लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तीन वेळा अर्थमंत्रिपदाची धुरा संभाळणाऱ्या पी. चिदंबरम यांनी गुरुवारी भावुक होत अर्थमंत्रालयाचा निरोप घेतला. मात्र अर्थमंत्रालयाचा निरोप घेतल्यानंतरही सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मतदानोत्तर चाचण्यांनी केंद्रात भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापाश्र्वभूमीवर चिदंबरम (६८) यांनी आपल्या विभागाचा निरोप घेतला आहे. आपल्या अर्थमंत्रिपदाच्या कारकिर्दीत नऊ केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या चिंदबरम यांना मोरारजी देसाईंचा १० अर्थसंकल्पांचा विक्रम मोडता आला नाही. मात्र अर्थमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अर्थमंत्रालयाचा निरोप घेतला भावुक झालेले चिदंबरम म्हणाले की, १९६६ पासून मी रोज १६ तास काम करीत आहे. तसेच यापुढेही सार्वजनिक जीवनात असाच सक्रिय राहण्याचा माझा निर्धार आहे.
अर्थमंत्रिपद सांभाळणाऱ्या चिदंबरम यांनी १९९७-९८ मध्ये अनेक धाडसी निर्णय घेत अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.  नोव्हेंबर २००८ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री शिवराज पाटील यांच्याजागी पी चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र  २६ जून २०१२ रोजी प्रणब मुखर्जी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहिल्यानंतर चिदंबरम यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये तिसऱ्यांदा अर्थमंत्रालयाचा कारभार हाती घेतला होता.