लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी विविध आश्वासनांची खरात असलेला पक्षाचा जाहीरनामा सादर केला. सर्वाना आरोग्याचा अधिकार त्याचबरोबर घरे आणि निवृत्तिवेतन या संदर्भातील विविध घोषणा काँग्रेसने या जाहीरनाम्याद्वारे केल्या आहेत. देशभरातील ८० कोटी मध्यमवर्गीय आणि दारिद्रय़रेषेखालील जनतेसाठी लाभदायक योजना या जाहीरनाम्यात आहेत, असे काँग्रेसकडूनच सांगण्यात आले.
जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे :

*सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षांत १० कोटी युवकांना प्रशिक्षण व रोजगार
*अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण
*एससी-एसटीच्या उत्थानासाठी विशेष योजना व त्यांना कायद्यान्वये सामाजिक सुरक्षा देणार
*सामाजिक सुरक्षिततेचा हक्क
*भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा हक्क, रोजगाराचा हक्क
*आरोग्याचा हक्क. मोफत औषधांची मात्रा वाढवणार. दरडोई उत्पन्नापैकी तीन टक्के आरोग्य सेवांवर खर्च करून जागतिक दर्जाची सेवा
*काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार
*नव्या सरकारसाठी १०० दिवसांचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम
*सत्तेत आल्यास वर्षभरात प्रत्यक्ष करसंहिता विधेयक  लोकसभेत सादर करणार
*सच्चर समितीच्या अहवालावर कार्यवाही
*महिलांवरील अत्याचार प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालये स्थापणार
*प्रमुख शहरे, मोठय़ा खेडय़ांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करणार.
जनतेची फसवणूक करणारा जाहीरनामा – भाजपची टीका
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सादर केलेल्या जाहीरनाम्यावर भाजपने कडाडून टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘फसवी कागदपत्रे’ अशा शब्दात भाजपने टीकास्त्र सोडले. हा जाहीरनामा जनतेचा अवमान करण्यासारखा आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने गेल्या १० वर्षांपासून जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र ती पूर्ण करण्याऐवजी सरकारने जनतेला ठेंगा दाखवला. अर्थव्यवस्था ढासळलेली असताना हे नेते देशाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र वाढता भ्रष्टाचार रोखावा यासाठी हे नेते काहीच प्रयत्न करीत नाहीत,  वीजपुरवठय़ाचे आश्वासन यापूर्वी काँग्रेसने दिले होते. मात्र सध्या अनेक ठिकाणे अंधारात बुडालेली आहेत, अशी टीका रविशंकर यांनी केली.