मतदानयंत्रातील ‘गडबडी’मुळे नगर लोकसभा मतदारसंघातील हिरडगाव (ता. श्रीगोंदे) येथील एका मतदान केंद्रावर उद्या, रविवारी  फेरमतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार उद्या मतदान केंद्र क्रमांक ३०५ मध्ये फेरमतदान होणार आहे. या केंद्रावर एकूण १ हजार १५४ मतदार आहेत.
आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासनास याची पूर्वसूचना शुक्रवारीच मिळाली होती. प्रत्यक्षात आदेश  शनिवारी आला. त्यानंतर सर्व १३ उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना भल्या पहाटेच निरोप धाडण्यात आले. हिरडगाव येथील मतदानयंत्रात कोणती गडबड झाली होती, याविषयी कवडे यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. यंत्रात तांत्रिक स्वरूपाची अडचण झाल्याने फेरमतदान घेण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी आज दुपारी पत्रकारांना माहिती देताना केला.
१७ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या दिवशी जिल्हय़ात तांत्रिक बिघाडामुळे एकूण ११ केंद्रांतील यंत्रे बदलली गेली होती. त्यात हिरडगावचा समावेश होता, परंतु ११ पैकी केवळ हिरडगाव येथेच फेरमतदान घेण्याचा आदेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. १७ एप्रिल रोजी हिरडगाव येथे मतदान केंद्र क्र. ३०४ व ३०५ अशी दोन मतदान केंद्रे होती. क्र. ३०५ मध्ये ९४ जणांनी मतदान केल्यानंतर कोणीतरी मतदान केंद्राध्यक्षांकडे ‘कमळ चिन्हाचे बटण दाबताच घडय़ाळ चिन्हापुढील लाल दिवा लागतो’ अशी तक्रार केली होती. त्यानंतर तेथील यंत्र बदलले
गेले.
नंतर तेथील यंत्रात १ हजार १५४ मतदारांपैकी एकूण ७९५ मतांची नोंद झाली. यंत्रातील या गडबडीबद्दल कोणीही लेखी तक्रार केली नाही, परंतु प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे पाठवला होता असे कवडे यांनी सांगितले.
यंत्रणेचीही धांदल!
हिरडगावला फेरमतदान घेण्यासाठी प्रशासनात मोठी धांदल उडाली होती. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुपारी बैठक झाली. उमेदवारांच्या प्रतिनिधींना निमंत्रण पाठवून येथे ‘मॉकपोल’ घेण्यात आले. मतदानाची दवंडी, फलक लावण्याची, रिक्षातून आवाहन करण्याचे आदेश देण्यात आले. संरक्षणात पोलिस व्हॅनमधून मतदान यंत्रे तेथे पाठवली गेली. शनिवारी सकाळीच मतदार स्लिपची छपाई करून घेण्यात आली व दुपारी त्याचे गावात वाटप सुरू करण्यात आले.