भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाची देशात लाट असल्याचे चित्र मीडियाने रंगविले असल्याचे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे त्यावर भाजपचे नेते अरुण जेटली यांनी टीका केली आहे. डॉ. सिंग यांच्यात दूरदर्शीपणाचा अभाव असल्याने त्यांना मोदी यांच्या उमेदवारीला मिळणारा भरघोस पाठिंबा दिसत नाही, असे जेटली यांनी म्हटले आहे.
देशात मोदी यांची लाट नसल्याचे पंतप्रधान म्हणत असले तरी मोदी यांची लाट असल्यानेच त्यांना अशा प्रकारचे मत व्यक्त करावे लागले आहे, असेही जेटली म्हणाले. डॉ. सिंग यांच्याकडे दूरदर्शीपणाचा अभाव असल्यानेच त्यांना मोदी यांची लाट दिसत नाही, मोदी यांच्या नावाची जोरदार लाट असल्याचे त्यांना स्पष्ट दिसत असूनही डॉ. सिंग ते मान्य करण्यास तयार नाहीत, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने गेल्या १० वर्षांच्या राजवटीत काय केले याबाबत सांगण्यासारखे काहीही नसल्याने त्या पक्षाचे नेते आता नकारात्मक प्रचार करीत आहेत. प्रस्थापितांविरोधात देशात जोरदार चर्चा सुरू असताना गांधी कुटुंबीय मात्र आमच्यावर टीका करण्यात मश्गूल आहे, असेही जेटली म्हणाले. विरोधकांना दूषणे देऊन सत्तारूढ पक्ष आपली निष्क्रियता दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दुर्मीळ प्रसंग इतिहासात आला आहे, असेही ते म्हणाले.