मतदानाचा दिवस उजाडला आणि सकाळपासूनच टीव्ही सुरू. जिकडे तिकडे मतदानाबद्दल निरुत्साह व त्याच्या बातम्या विविध चॅनल्सवरून प्रसारित होत होत्या. माझ्या मुलीची नुकतीच २१ वर्षे पूर्ण झाली होती व ती मतदानाचा अधिकार प्रथमच बजावणार होती. तिलाही मतदान करण्याचं प्रचंड कुतुहल होतं.
मला सकाळपासूनच थोडं अस्वस्थ वाटत होतं. चहावरसुद्धा इच्छा नव्हती. जरा वेळाने पोट दुखू लागले. पोट बिघडले. उलटय़ा सुरू झाल्या. तीव्र अतिसाराची लक्षणे सुरू झाली. अतिसारावरची घरगुती औषधे व गोळ्या सुरू केल्या. घरगुती औषधे व गोळ्या यांनी उतार पडेना. लिंबू सरबत, पाणी वगैरे सर्वच उलटून पडत होते. अशक्तपणा आणि उलटय़ांमुळे पिळवटून निघणारी आतडी यांनी मी बेजार झाले. डोळे मिटून पडून राहात होते. हळूहळू अंगातले त्राण नाहीसे झाले.
मतदान केंद्र साधारण अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या शाळेत होते. मला शक्ती नसल्याने स्कूटरवरून कितपत गर्दी असल्याचे माझे पतीदेव पाहून आले. ‘फारशी गर्दी नाही’ चटकन काम होईल. ‘मत फुकट जाता कामा नये, जाऊन येऊ या’ असे माझ्या पतीदेवांनी उत्साहाने सांगितले.
मतदान सोहळा पार पडला आणि कशीबशी मी घरी आले. रणरणत्या उन्हातून फिरल्याने मी पूर्ण गळून गेले होते. नित्राण होऊन मी पडले आणि घरातील मंडळी घाबरली. मला डिहायड्रेशन झाले होते. हॉस्पिटलमध्ये मी अॅडमिट झाले. २ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. १५ सलाईन बाटल्यांद्वारे ग्लुकोज व अॅन्टिबायोटिक्स दिली. तब्येत सुधारली. पण अशाही परिस्थितीत मतदानाचे कर्तव्य पार पडल्याचे मोठे समाधान होते.