येथील कंथ परिसरात महापंचायत आयोजित करण्यावर घालण्यात आलेली बंदी झुगारल्याबद्दल भाजपच्या चार आमदारांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी आमदार संगीत सोम यांचा समावेश आहे.
कंथमध्ये एका मंदिरावर ध्वनिक्षेपक बसविण्यात आल्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यामुळे परिसरात जातीय तणाव वाढला होता, तेथे शुक्रवारी भाजपने महापंचायत आयोजित केली होती.
आमदार संगीत सोम यांच्यासह खासदार कुंवरसिंह तन्वर, खासदार सत्यपाल सैनी आणि खासदार नेपालसिंग यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची रवानगी मोरादाबाद येथे करण्यात आली, असे मोरादाबादचे आयुक्त शिवशंकर सिंग यांनी सांगितले. या लोकप्रतिनिधींसह हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते महापंचायतीसाठी उपस्थित होते, असेही आयुक्त म्हणाले.
महापंचायतीवरील बंदी झुगारण्याचे भाजपच्या आमदारांचे कृत्य चुकीचे असल्याचे सपाने म्हटले आहे. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर हिंसाचार घडविण्यास आणि जातीय तिढा वाढविण्यास त्या पक्षाचे कार्यकर्ते उत्सुक झाले आहेत, असे सपाचे प्रवक्ते आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे. बंदी आदेश झुगारण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. राज्यात सपाला बहुमत मिळाल्यापासून राज्यातील शांततेचे वातावरण भंग करण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.