भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री बेणीप्रसाद वर्मा यांना महागात पडले आह़े  त्यांच्याविरोधात या प्रकरणी शनिवारी सकाळी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जी व्यक्ती हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव करते आणि त्या दोन समाजांत तेढ निर्माण करते ती व्यक्ती मनुष्य नसून राक्षसच आहे, असे वक्तव्य बेणीप्रसाद यांनी मसकानवा येथील जाहीर सभेत शुक्रवारी रात्री केले होत़े  मोदी यांनी ते मनुष्यप्राणी आहेत की नाहीत हे स्पष्ट करावे, असेही वर्मा या वेळी म्हणाले.
मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू नये, अशी समज दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने बेनीप्रसाद वर्मा यांना दिली होती. वादग्रस्त वक्तव्य केल्यास प्रचार करण्यावर बंदी घालावी लागेल, असा इशाराही आयोगाने वर्मा यांना दिला होता. तरीही त्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल़े

रामदेवांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश
 काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल मधुचंद्राचे विधान करणारे योगगुरू रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्या वक्तव्यात दलितांचा अवमान झाल्याचे याचिकाकर्ते विजय राव यांनी म्हटले आहे. त्यावर महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले.