‘माझ्या क्षमतेचा काँग्रेसमध्ये पुरेपूर वापर झालेला नाही. योग्य वेळी त्याची नोंद घेतली जावी म्हणूनच ही भूमिका मांडत असल्याचे सांगत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर नेतृत्व बदल करायचा झाल्यास आपलाही विचार व्हावा, असेच अप्रत्यक्षपणे शनिवारी सूचित केले.
आपल्या उपयुक्ततेबाबत योग्य वेळी नोंद घेतली जावी म्हणून हे मत मांडले हे राणे यांचे विधान बरेच बोलके आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचा काहीही निभाव लागणार नाही. तसेच आघाडीचे ३५ उमेदवार निवडून येतील, असा दावा राणे यांनी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
निवडणुकीच्या दृष्टीने कोणतेही मुद्दे नसल्याने वडे आणि सूप असे विषय मांडले जात आहेत. राष्ट्रीय निवडणुकीशी काहीही संबंध नसलेले मुद्दे मनसे किंवा शिवसेनेच्या वतीने मांडण्यात येत असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेणारे आमदार विनायक मेटे हे मराठा समाजाचे आहेत का, असा सवालही राणे यांनी केला. राज्याच्या एकूण लोकसंख्येत ३४ टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या समितीने घेतला आणि मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. कोणत्याही घटकाला आरक्षण देण्याकरिता राज्य मागास आयोगाची शिफारस विचारात घ्यावी लागते. या आयोगाने प्रतिकूल मत व्यक्त केले तरीही सरकार अनुकूल निर्णय घेऊ शकते, असे सांगत राणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण लागू करणार हे स्पष्ट केले.
पोलीस अधीक्षकाने नाक खुपसले
सिंधुदुर्ग मतदारसंघात सध्या राणे यांचे पुत्र आणि काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आणलेल्या बलेरो गाडय़ा गाजत आहेत. एकदम १२ गाडय़ा घेतल्याने त्या स्वस्तात मिळाल्या होत्या. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या गाडय़ा आल्या होत्या. पण सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांनी नाक खुपसून हा वाद निर्माण केल्याचा आरोप राणे यांनी केला.
राष्ट्रवादीच्या आमदाराचे असहकार्य
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सावंतवाडीचे राष्ट्रवादीचे आमदार सहभागी झाले वा नाही तरीही निलेशच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा राणे यांनी केला. शरद पवार आणि अजित पवार प्रचारार्थ सिंधुदुर्गमध्ये येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.