उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील जागेवरून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यातील वादाबाबत संघाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र तो वाद सोडवण्यात भाजप सक्षम असल्याचा विश्वास संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी यांनी व्यक्त केला आहे. पक्षाचा निर्णय आपण शिस्तबद्ध सैनिक या नात्याने मान्य करू असे जोशींनी स्पष्ट केले.
वाराणसीच्या उमेदवारीवरून केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत शनिवारी वाद झाला. जोशी हे वाराणसीचे खासदार आहेत. त्यांना पुन्हा येथूनच निवडणूक लढायची इच्छा आहे. पक्षाने येथील उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली होती. यावरून पक्षात कोणतेही वाद नसल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी केला आहे. आपण या बैठकीला उपस्थित होतो मात्र उत्तर प्रदेशातील जागांवर चर्चाच झाली नाही असे त्यांनी सांगितले. पक्षाची निवडणूक समितीच याबाबत निर्णय घेईल, अशी भूमिका जोशी यांनी घेतली आहे. याबाबत वाद नाही असे त्यांनी सांगितले. मोदी यांना वाराणसीमधून उमेदवारी मिळाल्यास स्वीकारणार काय, असे विचारता प्रत्येक शिस्तबद्ध कार्यकर्ता पक्षाचा निर्णय मान्य करेल, असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले. जे काही बोलायचे ते पक्षाच्या व्यासपीठावर बोलेन असे त्यांनी सांगितले.