लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास अवघे दहा दिवस उरले असताना गुजरातमधील महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नेमणे योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोदीप्रेमाची पुन्हा एकदा प्रचीती दिली आहे. यापूर्वीही गुजरात दंगलीप्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आदर करण्याचे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या मदतीसाठी धावली होती. राष्ट्रवादीला मोदींचे वावडे नाही हेच यातून दाखवण्यात येत असून निकालानंतरच्या समीकरणांचे संकेत त्यातून मिळत आहेत.
नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठीच काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्फत महिलेवरील पाळतप्रकरणी आयोग नेमण्याचे जाहीर केले. त्यानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दूरध्वनी करत या निर्णयाला विरोध केला. तर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर ही बाजू मांडत काँग्रेसवर नेम धरला आणि मोदींना मदतीचा हात दिला.
‘यूपीए २’च्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने काँग्रेसच्या धोरणांवर नापसंती व्यक्त केली आहे. भाजपाने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा मोदीप्रेम प्रकट केले. काँग्रेसने मोंदींवर गुजरात दंगलीबाबत हल्ला चढवताच न्यायालयाच्या निकालाचा आदर राखून याप्रकरणी मोदींवर हल्ला चढवणे गैर असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सूचित केले होते. मोदींचे राष्ट्रवादीला वावडे नाही हेच यातून दाखवून देण्यात आले होते. त्यावरून पवार-मोदी प्रेमाची चर्चा होताच मोदींवर थोडीफार टीका करून राष्ट्रवादीने वेळ मारून नेली. आता पुन्हा तेच झाले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी आयोग नेमण्याच्या निर्णयास विरोध करत एकाच दगडात दोन पक्षी मारले. काँग्रेसवर नेम साधला आणि मोदींशीही सलगी कायम ठेवली.