पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तेलुगू देशम पुन्हा सामील झाली आहे. सीमांध्र आणि तेलंगणमध्ये दोन्ही पक्ष लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजरात यांनी ही आघाडी घडवण्यात मोठी भूमिका बजावली.
जागावाटपात सीमांध्रमधील लोकसभेच्या पाच तर विधानसभेच्या १५ जागा भाजप लढवणार आहे. तर तेलंगणमध्ये लोकसभेच्या ८ तर विधानसभेच्या ४७ जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या आहेत. मतदारसंघांची नावे नंतर जाहीर करण्यात येतील. या युतीसाठी गेले १५ दिवस चर्चा सुरू होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडी तीनशेच्यावर जागा मिळवेल असा विश्वास तेलगु देशमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला. काँग्रेसमुक्त भारत हे आमचे ध्येय आहे. मोदी विकासपुरुष आहेत अशा शब्दात नायडूंनी कौतुक केले. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवूनच ही आघाडी करण्यात आल्याचा दावा नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. दोन्ही पक्ष संयुक्तपणे प्रचार करतील असे नायडू यांनी स्पष्ट केले.
चंद्राबाबू नायडू यांच्याशी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. देश जेव्हा अडचणीत येतो तेव्हा नायडू मदतीला धावून येतात, असे गुजराल यांनी सांगितले. भ्रष्टाचारमुक्त देश घडविण्यासाठी ते मोदींना साथ देतील, अशी अपेक्षा गुजराल यांनी व्यक्त केली. अमित शहा यांच्यासारखे नेते जेव्हा प्रक्षोभक वक्तव्य करतात अशा वेळी तुम्ही त्यांना साथ कशी देणार, असे विचारता, विकासाची भूमिका घेऊन मोदी पुढे जातात, असे उत्तर नायडूंनी दिले. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे. यापूर्वीही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देताना ही बाब स्पष्ट केली होती, असे नायडू म्हणाले.