dw-126६०-७० वर्षांपूर्वीच्या दक्षिण भारतातील लोकजीवनाचे आपल्या ‘व्यंग’चित्रांतून अतिशय खुमासदार पद्धतीने चित्रण करणारे ‘आर्टुनिस्ट’ गोपुलु यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्यांच्या कलेचे सखोल जीवनवादी विवेचन..

मोठा चष्मा, प्रसन्न चेहरा, मंद स्मित, निळसर हाफ शर्ट, पांढरी लुंगी असे हे गोपुलु चेन्नईतल्या आपल्या प्रशस्त बंगल्यात फुलझाडांशी बोलत आनंदाने फिरत आपल्याशी बोलत असतात. मधूनच आठवणींत रमून जातात आणि साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या मद्रासमध्ये (आत्ताचं चेन्नई) फेरफटका मारतात.

‘‘माझा काळ अतिशय वेगळा होता.’’ गोपुलु हसतमुखाने सांगत असतात- ‘‘त्यावेळचं मद्रास म्हणजे एक मोठं खेडं होतं. सगळे लोक एकमेकांना ओळखायचे. प्रचंड स्वस्ताई होती. पत्ता सांगतानासुद्धा लोक घरांच्या खाणाखुणा सांगायचे!’’

गोपुलुंचा जन्म तंजावरचा. १९२४ सालचा. पण शिक्षण झालं कुंभकोणम्ला. मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंब. त्या काळातील वातावरणाप्रमाणे अत्यंत कर्मठ. एकत्र कुटुंबपद्धती. घरात भरपूर लोक. त्यांच्या मोठय़ा भावाला चित्रकला शिकवायला एक शिक्षक घरी यायचे. त्यातून यांनाही चित्रकलेची गोडी लागली. घराजवळ एक चित्रकार राहायचे. त्यांचं पाहून यांनाही आपण चित्रकार व्हावंसं वाटू लागलं. पण घरातले सर्वजण रेल्वेत नोकरी करायचे. वडील, भाऊ, मेव्हणे.. आणखी बरेचजण. पण गोपुलुंना चित्रकारच व्हायचं होतं. वडील नाराज झाले.

‘‘त्यामुळे घरात रुळावरून घसरलेली गाडी फक्त माझीच होती!’’ गोपुलुंची विनोदबुद्धी ही अशी अधूनमधून डोकावत असते.

वयाच्या सतराव्या वर्षी ते मद्रासला आले. त्यावेळी ‘आनंद विकटन्’ या प्रख्यात तामिळ साप्ताहिकाचे चित्रकार माळी यांच्याशी त्यांची भेट झाली. गोपुलुंची चित्रकला त्यांना आवडली. त्यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी त्यांनी गोपुलुंकडून ‘राम पट्टाभिषेकम्’ हे चित्र काढून घेतलं. माळी यांनीच ‘गोपुलु’ हे नवं नाव त्यांना दिलं. खरं तर त्यांचं मूळ नाव होतं- गोपालन्! गोपुलु हे इतके श्रद्धाळू आहेत, की त्यांनी हे पहिलं चित्र आणि त्यांचे गुरुस्थानी असलेले माळी यांचं त्यांनी काढलेलं चित्र देव्हाऱ्यात ठेवावं तसं जपून ठेवलंय!

‘‘त्याकाळी खूप स्वस्ताई आणि साधेपणा होता!’’ गोपुलु पुन्हा आठवणींमध्ये रमतात.. ‘‘अनेक प्रकाशकांसाठी मी छोटी-मोठी चित्रं काढू लागलो. एका लॉजमध्ये राहायचो व जेवायचो. दोन्ही वेळचं जेवण आणि नाश्ता याचा महिन्याभराचा खर्च तब्बल सात रुपये होता! तरीही मी फार काटकसरीने राहायचो. नंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि मी मद्रास सोडून पुन्हा कुंभकोणम्ला परतलो. युद्धाचे दिवस संपल्यावर पुन्हा मद्रासला आल्यावर चित्रकार माळी यांनी मला पुन्हा ‘आनंद विकटन्’मध्ये चित्रकार म्हणून नोकरी दिली. आणि १ जानेवारी १९४५ रोजी मी रुजू झालो. पुढे जवळपास वीस र्वष मी तिथे नोकरी केली.’’

‘‘माझा पहिला पगार शंभर रुपये होता. आणि मी काटकसरीने राहून घरी वडिलांना पन्नास रुपये पाठवायचो! त्याकाळातलं मद्रास वेगळं होतं. ते दिवस कॉफीचे होते, ‘कॅपेच्युनी’चे नव्हते!’’ अस्सल व्यंगचित्रकाराला शोभेल असं भाष्य ते करतात.

‘आनंद विकटन्’मधली त्यांची कारकीर्द अत्युत्कृष्ट अशी होती. त्यांनी अक्षरश: हजारो चित्रं काढली. अनेक कथांची रेखाटनं केली, स्वतंत्रपणे राजकीय व्यंगचित्रं काढली. हास्यचित्रं काढली. मुखपृष्ठं केली. धार्मिक गोष्टींवर आधारित चित्रं काढली. असं म्हणतात की, त्यांच्या चित्रांमुळे अनेक कथांमधली पात्रं जिवंत झाली आणि त्यांच्या चित्रांमुळे या कथा अधिक लोकप्रिय झाल्या. प्रत्येक कथा अनेक भागांमध्ये प्रकाशित होत असे. गोपुलु प्रत्येक भागासाठी नव्यानं चित्रं काढायचे. ती पाहण्यासाठी अनेक लोक मुद्दाम हे साप्ताहिक विकत घ्यायचे.

उदाहरणार्थ, मद्रासमधला मुलगा वॉशिंग्टनला जाऊन लग्न करतो, अशा आशयाची एक कथा होती. त्यांचे असंख्य नातवाईक- म्हणजे अस्सल तामिळी ब्राह्मण हे तिथे जातात आणि आपल्या पद्धतीने लग्नसमारंभ साजरा करण्याचा प्रयत्न करतात. (आपल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’सारखंच थोडंसं!) त्यातून जी धमाल उडते, त्यावर गोपुलु ते सर्व काल्पनिक प्रसंग चित्रांद्वारे रेखाटून जिवंत करतात!

या चित्रमालिकेतील एक चित्र नमुना म्हणून पाहता येईल. अमेरिकेत गेलेल्या या तामिळ ब्राह्मण बायका रांगोळी घालण्याचा आपला हट्ट पुरा करताना दिसताहेत. त्या रांगोळी घालताना अमेरिकन पाहुणे मंडळी हा ‘आर्ट फॉर्म’ मोठय़ा अचंब्याने पाहताहेत. या चित्रात असंख्य पात्रं गोल करून उभी आहेत. पण मुख्य म्हणजे अमेरिकन माणसांची आणि भारतीय माणसांची चेहरेपट्टी गोपुलुंनी स्पष्टपणे वेगळी रेखाटली आहे. अगदी काळं-पांढरं चित्र असलं तरी अमेरिकन मुलाचे केस सोनेरी आहेत हे जाणवतं. ही गोपुलुंची खासियत!

अनेक लेखकांबरोबर ते देशभर फिरले. अजंठा, वेरुळ, दिल्ली, जयपूर, कलकत्ता इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांनी शेकडो चित्रं काढली. ती सर्व विलक्षण लोकप्रिय झाली. पण गोपुलुंचं खरं सामथ्र्य होतं ते जुन्या काळातील तामिळ कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील दैनंदिन प्रसंग हुबेहूब चितारण्यात.. त्याला विनोदाची डूब देऊन! एकापरीने अमेरिकेत प्रख्यात चित्रकार नॉर्मन रॉकवेलचं जे महत्त्व आहे, तेच गोपुलुंचं तामिळ संस्कृतीमध्ये!

उदाहरणच द्यायचं झालं तर त्यांची काही प्रसंग-हास्यचित्रं वानगीदाखल घेता येतील. भारतीय संस्कृतीमध्ये बांगडय़ा भरणे हा एक शुभ सोहळा मानला गेला आहे. तामिळ संस्कृतीही त्याला अपवाद नाही. साधारण साठ-सत्तर वर्षांपूर्वीचं हे वातावरण गोपुलुंनी अत्यंत तन्मयतेने रेखाटलंय. रूढार्थाने हे हास्यचित्र नाही, कारण त्यात तसा काही स्पष्ट विनोद नाही. हे नुसतंच प्रसंगचित्रही नाही, कारण त्यात अनेक व्यक्तिरेखा किंचित विनोदी ढंगात भावभावनांसकट रेखाटल्या आहेत. तरीही हे चित्र पाहताच (खरं म्हणजे आपण ते पाहतच राहतो!) आपल्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते. याचं कारण यातील प्रत्येक पात्र विविध हावभावांसकट या चित्रातील आपली व्यक्तिरेखा स्पष्टपणे उमटवतं.

सदर चित्राचा विषय हा ‘ओटी भरणे’च्या संदर्भात आहे. मुलगी आठव्या महिन्यात माहेरी आल्यानंतरच्या समारंभात ‘बांगडय़ा भरणे’ हा तो कार्यक्रम. अंदाजे ४०-४२ पात्रं असलेल्या या चित्रातील पात्रांची गर्दीच आपल्याला प्रथम गुंगवून सोडते. सगळीकडे फिरून आपली नजर स्थिरावते, ती मध्यभागी. जिच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आखला आहे ती आपल्या गोऱ्यापान हातांमध्ये बांगडय़ा भरण्यासाठी अत्यंत उत्सुकतेने, किंचित लाजत आपला हात त्या समोरच्या कासाराच्या हातात देत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे सोज्वळ भाव मनात अगदी ठसावेत असे आहेत. समोरचा कासार रूपाने ओबडधोबड, काळाशार, कपाळावर तिरुपतीचा भक्त असल्याप्रमाणे मोठं उभं गंध, वाढलेले केस मागे फिरवून शेंडीला गाठ मारलेली आणि तोंडभरून आशीर्वाद देतोय.. ‘या बांगडय़ांच्या आवाजाप्रमाणे तुझ्या लेकरांचे आवाज या घरात किणकिणूदेत!’

मुलीचा गोरापान हात आणि कासाराचा काळा राकट हात हे चित्राच्या मध्यभागी आहेत. बांगडी हाताच्या बोटांतून अजून पुढे सरकली नाहीये. काही बांगडय़ा आधीच भरून झाल्याहेत. कासाराच्या करंगळीत एक बांगडी अडकलेली आहेच. शेजारच्या त्याच्या पेटीत असंख्य रंगांच्या बांगडय़ा दिसताहेत. उत्सवमूर्ती असलेली ही मुलगी नखशिखान्त नटली आहे. दक्षिणेकडील पद्धतीप्रमाणे तिने लांबच लांब गजरे, वेण्या घातल्या आहेत. कानातलेही मोठे ठसठशीत. कमरेला चांदीची मेखला दिसतेय. अंगावरचे लुगडेही बहुधा कांजीवरम् सिल्क असावं. तिची बसण्याची पद्धतही त्या काळातील मुलींची विनम्रता दाखवणारी अशीच आहे.

dw-127त्यानंतर आपली नजर फिरते आजूबाजूच्या पात्रांवर. जमलेल्या चाळीसएक पात्रांत निम्म्या विविध वयोगटांतील स्त्रिया आहेत, तर उरलेली लहान मुलं आहेत. या सर्व स्त्रियांचे चित्रण विलक्षण देखणं आहे. तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असं आहे. चेहऱ्यावरचे विविध हावभाव- उदा. आनंद, उत्सुकता, गंभीर, निर्विकार, तृप्त.. वगैरेमुळे या चित्राला जिवंतपणा येतो. एका आईचा आपल्या मुलीवर ओरडतानाचा चेहरा अगदी झकास! इतक्या स्त्रियांचे वेगवेगळे चेहरे, त्यांच्या जरीच्या साडय़ा, दागिने, फुलं.. हे सारं बघत राहावं असं आहे.

कासाराच्या मागे उभी असलेली- जिच्यासाठी हा समारंभ आयोजित केलाय तिची लहान बहीण असावी. बांगडय़ांचे हिशेब लिहिते आहे. वाकून कौतुकाने बघणारी मावशी किंवा काकू, पांढऱ्या केसांची चष्मा घातलेली छोटी आजी या सर्व व्यक्तिरेखा आपल्याला याच कुटुंबाचा भाग आहेत हे स्पष्टपणे जाणवतं.

लहान मुलांचं चित्रीकरण हे तर गोपुलु यांचं विशेष आवडतं स्पेशलायझेशन असावं. या चित्रात विविध वयोगटांतील बारा मुलं त्यांनी रेखाटली आहेत. त्यात अगदी जवळ असलेल्या, उगाचच पोक्तपणा दाखवणाऱ्या सात-आठ वर्षांच्या दोन मुली साडी वगैरे नेसून काहीतरी मोठय़ा बायकांसारखं बोलताहेत. तिच्या शेजारील अडीच-तीन वर्षांची चिमुकली परकर-पोलकं नेसून स्वत:च्याच नादात आहे. तिचीही घट्ट वेणी घातलीय. तिच्यापेक्षा तिचा दीड-दोन वर्षांनी मोठा असणारा भाऊ मनापासून केळं खाण्यात गुंग आहे. इकडे डाव्या बाजूला चांगली ऐंशी-पंचाऐंशी वर्षांची मोठी आजी मांडीवर दीड वर्षांच्या पणतूला जोजवतेय. त्याच्या हातापायातले चांदीचे वाळे त्याचं वय सांगताहेत. त्याची पाच वर्षांची थोरली बहीण ‘मलाही बांगडय़ा भरायच्याहेत,’ असं म्हणून पणजीकडे भुणभुण लावतेय. तिच्याही पायात पैंजण आहेत. या मोठय़ा आजीच्या चेहऱ्यावर अगदी कृतकृत्यतेचे भाव आहेत. तिच्या पलीकडे एक मुलगी शांतपणे बसलीय. तिला दुसरी मुलगी तिने नुकत्याच भरलेल्या बांगडय़ा कौतुकाने दाखवतेय. तिच्या थोडं मागे आणखी एक मुलगी उगाचच (!) कसलातरी हट्ट धरतेय आणि आईकडून ‘शूऽऽ’ असं ओरडून घेतेय!

सगळ्या समारंभात शहाण्यासारखं वागणारी दोन (हुशार) मुलं सगळ्यात पुढे येऊन हा हस्तकंकण समारंभ एन्जॉय करताहेत. नेहमीप्रमाणे दोन द्वाड मुलांना मात्र या सगळ्यापेक्षा एखाद्या दरवाजावर चढून दंगामस्ती करणं अत्यंत महत्त्वाचं वाटतंय!

मोठय़ा पुरुषांना या समारंभात- आणि म्हणूनच चित्रात काही स्थान नाही. (‘आम्ही काय बांगडय़ा भरायला जन्माला आलो आहोत का?’) म्हणूनच मुलीचे वडील दरवाज्याच्या बाहेर पंचाने पाठीवरचा घाम पुसत उभे आहेत!

हा सारा प्रसंग अर्थातच तामिळनाडूमधल्या एका सुखवस्तू, एकत्र ब्राह्मण कुटुंबातला आहे. समारंभ मोठय़ा दिवाणखान्यात आहे. आंब्याच्या पानांचं तोरण, केळीचे घड लावून शुभकार्याची सुरुवात झालेली आहे. जमिनीवर खास मोठी सतरंजी अंथरलेली आहे. भिंतीवर मोठय़ा तसबिरी लावल्या आहेत. एका खिळ्याला सदरा अडकवलाय. इतकंच नव्हे, तर आरसा आणि त्यावर एक मोठा कंगवासुद्धा तिरका अडकवल्याचं दिसतंय. संपूर्णपणे रंगीत असलेल्या या चित्रात गोपुलुंनी इतके विविध रंग वापरलेत, की सर्व पात्रांना आपोआपच एक व्यक्तिमत्त्व प्राप्त होतं. गोपुलुंना शक्य असतं तर त्यांनी या समारंभातला अनेक आवाजांमुळे तयार झालेला गोंगाटही चितारला असता!

दुसरा असाच एक प्रसंग गोपुलुंनी चितारलाय, तो आहे-‘एरंडेल पिण्याचा!’ आपल्याकडेसुद्धा पन्नास-साठ वर्षांपूर्वी अधूनमधून रविवारी सकाळी किंवा शनिवारी रात्री पोट साफ होण्यासाठी घरातील सर्वानी एरंडेल पिण्याचा एक कार्यक्रम व्हायचा! तिकडे तामिळनाडूतही व्हायचा. त्याचंच प्रभावी चित्रण गोपुलुंनी केलंय. एरंडेलाचा अत्यंत घाणेरडा वास, त्याचा गिळगिळीतपणा याचा विलक्षण धसका घेतलेली लहान मुलं आणि त्यांना ते जबरदस्तीने पाजणारी वडीलधारी मंडळी- असा हा एकूण प्रसंग. म्हटलं तर अतिशय साधा अन् (त्याकाळी) घरोघरी साजरा (!) होणारा! पण गोपुलुंनी त्यात एक विलक्षण गंमत आणलीय.

ज्या बालकाला ते पाजण्याचा प्रयत्न चाललाय तो विलक्षण काकुळतीला येऊन रडतोय. तो घाणेरडा वास नाकात जाऊ नये म्हणून त्याने नाक अक्षरश: दाबून धरलंय. अंगावर फक्त चड्डीच आहे त्याच्या. आजी नातवावरच्या प्रेमाने त्याला गोडीगुलाबीने चमचाभर एरंडेल पाजण्याचा प्रयत्न करतेय. तर आई अक्षरश: करवादून गेलीय अन् त्याचं बखोट धरून त्याच्यावर डाफरतेय. याआधी एरंडेल प्यायलेली मुलं उगाचच (!) पोटावर हात धरून पोट दुखतंय असा कांगावा करत आरडाओरडा करताहेत. पाठीमागे वडील अक्षरश: जमदग्नीच्या अवतारात ‘आता घे ते औषध, नाहीतर थोबाड रंगवीन..’ अशी धमकी देताहेत. या सगळ्या प्रकाराकडे आजोबा कमरेवर हात ठेवून अत्यंत कौतुकाने, प्रेमळपणे बघताहेत. त्यांच्या पायाआडून आणखी एक चिमुरडी हळूच हा सगळा प्रकार रडवेली होऊन बघतेय. या नियमितपणे होणाऱ्या प्रसंगाला सरावलेला थोडा मोठा- म्हणजे १०-१२ वर्षांचा मुलगा आणि त्याची मोठी बहीण मागे गंभीरपणे उभे आहेत.

स्वयंपाकघरात साजरा होणारा हा प्रसंग अतिशय परिणामकारक वाटतो, तो त्या सर्व व्यक्तिरेखा, त्यांचे पोषाख (लुंगी, साडी, परकर-पोलकं), चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे यामुळे. शिवाय त्यात भर पडते ती इतर गोष्टींची. म्हणजे स्वयंपाकघरातील दगडी फरशी, पाठीमागचं फडताळ, त्यातील ती जुनी भांडी, पाट, बाटली, फिल्टर कॉफीचं भांडं, शेगडीवरचं दूध (थोडं बारकाईने पाहिलं तर गोपुलु यांनी शेगडीतले निखारेही फुललेले दाखवलेत!).. अंगावरच्या भस्माच्या पट्टय़ांमुळे हे तामिळनाडूतलं अत्यंत धार्मिक, कर्मठ ब्राह्मण कुटुंब आहे याची खात्रीच पटते!

त्यांचं आणखी एक असंच प्रसंग-हास्यचित्र हे रेल्वेस्थानकावरच्या गर्दीचं आहे. रेल्वेची वाट बघणाऱ्या फलाटावर जमलेल्या प्रवाशांच्या गर्दीचं हे चित्र गुंगवून टाकणारं आहे. दक्षिण भारतातील, प्रामुख्याने मद्रास भागातील एक रेल्वेस्थानक. आणि काळ : साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा! नेहमीप्रमाणे गोपुलु यांनी असंख्य व्यक्तिरेखा यात रेखाटल्या आहेत.

चित्राच्या मध्यभागी काळा कोट घातलेला मध्यमवयीन दक्षिणी ब्राह्मण दिसतो. गळ्यात उपरणं, धोतरावर किंवा लुंगीवर बांधलेला पट्टा, डोळ्यावर चष्मा इत्यादी अवतार असलेला हा गृहस्थ हमालाशी घासाघीस करताना दिसतोय. बहुधा, इतकं सगळं सामान  वाहून आणल्यानंतर चार आण्याऐवजी एक आणाच मजुरी कशी योग्य आहे, हा तो वाद असावा! दोन अगदी लहान मुलं फलाटावरून वाकून गाडी दिसतेय का, ते पाहताहेत. आणि ती खूप वाकून बघताहेत म्हणून त्यांची थोडी मोठी बहीण आजोबांकडे त्यांची चहाडी करतेय. आजोबांच्या मागे एक तरुण चोरटय़ा नजरेनं काहीतरी न्याहाळतोय. नेमकं त्याचवेळी एक विक्रेता त्याला ‘डिस्टर्ब’ करतोय. त्यांच्या मागे असंख्य लोकांची गर्दी. दाटीवाटी. त्यातच हमाल डोक्यावरून सुटकेस, वळकटी घेऊन इकडे तिकडे जाताहेत. गाडी थोडय़ाच वेळात येणार असल्याचा इशारा कोपऱ्यातला रेल्वेचा माणूस अडकवलेल्या रुळावर हातोडा मारून देतोय. रेल्वेस्टेशनवरचं घडय़ाळ, जाहिराती, स्टेशनमास्तरच्या केबिनचे दरवाजे.. हे सगळं अगदी तंतोतंत!

चित्रात अगदी पुढे त्या आजोबांची मुलगी व बायको दिसतेय. बहुधा मुलीला सासरी नवऱ्याकडे धाडायला सर्वजण निघाले असावेत, म्हणून सामान प्रचंड आहे. वळकटी, पोती, करंडी, सुटकेस, पिशव्या, डबे, मोठी कच्ची केळी, भाजी, फणस वगैरेसुद्धा आहे. या सर्व सामानावर जांभळ्या रंगाची व्हायलिनची केसही आहे. (कर्नाटक संगीत!) आजीने एक छोटं नातवंड कडेवर घेतलेलं आहे. एकूण चित्र आपण बारकाईने बघत असतानाच आपलं लक्ष अचानक त्या सामानातल्या एका ट्रंकेवर डोक्याला रुमाल बांधून पेंगता पेंगता गाढ झोपलेल्या छोटय़ा बालकाकडे जातं. जणू काही ते बालक या सामानाचाच एक भाग झालंय. व्यंगचित्रकार गोपुलुंच्या या एकूणच चित्ररचनेला आपण सलाम करतो!

गोपुलु स्वत:च सांगतात की, त्यांच्या लहानपणचं वातावरण हे अत्यंत कर्मठ मध्यमवर्गीय अय्यर ब्राह्मणांचं होतं. पण तरीही आम्ही सर्व आनंदी होतो. हाच आनंद मला माझ्या चित्रांतून दाखवायचा असतो. चित्रकाराने आपले डोळे आणि कान नेहमी उघडे ठेवावेत आणि तोंड नेहमी बंद. कारण त्याची चित्रकलाच त्याच्यासाठी बोलत असते, असं ते म्हणत.

ते सदैव स्मितहास्य करत असायचे. म्हणूनच ते दीर्घायुषी ठरले. या वर्षी २९ एप्रिलला ते गेले. वयाच्या एक्याण्णव वर्षांपर्यंत ते चित्रं काढतच होते. वयाच्या अठ्ठय़ाहत्तराव्या वर्षी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांची उजवी बाजू लुळी पडली. त्यावर बोलतानाही त्यांनी हसतमुखानेच ‘हा स्ट्रोक म्हणजे माझ्या ब्रशच्या स्ट्रोकचा परिणाम!’ अशी कोटी केली.

पण त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती. त्यांनी हळूहळू डाव्या हाताने चित्रं काढायचा सराव सुरू केला आणि त्यात त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. कालांतराने उजवा हातही सुधारला आणि त्यांनी दोन्ही हातांनी चित्रं काढणारा चित्रकार अशी ख्याती मिळवली. ‘दोन्ही हातांनी चित्रं काढायला तुम्हाला कसं काय जमतं?,’ असं विचारल्यावर एखाद्या अभिजात कलावंताला शोभेल असं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणाले, ‘‘मी चित्र हाताने नाही, मनाने काढतो!’’

गोपुलु होतेच अभिजात! त्यांची चित्रं त्यांनी पाहिलेला काळ जिवंत करतात. एक प्रकारे त्यांनी हे संस्कृतीचं डॉक्युमेंटेशनच केलंय.

‘तुम्ही चित्रकार म्हणजे आर्टिस्ट आहात. आणि व्यंगचित्रकार म्हणजे कार्टुनिस्टही आहात. तुम्ही स्वत:ला काय समजता?’ या प्रश्नावर गोपुलु म्हणतात, ‘मी आर्टिस्ट नाही आणि कार्टुनिस्टही नाही. मी स्वत:ला ‘आर्टुनिस्ट’ समजतो!’

असे होते आर्टुनिस्ट गोपुलु!
प्रशांत कुलकर्णी