वाराणसीच्या रोड शोमध्ये कृपाशंकर सिंह सहभागी
भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या वल्गना करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाराणसीत मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची मदत घ्यावी लागली. वाराणसीत काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या रोड शोदरम्यान कृपाशंकर सिंह राहुल गांधी यांच्याच वाहनात उपस्थित होते. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या बरोबरीने कृपाशंकर सिंह अभिवादन स्वीकारत होते. कृपाशंकर सिंह यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कृपाशंकर सिंह यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती. तेच कृपाशंकर सिंह राहुल गांधी यांच्या वाहनातून दिमाखात फिरत होते.
मुंबईत असले तरी कृपाशंकर सिंह उत्तर भारतीयांचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना वाराणसीत पाचारण करण्यात आले. भ्रष्टाचारी राजकारण्यांना वाचविण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून फेकला होता. एवढेच नव्हे तर आदर्श सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही फेरचौकशीचे आदेश राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी दिले होते. प्रत्यक्षात राहुल गांधी यांनीच भ्रष्ट नेत्यांना थारा दिला आहे. कृपाशंकर सिंह यांना रोड शोदरम्यान वाहनात बसवून राहुल गांधी यांनी स्वत:च भ्रष्टाचार निर्मूलन कार्यक्रमास हरताळ फासला आहे.
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी झालेल्या ‘रोड शो’ला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधीदेखील वाराणसीच्या रस्त्यावर उतरले. निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू झालेल्या रोड शोदरम्यान राहुल गांधी यांचे वाराणसीच्या चौका-चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ो प्रारंभापासून राहुल यांच्यासमवेत कृपाशंकर सिंह उपस्थित नव्हते. रोड शो सुरू झाल्यानंतर अध्र्या तासाने कृपाशंकर सिंह आले नि थेट वाहनात विसावले.   वाराणसीच्या महत्त्वाच्या नई सडक, लहुराबीर, मुस्लीमबहुल मदनपुरा परिसरात राहुल यांच्या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला. रोड शोमुळे बराच काळ या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. उन्हाचा तडाखा त्यात वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले.
 राहुल गांधी यांचा रोड शो संपता-संपता याच रस्त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा रोड शो झाला त्यामुळे सुरक्षा रक्षकांना जराही उसंत मिळाली
नाही.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे
कृपाशंकर सिंग यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सिंग यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी २०१२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यात दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. सिंग यांची पत्नी मालती देवी, मुलगा नरेंदमोहन सिंग, सून अंकिता यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या हे प्रकरण आहे. घराच्या झडतीच्या वेळी कृपाशंकर सिंग यांच्या घरातून काडतुसं सापडली होती. त्याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.दोन प्रकरणात सिंग यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

राम के नाम!
रामनामाचा महिमा काँग्रेस नेतेसुद्धा टाळू शकले नाहीत. राहुल गांधी यांच्या वाहनामागे एक मोठ्ठे वाहन होते. त्यात दिवंगत शहनाईवादक बिस्मिल्ला खाँ यांचे चिरंजीव होते. ते ‘रघुपती राघव राजाराम..’ची धून वाजवत होते. रोड शोदरम्यान त्यांनी राहुल गांधी यांना बिस्मिल्ला खाँ यांची एक प्रतिमा भेट दिली. नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामचंद्र व गंगा मातेचा प्रतीकात्मक वापर केल्याने काँग्रेसने ‘रघुपती राघव..’ची धून वाजवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रोड शो संपल्यावर सुरू झाली