आपले प्रश्न धसास लावण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करला, मात्र त्याचा काहीही लाभ न झाल्यानेच अखेर आपण राजकारणाचा मार्ग अवलंबिला, असे आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून आमरण उपोषणाला बसलेल्या शिक्षकांना केजरीवाल यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
विविध सरकारी शाळांमध्ये रोजंदारीवर शिक्षकाचे काम करणाऱ्या ‘अखिल अतिथी शिक्षक संघटने’चे सदस्य असलेल्या शिक्षकांच्या एका समूहाने गेल्या तीन आठवडय़ांपासून धरणे आंदोलन पुकारले आहे. जवळपास १० हजार २०० शिक्षकांच्या सेवेचे नूतनीकरण करावे, पात्रतेसाठी वयोमर्यादा वाढवावी आणि वेतन निश्चित करावे आदी मागण्या असून, त्यापैकी काही जण आमरण उपोषणाला बसले आहेत.
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आमच्यासाठी काय करू शकतात, असा सवाल या वेळी शिक्षकांनी केला. तेव्हा आपण केवळ धरणे आंदोलनात सहभाग होऊ शकतो, मात्र त्याने उद्दिष्ट साध्य होणार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. उपोषणाचा काहीही लाभ होणार नाही, आपल्या शरीराला त्रास देऊ नका, आपण १५ दिवस उपोषण केले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे केजरीवाल म्हणाले. येथे बसून तुम्हाला भाजप सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नाही, तुम्ही नायब राज्यपाल अथवा मंत्र्यांची भेट घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितल़े