सध्याच्या धावत्या युगात कोणत्या पिकातून चांगला नफा मिळेल याचा अभ्यास करून आधुनिक शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. हाच कित्ता गिरवत आणि त्याला मेहनतीची जोड देत चिंचवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील अभय चौगुले या तरुणाने एका एकरात झेंडूची शेती केली आणि फक्त चार महिन्यांत तब्बल अडीच लाखांचा नफा कमावला. आता याच तरुणाने एका एकरात शेवंतीचीही लागवड केली आहे. यातही चांगला लाभ होईल, असा त्याला विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका एकरात तब्बल १६ टन झेंडू फुलाचे उत्पादन घेऊन तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या अभयचे उदगावमध्ये वर्कशॉप आहे. मंदीमुळे वर्कशॉप चालवताना अडचणी आल्याने त्याने  शेतीकडे मोर्चा वळवला. अभयच्या कुटुंबाची वडिलोपार्जति सात एकर बागायती शेती आहे. वडील सुरेश आणि बंधू रमेश यांच्या मदतीने शेतात ऊस, टोमॅटो या पिकांसह भाजीपाला घेतला जातो. अभयने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कोलकाता भगवा या जातीच्या झेंडूची ७ हजार ५०० रोपांची लावणी केली. सुरुवातीला शेतात शेणखत टाकून उभी आणि आडवी नांगरणी केली. नंतर चार फूट अंतराच्या सऱ्या सोडल्या आणि झेंडूच्या पिकासाठी जमीन तयार केली. साधारण दीड फूट अंतराने झेंडूच्या रोपांची लावण केली. रोपे लावणीनंतर आठवडय़ाने आळवणी केली. पाटपाणी असल्याने प्रत्येक तीन दिवसांनी झाडांची वाढ चांगली व्हावी, यासाठी दीड महिना हातानेच लागवड आणि औषधांची आळवणी केली.

रोपांची लागवड टोकण पद्धतीने करण्यात आली होती. झाडाची भरणी करताना रासायनिक खते वापरल्याने झाडांची वाढ जोमात झाली. यामुळे झाडे जमिनीवर पडू लागली. त्यासाठी तार व काठीच्या साहाय्याने झाडे बांधून घेतली. प्रारंभीला म्हणजे सुरुवातीच्या ३० दिवसांपर्यंत आलेल्या कळ्या तोडून टाकल्या. मग सुमारे ४५ दिवसांनंतर फुलांची पहिली तोडणी केली. अर्थात, झेंडूच्या झाडांची वाढ चांगली व्हावी आणि रोगाचा प्रादुर्भाव व फुले आकर्षक तसेच मोठी व्हावीत, यासाठी वेळावेळी औषधांची फवारणी करत राहिलो, असे अभयने सांगितले.

चार महिन्यांत १३३० कॅरेटचे विक्रमी उत्पादन घेतले आणि यातून २ लाख ४० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे अभयने सांगितले. नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतात कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास निश्चितच फायदा होतो, हा आदर्श अभय सुरेश चौगुले याने इतर शेतकऱ्यांपुढे घालून दिला आहे.

  • झेंडू फुलाच्या पहिल्या तोडणीत तीन कॅरेट फुले मिळाली. एका कॅरेटमध्ये १२ किलो फुले भरतात. चार महिन्यांत एकूण १३३० कॅरेटचे विक्रमी उत्पादन घेतले. म्हणजे जवळजवळ १६ टन झेंडू फुलांचे उत्पादन मिळाले. या कालावधीत अभयला १० ते ७० रुपये प्रतिकिलो दराने फुलांची विक्री झाली.
  • शेवटच्या दोन महिन्यांत मात्र दर कमी आला. मात्र तरीही १७ तोडण्यांत एक एकरासाठी ४ लाख ४२ हजार रुपये उत्पन्न चार महिन्यांत मिळाले. २ लाख २ हजार रुपये खर्च जाता निव्वळ २ लाख ४० हजारांचा नफा झाला.
  • खर्चाचा हिशोब सांगताना अभय म्हणाला की, रोपांसाठी १० हजार खर्च आला. तार-काठीसाठी १२ हजार, तर खते आणि औषधे यांच्यासाठी साधारण ३० हजार खर्च आला आणि मजुरांच्या मजुरीचा खर्च ८० हजार रुपये आला. आता नफ्याचा हाच दृष्टिकोन ठेवून अभयने शेवंतीच्या फुलझाडांचीही लागवड केली आहे. यातही चांगला नफा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

ainapurem1674@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marigold flower farming
First published on: 22-07-2017 at 00:58 IST