18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

राहिबाईची ‘बियाणे बँक’

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला

प्रकाश टाकळकर | Updated: June 17, 2017 1:43 AM

 

कोंभाळणे हे अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील एक आदिवासी खेडेगाव. गावाच्या एका टोकाला आदिवासी शेतकऱ्यांचे एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. घराच्या मागील डोंगरावर कथित विकास दर्शविणारी भिरभिरणारी पवनचक्क्यांची पाती, घराच्या एका बाजूला उतरत्या छपराचा गोठा, त्यात चार-पाच म्हशी. दुसऱ्या बाजूला अशाच उतरत्या छपराची एक खोली. त्या खोलीत प्रवेश करताच समोर जे दिसते ते पाहून कोणीही आश्चर्यचकित होते. पारंपरिक पद्धतीचे गाडगे, मडके, प्लास्टिकचे टीप, बाटल्या, प्लास्टिकच्या चौकोनी पेटय़ा ओळीने मांडून ठेवलेल्या. त्या प्रत्येकात वेगवेगळ्या प्रकारची बियाणे ठेवलेली. ही आहे राहिबाई सोमा पोपेरे (वय ५५) या आदिवासी महिलेची बियाणे बँक. विविध प्रकारच्या ५३ पिकांचे ११४ वाणांचे बियाणे येथे आहेत. हे सर्व गावरान बियाणे आदिवासींनी परंपरेने जपलेले. हे घर म्हणजे राहिबाईंचे ‘रिसर्च सेंटर’च आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’ असा केला होता. एका जीन बँकेच्या उद्घाटनाचे प्रमुख अतिथी असणाऱ्या अभय बंग यांनी ‘हा मान तुमचा’ असे सांगत फीत कापण्याचा मान राहिबाईंना दिला होता. नुकत्याच राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंच्या उपस्थितीत झालेल्या कृषी खात्याच्या एका कार्यक्रमात राहिबाई प्रमुख अतिथी होत्या. आज राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. या बियाणे बँकेला भेट दिल्यानंतर आणि राहिबाईंशी बोलल्यानंतर या सर्वाची यथार्थता पटते.

राहिबाईंचे माहेर कोंभाळणे गावातलेच. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. अनेक वष्रे घर आणि शेत याशिवाय त्यांना दुसरे काही माहीत नव्हते. त्यांच्या सासऱ्याचा दराराच इतका होता की, दुसऱ्याशी बोलायचीही हिंमत नसे. राहिबाई निरक्षर आहेत. लहानपणी शिक्षण मिळाले नाही, पण वडिलांकडून खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. परंपरेने आलेले निसर्गाबद्दलचे हे ज्ञान त्यांनी जोपासले, वाढवले. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या. शेतात त्याचा वापर करायच्या. सुमारे दशकभरापूर्वी ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे यांनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे १७ पिकांचे ४८ प्रकारचे वाण होते. पुढे ‘बायफ’च्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक दिशा मिळाली. आज राहिबाईंच्या बियाणे बँकेत ५३ पिकांचे ११४ वाण आहेत. कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा आदी १० पिकांचे ३५ वाण. भात, बाजरी, गहू, नागली आदी तृणधान्याच्या सहा पिकांचे ३४ वाण. गळीत धान्यांमध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस, खुरासणी या ५ पिकांचे ११ वाण. विविध प्रकारच्या भाजीपाल्यातील २६ पिकांचे ३२ वाण. रानभाज्यांमध्ये ६ प्रकारचे कंदांचे १२ वाण. शिवाय त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच-तीन एकर परिसरांत विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक वाणाची वैशिष्टय़े, उपयोग याची त्यांना खडान्खडा माहिती आहे. एखाद्या वाणाबद्दल विचारल्यानंतर ते कुठून आणले? ते औषधी आहे की नाही? त्याचा उपयोग काय? कुठे येते? अशी सर्व माहिती त्या सहजतेने सांगतात. हे ऐकल्यानंतर निरक्षर राहिबाई या बियाणांचा ज्ञानकोश असल्याची खात्री पटते. घराच्या परिसरातही त्यांनी विविध प्रकारच्या वनस्पतींची जोपासना केली आहे. त्यात फळझाडे, भाज्या, वेल यांचा समावेश आहे. हा सर्व परिसर हलक्या प्रतीच्या जमिनीचा. ही झाडे कधी सांडपाण्यावर, तर कधी डोक्यावर पाणी वाहून, कधी बलगाडीने पाणी वाहून त्यांनी जगविली. उन्हाळ्यात झाडांचा बचाव करण्यासाठी स्टोन मन्चिंग (दगडांचे आच्छादन) तंत्राचा त्यांनी वापर केला. परिसरातील डोंगरावरून गारगोटय़ा गोळा करून त्या झाडाच्या खोडाभोवती पसरवायच्या. त्यामुळे झाडाला घातलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. झाडाभोवती गारवा टिकून राहतो. तेथे गवत उगवत नाही, झाडाला उधई लागत नाही. परंपरेने आलेल्या अशा अनेक गोष्टी राहिबाईंकडे आहेत. विशेष म्हणजे या सर्व झाडांची जोपासना सेंद्रिय पद्धतीने केली जाते.

वेगवेगळ्या पिकांसंदर्भात, बियाणांसंदर्भात आलेले ज्ञान राहिबाईंनी जपले, जोपासले, वाढवले आणि आता त्याच्या प्रसारासाठी त्या झटत आहेत. आरोग्यदायी जीवनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागांत पोहोचले आहेत. काही वर्षांपूर्वी जी महिला दुसऱ्या माणसाशी बोलायला घाबरायची, तीच महिला आज पारंपरिक वाणांची महती सांगत आहे. पारंपरिक वाणांचा प्रसार हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले आहे.

अकोल्यासह जुन्नर, संगमनेर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत लोकपंचायत या संस्थेने केलेल्या कृषी जैवविविधता सर्वेक्षणानुसार या चार तालुक्यांत आदिवासी भागात आजही ५० टक्के शेतकरी गावरान बियाणांचा वापर करतात. ४१ टक्के शेतकरी गावरान वाणांची लागवड घरगुती वापरासाठी करतात, तर ३६ टक्के शेतकरी बाजारात विक्रीसाठी करतात. उर्वरित २१ टक्के शेतकरी दोन्ही कारणांसाठी लागवड करतात. अति पावसाच्या प्रदेशात आजही स्थानिक वाणांना बऱ्यापकी प्राधान्य दिले जात आहे. हे गावरान वाण टिकवण्यात आदिवासी महिलांचा मोठा वाटा आहे. राहिबाई पोपेरे ही या सर्व आदिवासी महिलांचा ‘चेहरा’ आहे असे म्हणता येईल.

देशी वाणांची अनोखी चळवळ..

काही वर्षांपूर्वी हळदीकुंकवात राहिबाईंनी वाण म्हणून झाडांची रोपे द्यायला सुरुवात केली. आपल्या रोपवाटिकेत तयार केलेली पाचशे-सहाशे रोपे त्या दरवर्षी वाटत असतात. डांगी जनावरे हे या परिसराचे एक वैशिष्टय़, पण त्यावरील लोकांचे आकर्षण कमी होऊ लागले होते. राहिबाईंनी या गावात डांगी जनावरांचा पोळा सुरू केला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ममताबाई भांगरे (देवगाव), शांताबाई धांडे (आंबेवंगण), जनाबाई भांगरे (जायनावाडी), हिराबाई गभाले (मान्हेरे), सोनाबाई भांगरे (िपपळदरावाडी) अशा अनेक महिला त्यांच्या चळवळीत सहभागी झाल्या आहेत. एक वेगळीच चळवळ राहिबाईंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अकोले तालुक्याचा आदिवासी भाग हा देशी वाणांचे आगर आहे. संकरित बियाणांच्या आक्रमणापुढे हे देशी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर होते. मात्र आता त्यांच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

prakashtakalkar11@gmail.com

((     ‘बीजमाता’ राहिबाई पोपेरे.   ()))

First Published on June 17, 2017 1:43 am

Web Title: preservation of seeds seeds bank