भाजपशी निवडणूकपूर्व युती केल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजकीय कोलांटउडी मारण्यात पासवान चांगलेच तरबेज असल्याची टीका नितीशकुमार यांनी केली आहे.
गोध्रात २००२ मध्ये उसळलेल्या दंगलींमुळे आपण एनडीएची साथ सोडली, असे पासवान यांनी केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानातही सांगितले होते. मात्र आता पासवान यांनी भाजपशी हातमिळवणी केली असून नरेंद्र मोदी यांची स्तुती सुरू केली आहे. गोध्रातील दंगलींमागे मोदी यांचा हात असल्याचा आरोप आहे, असे नितीशकुमार म्हणाले. अशा प्रकारे सहजासहजी राजकीय कोलांटउडय़ा मारणारा नेता कोणीही पाहिला नाही, असेही ते म्हणाले.सध्याच्या निवडणुकीत नितीशकुमार यांना कोणतेही महत्त्व नसल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव सातत्याने सांगत आहेत. अशी स्थिती असेल तर त्यांना निवडणुकीच्या प्रत्येक सभेत आपले नाव घेण्याची गरजच का भासते, असा सवालही या वेळी नितीशकुमार यांनी केला.