‘‘मी राजीव गांधी यांची मुलगी असून, फक्त त्यांच्याबद्दलच माझ्या अंत:करणात पित्याविषयी वाटणारा आदर आहे,’’ अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. नरेंद्र मोदी यांनी अमेठीत प्रचारादरम्यान ‘‘प्रियंका आपल्याला मुलीसारखी असल्याचे’’ म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रियंका यांनी उपरोक्त उत्तर दिले.
सरकारी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत ‘‘प्रियंका गांधी या आपल्याला कन्येसमान आहेत,’’ असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यातच, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी मोदी यांच्या या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘मोदी यांनी प्रियंका यांना आपली कन्या म्हटले हे ऐकून आपल्याला बरे वाटले. मात्र मोदी यांचे हे वक्तव्य प्रियंका यांना फारसे रुचेल असे वाटत नाही,’’ असे मत चिदम्बरम् यांनी नोंदवले.
या पाश्र्वभूमीवर अमेठीत प्रचारासाठी आलेल्या प्रियंका यांना पत्रकारांनी मोदी यांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारली. सुरुवातीस त्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले, मात्र वारंवार हा प्रश्न विचारला जात असल्याचे पाहून त्या आपल्या वाहनातून खाली उतरल्या आणि अत्यंत उग्र चेहऱ्याने ‘‘मी केवळ राजीव यांचीच मुलगी आहे,’’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत या प्रश्नाबद्दल असलेली नाराजी व्यक्त केली.
मोदींवर सरकारी वाहिन्यांचा अघोषित बहिष्कार?
गुजरात दूरदर्शनवर नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्यात आली. ती २७ एप्रिल रोजी प्रसारित होणे अपेक्षित होते. सामाजिक माध्यमांमध्ये ही मुलाखत प्रसारित होणार नसल्याबद्दल चर्चाही सुरू होती. ‘‘आजवर आपल्यावर गुजरात दूरदर्शन केंद्राने जणू अघोषित बहिष्कारच टाकला होता. त्यामुळे जेव्हा मुलाखतीचे आमंत्रण मिळाले तेव्हा आपण चकित झालो,’’ असे वक्तव्य मोदी यांनी मुलाखतीत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am rajivs daughter says priyanka gandhi vadra to narendra modi
First published on: 02-05-2014 at 03:41 IST