भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वडोदरा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विवाहित असल्याचे पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मान्य केल़े  त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आह़े  काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग याबद्दल ट्विटरवरून शेरेबाजी करीत मोदींविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आह़े  तर मोदींच्या बंधूनी मात्र त्यांची पाठराखण करीत ‘तो विवाह म्हणजे केवळ सामाजिक औपचारिकता होती’, असे म्हटले आह़े
या पूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना मोदींनी विवाहासंबंधीचा रकाना मोकळा ठेवला होता,  मात्र या वेळी लोकसभेसाठी अर्ज भरताना त्यांनी पहिल्यांदाच जशोदाबेन यांच्याशी विवाह झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आह़े  पत्नीची मालमत्ता आणि कर्जाबद्दल काहीही माहिती नसल्याचेही मोदींनी म्हटले आह़े
निवृत्त शिक्षिका असलेल्या ६२ वर्षीय जशोदाबेन यांच्याशी मोदींचा त्यांच्या लहान वयात विवाह झाला होता, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून तारुण्यातच घरातून बाहेर पडल्यामुळे ते पत्नीपासून दुरावल़े
‘मोदींनी त्यांचे वैवाहिक स्थिती मान्य केली आह़े  महिलेवर पाळत ठेवणाऱ्या, पत्नीचा अधिकार हिरावून घेणाऱ्या व्यक्तीवर देशातल्या महिला विश्वास ठेवू शकतील का? मोदींविरोधात मतदान करा’, अशी खोचक ट्विप्पणी दिग्विजय सिंह यांनी केली आह़े
मोदींची संपत्ती दीड कोटी
नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती १.५१ कोटी रुपये असल्याचे, तसेच त्यांच्याकडे कोणतेही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून आले आह़े  प्रतिज्ञापत्रात मोदी यांनी त्यांची जंगम संपत्ती ५१ लाख ५७ हजार ५८२ रुपयांची असल्याचे म्हटले आह़े  त्यात बँकेतील रक्कम, मुदत ठेवी आणि २९ हजार ७०० रुपयांची रोख यांचा समावेश आह़े  तसेच त्याच्याकडील चार अंगठय़ांची किंमत १.३५ लाख आह़े  त्यांनी गेल्या दोन वर्षांत कोणताही दागिना खरेदी केलेला नाही़  मोदी यांच्या गांधीनगर येथील घराची किंमत एक कोटी रुपये आह़े  आणि या घराव्यतिरिक्त मोदी यांची अन्य कोणतेही घर अथवा जागा-जमीन नाही़  मोदींची २०१२ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी जाहीर संपत्ती १.३३ कोटी रुपयांची होती़  

आरोप दिशाभूल करणारे..
मोदींचे वडील बंधू सोमाभाई यांनी मात्र मोदींवरील आरोपांचे खंडन करीत त्यांचा विवाह म्हणजे ५० वर्षांपूर्वी झालेली एक सामाजिक औपचारिकता होती, असे म्हटले आह़े  ‘आमच्या पालकांचे फारसे शिक्षण झालेले नव्हते आणि आमचे कुटुंब गरीब होत़े  त्यामुळे पालकांसाठी नरेंद्र हे इतर मुलांप्रमाणे होत़े  त्यामुळे त्यांनी लहान वयातच नरेंद्र यांचा विवाह करून दिला,’ असे त्यांनी भाजपच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आह़े  घर सोडल्यानंतर मोदींनी कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवला नाही़  देशसेवा हा एकच त्यांचा धर्म होता़  जशोदाबेन यादेखील त्यांच्या वडिलांच्या घरी राहून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा काळ व्यतित करीत होत्या़, असेही सोमाभाई यांनी म्हटले आह़े  तसेच मोदींचे दुसरे बंधू प्रल्हाद यांनीही मोदींची पाठराखण केली.
खोटय़ा प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण द्या
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्याकडे खोटय़ा प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आह़े  विधानसभा निवडणुकांच्या वेळी मोदींनी पत्नी संदर्भातील रकाना मोकळा सोडला होता़  या वेळी मात्र त्यांनी पत्नी असल्याचे मान्य केले.  त्यामुळे त्या वेळी खोटे प्रतिज्ञापत्रा का सादर केले, तसेच या वेळी मोदींनी पत्नीच्या संपत्तीबाबत माहिती नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आह़े  त्याबाबत सवाल उपस्थित करून नाईक यांनी आक्षेप घेतला आह़े