गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या कायदेशीर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या दंगलींच्या वेळी सरकारी यंत्रणा उघडपणे कोलमडून पडली होती. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चीट’ देणे राजकीयदृष्टय़ा सोईचे, पण घाईचे ठरेल, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले,”या दंगलींबाबत उपस्थित प्रश्नांना मोदी यांना तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने नैतिक पातळीवरून उत्तरे द्यावीच लागतील. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अपयशाची कायदेशीर जबाबदारीही त्यांना घ्यावी लागेल.”
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने आणि कनिष्ठ न्यायालयाने गोध्रा प्रकरणी मोदी यांना निर्दोष ठरविले.यामुळे आता त्यांना यासंदर्भात माफी मागण्याची वा स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही, याकडे लक्ष वेधले असता राहुल म्हणाले,” विशेष तपास पथकाच्या अहवालावर काही तज्ञांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. या पथकाच्या कामकाजातील गंभीर दोष निदर्शनास आणण्यात आले आहेत. या पथकाचा अहवाल कनिष्ठ न्यायालयाने स्वीकारला असला तरी त्याची वरिष्ठ न्यायालयाकडून अद्याप छाननी व्हायची आहे. मोदी यांच्यावर करण्यात आलेले ठोस आरोप आणि सादर केलेले पुरावे यांचा पुरेसा तपास झालेला नाही. यामुळे त्यांना ‘क्लिन चीट’ देणे घाईचे ठरेल. अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत. देशाला बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत.”
लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध आपण अशी अध्यक्षीय धर्तीवरची निवडणूक आहे, असे आपल्याला वाटत नाही. ही निवडणूक भारतातीत दोन विचारांमधील लढाई आहे. देशातील प्रत्येक जणाचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यांचे प्रतिनिधित्व कॉंग्रेस करते. मानवतावाद आणि सर्वसमावेशकतेसाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. याउलट भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत असलेल्या देशात गरिबांना, वेगळ्या धर्माच्या नागरिकांना वा विचारसरणी असणाऱ्यांना कोणतेही स्थान असणार नाही. भाजपला वैचारिक दडपशाही अपेक्षित आहे. या पक्षाला सत्तेचे केंद्रीकरण मूठभरांच्या हातात करावयाचे आहे. मोदी ज्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात ते देशासाठी धोकादायक आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.
शक्तिशाली म्हणजे काय?
‘देशाला शक्तिशाली नेत्याची गरज आहे, असे मलाही वाटते. पण, शक्ती म्हणजे काय, हे आपण समजून घेतले पाहिजे. शक्ती म्हणजे चिरडून टाकणारे पाशवी बळ नव्हे. स्वतला जे सोईचे वाटते ते इतरांवर लादणे नव्हे,’ असे राहुल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2014 रोजी प्रकाशित
मोदी यांना दंगलींबद्दल ‘क्लिन चीट’ देणे घाईचे
गुजरातमधील गोध्रा येथे २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या कायदेशीर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या दंगलींच्या वेळी सरकारी यंत्रणा उघडपणे कोलमडून पडली होती.

First published on: 17-03-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean chit to modi in 2002 riots premature rahul gandhi