अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भरभरून मते देणाऱ्या दिल्लीकरांनी लोकसभा निवडणुकीत मात्र ‘झाडू’ बदलला. पदार्पणातच विधानसभा निवडणुकीत थोडय़ाथोडक्या नव्हे तर २८ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाचा दिल्लीत एकही खासदार निवडून न आल्याने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची मोहिनी दिल्लीकरांवरून उतरली आहे. दिल्लीच्या सातही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याने संस्थगित दिल्ली विधानसभेतदेखील आमदारांची पळवापळवी करून सत्तास्थापनेसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. दिल्ली विधानसभेत भाजपचे संख्याबळ ३२ असून सत्तास्थापनेसाठी त्यांना चार आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या आठपैकी पाच आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करू शकतो. देशात मिळालेल्या जनादेशामुळे काँग्रेसच्या चार आमदारांचे पाठबळ मिळवणे सोपे असल्याचे भाजप नेत्यांना वाटते. त्यामुळे केंद्र सरकारची स्थिरस्थावर झाल्यानंतर दिल्लीत सत्तास्थापनेसाठी ‘मुहूर्त’ काढण्याची भाजपची योजना आहे.
    देशात ‘मोदी’ लाट ‘झाडू’न काढू असा दावा करणारा आम आदमी पक्ष तोंडघशी पडला. आप नेत्या शाजिया इल्मी दिल्लीनजीकच्या गाझियाबाद मतदारसंघातून स्वत:ची अमानत रक्कमदेखील वाचवू शकल्या नाही. अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात कविता करून प्रचार करणारे आप नेते कुमार विश्वास यांचीदेखील अमानत रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, कृष्णा तीरथ, काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन पराभूत झाले आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या भाजप प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी अजय माकन यांचा पराभव केला. दिल्लीत खरी लढत आम आदमी पक्ष व भारतीय जनता पक्षातच होती. दिल्लीत भाजपला ४६.४ तर आम आदमी पक्षाला ३२.९ टक्केमते मिळाली. केंद्रातील सत्तेतून पायउतार झालेल्या काँग्रेसला पंधरा टक्केमते मिळाली.
    विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका न टाळल्याने दिल्लीत काँग्रेसचा पराभव झाला. प्रदेशस्तरावर अरविंदरसिंह लवली यांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्यात आली. मात्र, अजय माकन, कपिल सिब्बल, माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अगरवाल काँग्रेसच्या परस्परविरोधी टोकावर असलेल्या नेत्यांना एकत्र आणण्यात लवली यांना अपयश आले. विधानसभा निवडणुकीत शीला दीक्षित यांच्याविरोधातील राग दिल्लीकरांनी ‘आप’ला जवळ करून केला होता. दिल्लीत बहुसंख्य असलेल्या वाल्मीकी समाजाला आपच्या झाडूने विधानसभा निवडणुकीत भूरळ पाडली होती. परंतु यंदा वाल्मीकी समाजाने ‘झाडू’न कमळाला मते दिलीत. दिल्लीतील रिक्षाचालकांशी भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी थेट संवाद साधून अरविंद केजरीवाल यांचे गारूड उतरवले.
दिल्लीत काँग्रेसकडे नेतृत्वाचा अभाव व भाजपकडे डॉ. हर्षवर्धन यांचे प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर भाजपने दिल्लीत पहिल्यांदाच सातही जागांवर विजय मिळवला आहे. १९९१ मध्ये भाजपने सहा जागांवर विजय मिळवला होता.