसेवक इम्रान खान यांनी माजी खासदार सुरेश टावरे यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले. याआधी महापौर निवडणुकीत विरोधकांना मदत केली आणि आता पक्षशिस्तीच्या गप्पा कसल्या मारता, असा सवाल करीत खान हे टावरे यांच्या अंगावर धावून गेले. त्याचवेळी माजी महापौर जावेद दळवी आणि शहर अध्यक्ष गुड्डू खान यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. आपल्याला उमेदवारी दिली असती तर लाखभर मताने विजयी झालो असतो, असे टावरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असता काही कार्यकर्ते टावरे यांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा हाणामारी आणि शिवीगाळ झाली. गोंधळ लक्षात येताच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. भिवंडीतील पक्षांतर्गत वादाचे जुने हिशेब परस्परांनी चुकते केले.
वाद टाळण्यासाठी तोंडी नको, लेखी द्या
पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येऊ नये म्हणून पक्षातर्फे खबरदारी घेण्यात आली होती. कोणाविरुद्ध काही तक्रार, पक्षांतर्गत वाद यावर काहीही भाष्य न करता ते सारे लेखी स्वरूपात देण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या. ठरावीक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत एकमेकांच्या विरोधातील वाद चव्हाटय़ावर येण्याची शक्यता होती. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीकरिता कोणती व्यूहरचना करता येईल याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. पक्षांतर्गत तक्रारी लेखी स्वरूपात स्वीकारून वाद टाळण्यात आला असला तरी भिवंडीतील कार्यकर्ते परस्परांना भिडलेच. चंद्रपूर मतदारसंघातील आढावा बैठकीतही धुसफूस झाली. पुण्यात पक्षाच्या नेत्यांची आपल्याला मदत झाली नाही, अशी भूमिका विश्वजित कदम यांनी मांडली.