उमेदवारी नाकारली गेल्याने दुखावले गेलेले माजी परराष्ट्रमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी शनिवारी थेट पक्षाच्या कार्यपद्धतीवरच निशाणा साधला. पक्षाची वैचारिक बैठक झुगारून देत मनमानी कारभार करणाऱ्यांचा पक्षात सुळसुळाट झाला असून ‘खरा भाजप’ आणि ‘खोटा भाजप’ अशी वर्गवारी करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. जसवंत यांच्या जाहीर टीकेमुळे भाजपतील ज्येष्ठ विरुद्ध दुसऱ्या फळीतील नेते यांच्यातील दुही चव्हाटय़ावर आली आहे.
जसवंत यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बाडमेरमधून भाजपने काँग्रेसमधून नुकतेच आयात झालेले सोनराम चौधरी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या जसवंत यांनी शनिवारी थेट पक्षाच्या कार्यपद्धतीवरच हल्ला केला. पक्षात बाहेरच्या लोकांचे अतिक्रमण झाले असून त्यांना या वैचारिक बैठकीचे वगैरे काहीही पडलेले नाही. पक्षनेतृत्वाला अशाच विचारांच्या नेत्यांचे कोंडाळे पडले आहे. त्यामुळे खरा भाजप कोणता याचाच प्रश्न पडला आहे. टीका करताना भावुक झालेल्या जसवंत यांनी आपण भावनेचे राजकारण करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता भाजप ही नाराजी कशी दूर करतो, याकडे आता सर्वाचेच लक्ष आहे.
पुत्रप्रेमासाठीच?
जसवंतसिंह यांच्या नाराजीमागे मुलाच्या भवितव्याची चिंता असल्याचे समजते. जसवंत यांचे चिरंजीव मानवेंद्र राजस्थानमध्ये भाजपचे आमदार आहेत. मानवेंद्र यांचा वसुंधरा राजे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठीच जसवंत यांना उमेदवारी डावलल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे जसवंत सिंह यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्रातील भाजप नेत्यांनी वसुंधरा राजे यांची मनधरणी सुरू केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांना बारमेर मतदारसंघातून उमेदवारी न देण्याचा पक्षाचा निर्णय आपल्यासाठीही वेदनादायी आहे. मात्र असे निर्णय सहजासहजी आणि विनाकारण घेतले जात नाहीत. यामागे काहीतरी कारण निश्चितच असेल, कारण ही निवड भाजप केंद्रीय निवडणूक समितीने केलेली नाही.सुषमा स्वराज, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या

“जसवंत सिंह हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, त्यांची प्रतिष्ठा केवळ उमेदवारीवर मोजता येणार नाही. त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा यथोचित उपयोग करून घेतला जाईल.
राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaswant singh attacks bjp leadership
First published on: 23-03-2014 at 02:12 IST