महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाच्या वाढीत कायम अडचणीच्या ठरलेल्या रिपब्लिकन गटांना आपलेसे करता येते का, याची चाचपणी पक्षनेतृत्वाने सुरू केली आहे. ज्यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी कसलेही राजकीय संबंध ठेवलेले नाहीत, अशा छोटय़ा-मोठय़ा रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत खाते उघडायचे अशी रणनीती बसपने आखली आहे.
महाराष्ट्रात बसप व रिपब्लिकन पक्षाच्या गटांचे कधीच जमले नाही. त्यामुळे बसपने इतर मागास समाजावर लक्ष केंद्रीत केले होते. परंतु त्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही. त्यामुळे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यातील १४४ मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेश माने यांच्यावर सोपविली आहे.
येत्या निवडणुकीत बसप व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांची युती होऊ शकते का, असे विचारताच, आठवले शिवसेना-भाजपशी, किंवा जोगेंद्र कवाडे काँग्रेसशी संबंध तोडतील का, असा प्रश्न डॉ. माने यांनी लोकसत्ताशी बोलताना विचारला.
’निवडणुकीत आता बाहेरच्या उमेदवारांची आयात करण्याऐवजी पक्ष कार्यकर्त्यांना उमेदवारी.
’राजकीय डावपेचाचा भाग म्हणून अपवादात्मक परिस्थतीत काही जागांवर बाहेरचे उमेदवार.