लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकार आणि पक्षसंघटनेच्या नेतृत्वाबाबतचा निर्णय अलीकडेच परदेशातून परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पातळीवर या आठवडय़ात घेतला जाणार आहे.
राज्यातील पराभवाची कारणमीमांसा करण्याकरिता नेमलेल्या ए. के. अ‍ॅन्टोनी समितीसमोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली. अशोक चव्हाण आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांनी पराभवाचे सारे खापर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांवर फोडले. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी केली जात आहे. गेल्या आठवडय़ात नेतृत्वबदलाच्या मागणीचा जोर कमी करण्यात मुख्यमंत्री चव्हाण यशस्वी झाले होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभय दिले असले तरी राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांचे वेगळे मत आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असल्यास राज्यात नेतृत्वबदल करावा, असा पक्षात एक मतप्रवाह आहे. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार
आहे.
लोकसभेतील दारुण पराभवानंतरही काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीत फारसा बदल झालेला दिसत नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली तरी कोणताही निर्णय घेतला जात नाही. नेतृत्वाबाबत निर्माण झालेली अस्थिरता दूर केल्यास पक्षाची यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागेल. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दिल्लीकडे नजर लावून आहेत. पण अद्याप कोणताही निर्णयच होत नाही. आसाममध्ये मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्या विरोधात आमदारांनी बंड पुकारले आहे. लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि शिवसेनेतून दाखल होऊन काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झालेल्या आशीष कुळकर्णी यांनी निरीक्षक म्हणून आमदारांचे म्हणणे गेल्याच आठवडय़ात ऐकून घेतले आहे.
परदेशात आपला वाढदिवस साजरा करून परतलेले राहुल गांधी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि आसाममधील पक्षांतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे या दोघांच्या भवितव्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता पुढील ६० दिवसांमध्ये कधीही जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता सरकार अथवा पक्षसंघटनेत बदल करून कितपत फायदा होईल याचा आढावा घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांच्या विरोधात तक्रारी असल्या तरी विधानसभा निवडणुकीची सूत्रे या उभयतांकडेच असावी, असा पक्षात एक मतप्रवाह आहे. हरियाणामध्ये मुख्यमंत्री हुड्डा यांना बदलले जाण्याची शक्यता कमी आहे. राहुल गांधी यांचे पृथ्वीराजबाबांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे मुख्यमंत्री तगतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.
तीन राज्यांबाबत राहुल गांधी सर्वसंबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतील, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi to take decision on maharashtra leadership
First published on: 30-06-2014 at 02:58 IST