आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे आता अशा इच्छुकांनी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणूकांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व अन्य पक्षांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, आम आदमी पक्ष याला अपवाद ठरला आहे. कारण, या पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आप पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासूनच आम आदमी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील अनेक बडय़ा नेत्यांचा हिरमोड झाला आहे. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला.  
लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे झालेले पानिपत लक्षात घेता केजरीवाल यांनी आप राज्यात निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले. किंबहुना आप आता दिल्लीबाहेर पडणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आप पक्षात प्रवेश घेऊन राजकारणात सक्रीय झालेल्या अनेक इच्छुकांची पंचाईत झाली आहे. हा पक्ष लोकप्रियतेच्या शिखरावर असतांना कॉंग्रेस, भाजप, शिवसेना व मनसेत नाराज असलेल्या अनेकांनी आपमध्ये प्रवेश घेतला, तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून व प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी आपमध्ये भविष्य शोधले होते, परंतु आता केजरीवाल यांच्या नव्या फतव्यामुळे त्यांच्या आशांवर पाणी पडले आहे. विधानसभा निवडणुकीत आपची उमेदवारी मिळावी म्हणून मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरप्रमाणेच विदर्भातील ६६ मतदारसंघात अनेक इच्छुक होते. यातील बहुतांश इच्छुकांनी तर निवडणूक लढण्याची तयारीही पूर्ण केली होती.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आघाडीचाच
मांझी यांचा खुलासा
पाटणा : जद(यु), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचे संयुक्त सरकार आल्यास त्या सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा नितीशकुमार यांच्याकडे असेल, या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार हा आघाडीतील तीनही घटक पक्ष संयुक्त चर्चेने ठरवतील, असा खुलासा बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी केला. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जर काँग्रेस, जनता दल (युनायटेड) आणि राष्ट्रीय जनता दल एकत्रितपणे लढणार आहे.