नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानंतर मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन चर्चेत आल्या आहेत. मोदींपासून त्या स्वतंत्र रहात असल्या तरी आपला पती पंतप्रधान व्हावा यासाठी त्या प्रार्थना करत आहेत. मोदी पंतप्रधान होईपर्यंत भात न खाण्याची तसेच अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतल्याचे त्यांचे बंधू कमलेश यांनी सांगितले. आपली ही इच्छा पुर्ण व्हावी यासाठी त्या चार धाम यात्रेवर जाणार आहेत. उत्तर गुजरातमधील महेसाणा जिल्ह्य़ातील इश्वरवाडा या छोटय़ा खेडय़ात दोन भावांसह त्या रहातात. त्यांचे रहाणीमान साधे असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. सकाळी लवकर उठून त्या मंदिरात जातात. त्यानंतर वृत्तपत्रवाचन करतात. त्या शांत स्वभवाच्या असून मोदींविषयी कोणी वाईट बोलले तर त्यांना ते खपत नाही. वयाच्या १७ वर्षी त्यांचा मोदींशी विवाह झाला होता.
सिब्बल यांच्याकडून कारवाईची मागणी
वैवाहिक स्थितीबाबत नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये तथ्ये लपवल्याचा आरोप काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या संदर्भात मोदींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मोदींनी २००२ ते २०१२ दरम्यान लढवलेल्या निवडणुकांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये त्यांनी वैवाहिक स्थितीबाबत माहिती दिली नसल्याचे सिब्बल यांनी सांगितले. देशापासून त्यांनी वस्तुस्थिती दडवल्याचे सिब्बल यांनी सांगितले.