‘मी पंडित बोलतोय.. तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतोय..’ मतदानासाठी निघत असताना पहाटेच काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा फोन खणाणला. ‘धन्यवाद! पण, मी आंबेडकरी विचारांचा आहे. कसलेही विधी करणार नाही.’ असे गायकवाडांनी नम्रपणे सांगितले आणि आपल्या कामाला लागले. ते बुधवारीच पत्नीसह मुलगी वर्षां गायकवाड यांच्या प्रतीक्षानगर येथील घरात मुक्कामाला गेले होते. रात्री जागरण न करता त्यांनी पुरेशी झोप घेतली होती. त्यामुळे चेहरा प्रसन्न दिसत होता. पत्नीने त्यांना टिळा लावला आणि पाया पडल्या. गायकवाड फोनवरून कार्यकर्त्यांना सूचना देत सकाळी ७.०० वाजता मतदानासाठी बाहेर पडले.
गायकवाड यांच्या चेहऱ्यावर अजिबात ताण दिसत नव्हता. मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवार अनेक ‘उद्योग’ करीत फिरत असतात. पण गायकवाड बुधवारी दिवसभर मुलीच्या घरात बसून होते. एक मौलवी त्यांना एक तावीज देऊन गेला. त्याचे मन दुखावू नये म्हणून तो त्यांनी ठेवून घेतला. पत्नी आणि मुलीसमवेत त्यांनी धारावीत मतदान केले. त्यानंतर पत्नीला घरी सोडले आणि मतदारसंघात फेरफटका मारण्यास निघाले. वाटेत त्यांच्या वाहनचालकाने गाडी थांबवून स्वत:चेही मतदान आटोपून घेतले. गाडीतील त्यांचा स्वीय साहाय्यक छोटय़ा-मोठय़ा तक्रारी करीत होता. पण त्याला ते शांत राहण्यास सांगत होते. प्रचारात चांगला प्रतिसाद मिळाल्याने मला कसलेही टेन्शन नाही, असा त्यांचा दावा होता. सगळ्यांना कामे वाटून दिली आहेत आणि ती ते करतील, असा विश्वासही त्यांच्यावर टाकला. धारावी, ट्रॉम्बे, चिता कॅम्प, मानखुर्द, गोवंडी, महाराष्ट्रनगर, सुभाषनगर, चेंबूर, माहुल, म्हैसूर कॉलनी आदी भागात ते मतदान केंद्रांवर जाऊ लागले. त्यांची गाडी येताच कार्यकर्त्यांचा गराडा पडायचा. आपल्या नेत्याला पाहिल्यावर त्यांच्यात उत्साह येई. मग ते लगेच फोटो काढण्यासाठी पुढे येत. महिलाही गायकवाडांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होत्या. काही ठिकाणी हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
जखमी पोलिसाची चौकशी
रात्री शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणात एक पोलीस जखमी झाला होता. गायकवाडांनी रुग्णालयात जाऊन त्याची विचारपूस केली. अकराच्या सुमारास ते एका हॉटेलात न्याहारीसाठी गेले. सर्व जण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते.
अनेकांनी पुढे येऊन गायकवाडांशी हस्तांदोलन केले. आजच्या निर्णायक दिवशीही एवढे शांत कसे, असे विचारल्यावर ते खळखळून हसले. मी अनेक वर्षे राजकारणात काढली आहेत. त्रागा करून, चिडचिड करून काहीच साध्य होत नाही. लोकांना माझी कामे माहीत आहेत आणि काँग्रेसच्या धोरणांवर विश्वास आहे. त्यामुळे मला चिंता नाही, असे उत्तर त्यांनी दिले. खरोखरच दिवसभरात गायकवाड कुठे चिडलेले-संतापलेले दिसले नाहीत.