लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या मतदारराजाने अधिकाधिक संख्येने मतदानकेंद्रात येऊन मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नरत आहे. मात्र, आयोगाच्या या प्रयत्नांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मतदारयादीत आपले नाव नोंदवण्यासाठी मतदारांना यंदा २६ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ऑनलाइन नोंदणीची सुविधाही त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, गुरुवारी २७ मार्चपर्यंत राज्यभरातून केवळ २६ हजार १९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन नोंदणीकडे मतदारांनी पाठ फिरवली असल्याचेच स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाइल ही संपर्काची प्रभावी माध्यमे प्रचारासाठी वापरली जात आहेत. मतदारांमध्ये मतदानासाठी जागृती व्हावी यासाठीही या माध्यमांचा वापर करून घेतला जात आहे. मात्र, असे असतानाही निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन मतदार नोंदणी मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आयोगाकडे अवघे २६ हजार १९३ अर्जच प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. राज्यभरातून आलेल्या या अर्जाची छाननी केली जाणार असून ५ एप्रिलला त्यांच्या नावांची यादी तयार केली जाणार आहे. अर्जछाननीतही बहुतेक अर्ज बाद ठरण्याचीच शक्यता असते. त्यामुळे यातील नेमके किती मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील हे सांगणे कठीण असल्याची कबुली आयोगातील सूत्रांनी दिली. मात्र, ऑनलाइन नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाल्याची कबुलीही एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले
नाहीत.
कारणे काय?
ऑनलाइन नोंदणीबाबत अनभिज्ञता
नोंदणीबाबत जागरूकतेचा अभाव
नोंदणीची किचकट प्रक्रिया