उमेदवारांची भाऊगर्दी झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली असून खरी लढत काँग्रेसचे प्रतीक पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांच्यातच होत आहे. गेली ३२ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याकडे असणारी खासदारकी खेचून आणण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू असताना आघाडी धर्माचे पालन कितपत होते यावरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात विरोधक आक्रमक असून, सत्ताधारी काँग्रेस मात्र अंतर्गत मतभेदांना मूठमाती देत आरोपाचे खंडण करण्यातच गुंतल्याचे चित्र आहे.
सांगली मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यांपकी मिरज, सांगली आणि जत या विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाकडे आहे. तर पलूस-कडेगाव व खानापूर संघाचे काँग्रेसकडे आणि तासगाव-कवठेमहांकाळचे राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यातील तीन आमदार भाजपचे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीतजास्त सत्तास्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या घटक पक्षांकडेच असल्याने कागदोपत्री पाहता काँग्रेसची ताकद जास्त भासते. मात्र पक्षांतर्गत कलह, गटबाजी, परा फेडण्याची संधी आणि आगामी विधानसभा निवडणुका यामुळे राजकीय पातळीवर दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे.
जून २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच चुरशीने लढत झाली. या लढतीसाठी स्थानिक पातळीवरील राजकारणाला राज्यस्तरावरील नेत्यांनी अवास्तव महत्त्व दिल्याने आघाडीची बिघाडी निर्माण होते की काय? अशी स्थिती होती. राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांपासून मातब्बर खाती सांभाळणाऱ्या मंत्र्यांपर्यंत एकमेकांची उणीदुणी सार्वजनिक व्यासपीठावर काढण्यात आली. गुन्हेगारी लोकांना उमेदवारी देण्यापासून, मांडी कापून देण्यापर्यंत चर्चा झाल्या. दोषारोप करणारी मंडळीच आता आघाडी धर्माचे पालन करण्याचे अनाहूत सल्ले मतदारांना देत आहेत.
काँग्रेसचे प्रतीक पाटील तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्यासाठी मदानात उतरले आहेत. वसंतदादा पाटील यांचा नातू ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू असली तरी केंद्रीय राज्यमंत्रिपद सांगली जिल्ह्य़ाला लाभून प्रत्यक्ष जनतेला त्याचा कितपत लाभ झाला याचाही विचार या निवडणुकीच्या निमित्ताने केला जात आहे. जिल्ह्य़ाच्या औद्योगिक विकासासाठी कोणताही पायाभूत प्रकल्प उभा राहू शकला नाही. सांगलीचा शेरीनाला असो अथवा जत आटपाडीच्या दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न असो, सत्तास्थाने हाती असतानाही ज्या गतीने कामे अपेक्षित होती ती पूर्ण करण्यात यश लाभले असे म्हणता येणार नाही. मतदारसंघाचा सर्वागीण विकास व्हावा अशी रास्त अपेक्षा सर्वसामान्यांची असली तरी काही ठरावीक मतदारसंघांत सार्वजनिक रस्त्याची कामे होतात. मात्र जत, मिरज, खानापूर या मतदारसंघांतील खड्डय़ातील रस्ते शोधावे लागतात अशी सद्य:स्थिती आहे.
सांगलीमध्ये काँग्रेस आणि महायुती अशी लढत होत असली तरी या लढतीला तासगाव, कवठे-महांकाळमधील गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील पारंपरिक संघर्षांचे मूळ असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसचे नेते प्रचारात असले तरी प्रचाराची खरी धुरा आर. आर. पाटील यांच्याकडेच दिसत असून त्यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. दुष्काळी फोरममध्ये संजयकाका पाटील अग्रभागी होते. महायुतीची उमेदवारी संजयकाकांना मिळताच विलासराव जगताप वगळता अन्य सहकाऱ्यांनी म्हणजे आटपाडीचे राजेंद्र देशमुख, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसची साथ करणार असल्याचे सांगितले आहे. तर अजित घोरपडे (कवठे-महांकाळ) तटस्थ आहेत. खानापूरचे विद्यमान काँग्रेसचे आमदार सदाशिव पाटील महायुतीच्या उमेदवारीमुळे अडचणीत आले आहेत. त्या ठिकाणी त्यांचे विरोधक अनिल बाबर, काँग्रेसच्या प्रचारात आघाडीवर आहेत.
प्रतीक पाटील हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत असताना महापालिका क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत काय पेरले तेच आता उगवण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी मंत्री मदन पाटील प्रकृतीमुळे प्रचारात तडफेने सहभागी होतात की नाही यावर शहरातील राजकीय स्थिती अवलंबून राहणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागाला संजीवनी ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांच्या पूर्तीसाठी केंद्र शासनाकडून मदत दिल्याने जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी मतदार काँग्रेसलाच साथ देतील.
प्रतीक पाटील  

विश्वासघातकी राजकारणाला नेतेच कंटाळले नाहीत तर मतदारही विकासापासून वंचित राहिला असल्याने संघर्ष अटळ आहे. वारस की सरस हाच मुद्दा या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेपुढे उभा ठाकला असून, निष्क्रिय प्रतिनिधीपेक्षा आक्रमक प्रतिनिधी विकासासाठी आवश्यक असल्याने जनता भरभरून साथ देईल.
संजयकाका पाटील