निवडणूक आयोगासारखी घटनात्मक संस्था अतिशय निःपक्षपातीपणे आपला कारभार करीत असल्याचे स्पष्ट करून मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी केलेला आरोप फेटाळून लावला. मोदी यांचे नाव न घेता कोणत्याही राजकीय नेत्याने घटनात्मक संस्थांवर नाजूक प्रसंगी टीका करताना काळजी घेतली पाहिजे, अशीही अपेक्षा संपथ यांनी व्यक्त केली.
मोदी यांनी गुरुवारी सकाळी आझमगढमधील जाहीर सभेत निवडणूक आयोगावरच टीका केली होती. निवडणूक आयोग पक्षपातीपणे आपला कारभार करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने लगेचच गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. मात्र, हे उत्तर देताना त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाव घेणे टाळले. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या टप्प्यात तीन हजार जाहीर सभांना परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही नेत्यांच्या जाहीर सभेला परवानगी देताना सुरक्षेचाही विचार करावा लागतो, असेही संपथ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर निवडणूक आयोग निःपक्षपातीपणे आपला कारभार करीत आहे. आमच्याकडे येणारी प्रत्येक तक्रार नोंदवून घेतली जात असून, त्याची चौकशी करून मगच संबंधितांवर कारवाई केली जात असल्याचे संपथ यांनी सांगितले.