विकास कामांची तुलना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी आमने-सामने यावे, या आव्हानाचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकोट येथील सभेत पुनरुच्चार केला. लोकसभा निवडणुकीत आता रंगत भरत असून गुरुवारी मुख्यमंत्री चव्हाण यांची अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा झाली. जातीयवादी व धर्माध शक्तीच्या हाती सत्ता सोपवू नका, विकास कामे करणा-या कॉंग्रेसला विजयी करा, विकास कामावर भर देणा-या काँग्रेसच्या हाती देशाची सत्ता सोपवा व पक्षाचे उमेदवार हिदायत पटेल यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
अजूनही विदर्भातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. शेतीच नाही तर सर्वच क्षेत्रात सरकारला अपयश आले आहे. गुजरातच्या विकासावर चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या अधोगती आणि प्रगतीबद्दल चर्चा करायची असेल, तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी न करता ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्याशी करावी. आम्ही त्यासाठी तयार आहोत.
विनोद तावडे