नरेंद्र मोदींबद्दल आम्हाला काही माहित नाही, बाबासाहेबांच्या पक्षाचे नेत्यांनी पार वाटोळे करून टाकले, मायावती चैत्यभूमिला कधी गेल्याचे पाहिले नाही, रामदास आठवले यांना भाजपने खासदार केले, समाजाचे काय, काँग्रेस भूलथापा देणारा पक्ष आहे, आम्ही अजूनही वाहत्या गटारांच्या बाजुला रहात आहोत, मग काँग्रेसने विकास कुणाचा केला, अशा टोकदार आणि धारदार प्रतिक्रिया आहेत, मुंबईतील दलित वस्त्यांमधील मतदारांच्या. काँग्रेसच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. मात्र त्याचा फायदा महायुतीला होईलच असे नाही. परंतु दलितांच्या मतांचे सर्वच पक्षांमध्ये विभाजन होणार, असाच एकंदरीत दलित वस्त्यांमधील कल आहे.
मुंबईत आंबेडकरी चळवळीचा, आंदोलनांचा, रिपब्लिकन राजकारणाचा प्रभाव असलेल्या काही खास वस्त्या आहेत. त्यात प्रामुख्याने मुलुंडमधील डंपिंग रोड, घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर, कामगाराज नगर, भीम नगर, गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, अनुशक्तीनगर, चेंबूर, लालडोंगर, सिद्धार्थ कॉलनी, धारावी, माटुंगा लेबर कॅंप, नायगाव, वरळी बीडीडी चाळी, शिवडी, माझगाव, कुलाबा येथील गीतानगर, खेरवाडी, गोरेगाव येथील इंदिरा नगर, सिद्धार्थनगर, कांदिवली, इत्यादी वस्त्यांचा समावेश आहे.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा एक मोठा गट या वेळी भाजप-शिवसेनेसोबत आहे. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप-बहुजन महासंघ स्वबळावर निवडणुका लढवित आहे. बसप स्वतंत्रपणे लढत आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा गट काँग्रेसबरोबर आहे. मुंबईतील सर्वच मतदारसंघात निर्णायक असलेली दलितांची मते मिळविण्यासाठी साऱ्याच पक्षांचा अटापिटा सुरु आहे.
मोदी यांची तथाकथित लाट आणि आठवले यांची भाजप-शिवसेनेबरोबर असलेली युती या पाश्र्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असलेल्या वस्त्यांमध्ये फेरफटका मारला असता मोदींबद्दल काहीही आकर्षण नसल्याचे जाणवले. परंतु सत्ताधारी काँग्रेसवर मात्र सामान्य मतदार राग व्यक्त करताना
 दिसला.
कोणता पक्ष बरा वाटतो भाजप की काँग्रेस, रामदास आठवले यांना भाजपने खासदार केले, त्याबद्दल काय वाटते, अशा काही मुद्यांवर दलित वस्त्यांमधील मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आठवले यांना खासदार केल्याबद्दल त्यांचे समर्थक सोडले तर इतरांना त्याचे कौतुक नाही. उलट त्यासाठीच ते भाजप-शिवसेनेबरोबर गेले, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या बहुतेक भागांमध्ये दलित समाज अजूनही झोपडपट्टय़ांमध्ये रहात आहे.
अनेक निवडणुका आल्या, गेल्या परंतु त्यांच्या वाहत्या गटाराबरोबरचे जगणे-मरणे संपलेले नाही, असा संतापही व्यक्त झाला. हा राग काँग्रेसवर आहे. काँग्रेस फसवणूक करते, असा काही तरुण व वृद्ध मतदारांनी आरोप केला. सत्ता हातात असताना इंदू मिलच्या जमिनीवर बाबासाहेबांचे स्मारक का उभारले जात नाही, असा त्यांचा सवाल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti congress wave in dalit areas in mumbai
First published on: 19-04-2014 at 04:34 IST