लोकसभा निवडणुकीत मनसेची अवघड परिस्थिती असताना उत्तर मुंबईतून व ईशान्य मुंबईमधून लढण्याची हिम्मत न दाखवणाऱ्या आमदार प्रवीण दरेकर व शिशिर शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठोस कार्यक्रम राबविण्याऐवजी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने दाखवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ज्यांनी स्वत: लढाईतून पळ काढला, त्यांनीच आता राज यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वाची ‘माळ’ टाकून आपली जबाबदारी झटकल्याची भावना अनेक अस्वस्थ पदाधिकारी व कार्यर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यासाठी शिवसेनेने ताकद लावण्यात सुरुवात केली आहे. प्रचाराचा एक भाग म्हणून दादरसह अनेक ठिकाणी ‘अब की बार ठाकरे सरकार’अशा जाहिराती झळकू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे यांनी ३१ मे रोजी सोमय्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या आयोजनानिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. मनसेचे मुंबईसह राज्यातील लोकसभा निवडणूकीत लढलेले एकही उमेदवार या मेळाव्याला उपस्थित नव्हते. आमदार प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते. तथापि केवळ शिशिर शिंदे व प्रवीण दरेकर यांचीच भाषणे होऊन त्यांनी महायुतीचा मोबाइल सुरू होण्यासाठी मनसेचेच सीमकार्ड लागेल असे सांगितले.
या संपूर्ण सभेत एकाही कार्यकर्त्यांने राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा, अशी मागणी केलेली नसताना प्रसारमाध्यमांकडे बोलताना राज यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे दरेकर यांनी कसे काय सांगितले, असा सवालही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. सेनेचे निवडून आलेल्या सर्व उमेदवार हे कर्तृत्वशून्य असताना केवळ मोदीलाटेमुळे निवडून आल्याचे या आमदारांनी सांगितले. मात्र मनसेची एवढी वाताहात कोणामुळे झाली हे सांगायचे या आमदारांनी टाळले.