इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगळूरू दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलेकणी यांनी  व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी गुरुवारी आपली मालमत्ता जाहीर केली. या दोघांनी आपल्याकडे एकूण ७ हजार ७०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे.
मी आयआयटीतून पदवीधर झालो त्यावेळी माझ्या खिशात फक्त २०० रुपये होते. अवघ्या दहा हजार रुपयांच्या भांडवलावर मी व माझी पत्नी रोहिणीने इन्फोसिसची स्थापना केली. इन्फोसिसला मिळालेल्या यशामुळेच आमच्याकडे एवढी संपत्ती जमा होऊ शकली आहे, असे नीलेकणी यांनी स्पष्ट केले.  दक्षिण बंगळुरूतून काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना नीलेकणी यांनी त्यांच्याकडील संपत्तीचा तपशील जाहीर केला.
इन्फोसिसमध्ये आपले दीड तर रोहिणीचे सव्वा टक्के भागभांडवल असल्याचेही नीलेकणी यांनी स्पष्ट केले. आपली संपत्ती पारदर्शक पद्धतीने कमावलेली आहे. कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता ती कमावली असल्याने आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले. नीलेकणींचे विरोधक व भाजपचे नेते अनंतकुमार यांनी मात्र आपण गरीब उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्या पत्नीकडे सर्वात अधिक संपत्ती असल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात केला आहे.