ओदिशाच्या मुख्यमंत्रिपदी सलग चौथ्यांदा विराजमान होऊन नवीन पटनाईक यांनी बुधवारी इतिहास रचला आहे. नवीन पटनाईक यांनी त्यांचे वडील बिजू पटनाईक यांचा विक्रम मोडला आहे.नवीन पटनाईक यांनी ५ मे २००० पासून ओदिशाच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारला आहे. यापूर्वी डॉ. माहताब आणि जे. बी. पटनाईक यांनी प्रत्येकी तीन वेळा ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.

आसामचे मुख्यमंत्री गोगोई यांचा आज राजीनामा ?
नवी दिल्ली:आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सादर करण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्याकडे आपण भेटीची वेळ मागितली आहे, गुरुवारी त्यांची भेट झाल्यास आपण तेव्हाच राजीनामा सादर करू, असे गोगोई यांनी सांगितले. मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आपला राजीनामा स्वीकारतील की नाही, त्याची आपल्याला कल्पना नाही. कारण त्याबाबत अद्याप आपण त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, असेही गोगोई म्हणाले.

अनंतमूर्तीना संरक्षण
 बंगळुरु:मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाऊ असे वक्तव्य करणारे विख्यात कन्नड लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर.अनंतमूर्ती यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या विनंतीवरून निवासस्थानी पोलीस तैनात करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर नमो ब्रिगेड नावाच्या गटाने १७ मे रोजी अनंतमूर्ती यांना कराचीचे तिकीट पाठवले होते. आपण भावनेच्या भरात बोललो असे सांगत अनंतमूर्ती यांनी नंतर भूमिका बदलली. अमेरिका आणि चीनप्रमाणे एक प्रबळ देश बनावा अशी धारणा असणाऱ्या तरुणांना मोदींनी आकर्षित केल्याचे अनंतमूर्ती यांनी मान्य केले.

विभागनिहाय मतमोजणीला निवडणूक आयोगाचा विरोध
नवी दिल्ली:मतमोजणीचा विभागनिहाय निकाल घोषित करण्याची प्रथा असून अशा प्रथेला निवडणूक आयोगाने विरोध दर्शविला आहे. मतदानाची प्रक्रिया गुप्त राखण्याची प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एकत्रित मोजणी प्रक्रिया सुरू करावी, असे आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.प्रत्येक मतदान केंद्रावरील निकाल जाहीर घोषित करण्याबाबतच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला लिहिण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. आयोगाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी ७ जुलै रोजी मुक्रर केली आहे.विभागनिहाय मतदानाचा निकाल घोषित करणे म्हणजे गुप्त मतदानाच्या प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रकार आहे, त्यामुळे ही प्रथा बंद करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

७,५०२
लोकसभा निवडणुकीत ८,७४८ उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यांपैकी तब्बल ७,५०२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.  १७९ मतदारसंघांत काँग्रेसच्या  तर ६२ मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली.
आता संघर्षांसाठी तयार
 आता संघर्षांची वेळ आली असून आपण त्यासाठी तयार आहे.उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी सध्या पोषक वातावरण नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असतानाही अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात मतदारांनी काँग्रेसवर विश्वास दाखविला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. निकालांबाबत लवकरच फेरआढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.आता कार्यकर्त्यांनी संघर्षांसाठी सज्ज राहावे.

मी अजून मंत्रिमंडळ निवडलेले नाही. माध्यमांनी मात्र आठ ते दहा मंत्रिमंडळे निवडली आहेत. प्रत्येक वृत्तवाहिनीने स्वत:चे मंत्रिमंडळ तयार केले आहे. माझे कॅबिनेट अजून तयार झालेले नाही. त्यांनी मात्र अनेक मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. इतकेच काय खातेवाटपही जाहीर केले आहे. ही खाती त्यांना का सोपवली जातील याचेही तपशील ते देत आहेत. ते सगळे अंदाज एकत्र केल्यावर त्यांचे मंत्रिमंडळ बरोबर येईल. काही असू देत त्यांनी माझे काम सोपे केले आहे. आता बातम्यांची प्रत माझ्याकडे पाठवा.
नरेंद्र मोदी, नियोजित पंतप्रधान