देशात आम आदमीची सत्ता आणण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना शनिवारी येथील ‘रोड शो’दरम्यान काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र, तरीही त्यांनी आपला प्रचार सुरूच ठेवत नैसर्गिक वायूच्या किमती वाढवण्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस व भाजपला लक्ष्य केले. हरियाणातील प्रचारसभांसाठी केजरीवाल यांचे शनिवारी सकाळी फरिदाबाद येथे आगमन झाले. त्यांच्या ‘रोड शो’दरम्यान काही नागरिकांनी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपवर टीकेची तोफ डागली. राष्ट्रीय म्हणून मिरवणारे हे दोन्ही पक्ष उद्योगपतींना विकले गेले असल्याचे ते म्हणाले.  रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापुढे या दोन्ही पक्षांनी लोटांगण घातले असल्याची टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर नैसर्गिक वायूच्या किमती भरमसाट वाढतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. १ एप्रिलपासून या किमती वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणल्याच्या निर्णयाचे स्वागतही केजरीवाल यांनी केले. आपण निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणली होती व त्यानुसार ही कारवाई झाली याबद्दल त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. संपत यांचे आभारही मानले. मोदी आणि काँग्रेस या दोघांनाही सत्तेपासून दूर ठेवल्यास देश भ्रष्टाचारमुक्त होईल, त्यासाठी आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. गुडगाव येथेही केजरीवाल ‘रोड शो’ करणार असून त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार योगेंद्र यादव निवडणूक रिंगणात आहेत.