नंदुरबारच्या राजकारणात काँग्रेस वा केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना शह देण्याच्या उद्देशानेच मंत्रिपदावर गडांतर येणार याची कल्पना असतानाही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मुलीला भाजपच्या वतीने उभे करण्याचा निर्णय घेतला. परिणामी डॉ. गावित यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याचे पत्रच राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला असताना गेल्या दहा वर्षांमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. नंदुरबार जिल्हा परिषद पाच वर्षांंपूर्वी जिंकली होती. जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये काँग्रेसला पराभूत केले. आदिवासी विकासमंत्री म्हणून खात्याचा उपयोग त्यांनी जिल्ह्यात आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केला. त्यामुळे आघाडीचे सरकार २००९ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यावर डॉ. गावित यांच्याकडे आदिवासी विकास हे खाते सोपविले जाणार नाही, अशी अटच काँग्रेसने घातली होती. यामुळे त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे कमी तुलनेतील महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. काँग्रेस आणि डॉ. गावित यांच्यातील वाद वाढतच गेला. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवून डॉ. गावित यांना झटका दिला. नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी गावित यांची कोंडी केली. त्यातच घोटाळ्याप्रकरणी गावितांविरोधात न्यायालयात केलेल्या याचिकेमागे स्थानिक काँग्रेस नेत्यांचा हात असल्याचे बोलले जाते. गावितांविरोधात खटला दाखल करण्यास परवानगी सरकारने टाळली होती़