शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे खासदारकीची ‘हॅटट्रिक’ करण्याचे मनसुबे असताना राष्ट्रवादीने देवदत्त निकम यांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी सरळ लढत आणि आमदारांच्या घरभेदीपणाचा फटका बसल्याने दारुण पराभव झालेल्या राष्ट्रवादीने यंदा तिरंगी लढत घडवून आणली असून मताधिक्य न दिल्यास तिकीट कापण्याची तंबी देऊन ‘त्या’ आमदारांना खऱ्या अर्थाने कामाला लावले आहे.
शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड, हडपसर व भोसरी विधानसभा क्षेत्र मिळून शिरूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला. औद्योगिक क्षेत्र व शेतीपट्टा असे मिश्र स्वरूप असलेल्या पूर्वीचा खेड व नंतरच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव सलग दोनदा निवडून आले.  आढळरावांची आता ‘हॅटट्रिक’कडे वाटचाल आहे. शरद पवार यांनी शिरूरची चाचपणी करून नंतर माढय़ाची निवड केली, तेव्हापासून ‘पवार घाबरले, माढय़ाला पळाले,’ असा प्रचार शिवसेनेकडून केला जात आहे. ‘साहेबां’वरील बोचऱ्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने यंदा चांगलीच व्यूहरचना केली. आढळरावांच्याच आंबेगाव क्षेत्रातील भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीने िरगणात उतरवले. गेल्या वेळी मनसेचा उमेदवार नसल्याचा थेट फायदा आढळरावांना झाला होता, यंदा मनसे िरगणात आहे व आढळरावांना नेहमी मताधिक्य देणाऱ्या खेड क्षेत्रातूनच मनसेने अशोक खांडेभराड यांना उमेदवारी दिली. या तिरंगी लढतीत मनसे व राष्ट्रवादीची आढळरावांच्या विरोधात छुपी युती असल्याची उघड चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वळसे पाटील स्वत: उमेदवार असल्याप्रमाणे प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादीने मंत्र्यांची फौज उतरवली असून मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार ताकदीनिशी प्रचारात उतरवले आहेत. राष्ट्रवादीच्या काही आमदारांचे आढळरावांशी ‘फिक्सिंग’ आहे, अशी खूपच ओरड होऊ लागल्याने मताधिक्य न दिल्यास तिकीट कापण्याची तंबी पवारांनी दिली.
या सर्वाशी आढळराव एकटेच ‘दोन हात’ करताना दिसत आहेत. मनसेची ‘ऑफर’ नाकारून शिवसेनेत दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचा आढळरावांना मोक्याच्या क्षणी मोलाचा आधार मिळाला आहे. बैलगाडा शर्यती, विमानतळ, बेरोजगारी, औद्योगिक पट्टय़ातील आव्हाने, मतदारसंघाची विकास व खासदाराची कामगिरी या स्थानिक मुद्दय़ांसह राष्ट्रीय मुद्दय़ांवर प्रचार होतो आहे. नरेंद्र मोदींचे सरकार व आढळराव मंत्री होणार, असा मुद्दा शिवसेनेकडून मतदारांवर ठसवण्यात येत आहे. तर, आढळरावांचा खोटेपणा, निष्क्रियता व श्रेय लाटण्याच्या कार्यपद्धतीवरून राष्ट्रवादी व मनसेकडून हल्लाबोल होत आहे. वरकरणी तिरंगी वाटणाऱ्या लढतीत आढळराव-निकम यांच्यात थेट सामना असून ‘इंजिन’ जितके जास्त धावेल, तितकी राष्ट्रवादीच्या विजयाची शक्यता आहे. ‘इंजिन’ अडखळले तर आढळरावांना तिसऱ्यांदा निवडून येणे
अवघड नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस सरकारने महागाईचा कळस गाठला असून नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला भरपूर अपेक्षा आहेत. शिरूर लोकसभेचा आराखडा तयार आहे. पुणे-नाशिक रेल्वे मंजूर असून खेड-सिन्नरचा रस्ता प्रस्तावित आहे. बेरोजगारांना कायम नोक ऱ्या मिळवून देणे, भोसरी ते जुन्नर दरम्यान सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करणे, रेडझोन प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य राहणार आहे.
शिवाजीराव आढळराव, शिवसेना</strong>

केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांत झालेल्या विकासकामांच्या पाश्र्वभूमीवर मतदारांसमोर जात आहे. सरकारने कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली, त्याचा लाभ जनतेला होत आहे. शिरूरमध्ये शहरी-ग्रामीण विभागणी असून पुणे-नाशिक रस्ता तसेच विमानतळाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. नवीन प्रकल्प आणून तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करायची आहे.
देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>
 
बेरोजगारी, भोसरीतील रेडझोन, हडपसर कचरा डेपो, रेल्वेगेटमुळे होणारे अपघात, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, घाटांमध्ये होणारे अपघात, भीमाशंकर-मुंबई रस्त्याचे काम, विमानतळासारखे अनेक प्रश्न आहेत. आंबेगावसारख्या तालुक्यातही पाणी विकत घ्यावे लागते. शेतकऱ्यांना परतावा मिळत नाही. मतदारसंघाचा विकास रखडला आहे.
अशोक खांडेभराड, मनसे

Web Title: Hat trick in shirur will not be a challengeless task for shivajirao adhalrao patil
First published on: 13-04-2014 at 01:36 IST