बडोद्यात विक्रमी मतदानाची नोंद व्हावी यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्याला पारितोषिक जाहीर केले आहे. आपल्या मतदान केंद्रात ९० टक्क्य़ांहून अधिक मतदानाची जो अधिकारी नोंद करील, त्याला विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
गुजरातमधील २६ लोकसभा मतदारसंघांत ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ज्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी ९० टक्क्य़ांहून अधिक असेल तेथील अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी विनोद राव यांनी सांगितले.
मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ६.५ लाख घरांमध्ये जाऊन जवळपास २२ लाख मतदारांकडून, आम्ही मतदान करणारच, असे संकल्प-पत्र मिळविले आहे, असे राव यांनी सांगितले. या मतदारसंघातील विधानसभेच्या १० मतदारसंघांपैकी सात मतदारसंघ बडोदा लोकसभा मतदारसंघात येत आहेत.