21 January 2021

News Flash

इटली : मात्तिओ सॅल्विनी..  दे धडक!

मात्तिओची कुंडली मांडण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

मात्तिओ सॅल्विनी

इटलीची राजधानी रोममधील जाहीर सभा. सभेला तुफान गर्दी. गर्दीत झेंडे फडकतायत- नवनाझींच्या चिन्हाचे. गर्दीत फलक झळकतायत- इटलीचा एकेकाळचा हुकूमशहा मुसोलिनीच्या कृष्णधवल छायाचित्रांचे. हे झेंडे, हे फलक ज्यांच्या हातात आहेत त्यांच्यात जणू उन्माद संचारलेला. या उन्मादाचे  मुख्य कारण म्हणजे समोरच्या  व्यासपीठावरून बोलणाऱ्या वक्त्याचे जहाल आणि आक्रमक भाषण. वक्ता तरुण. अंगात जीन्स आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट. वक्ता बोलतोय.. ‘त्या रेन्झींकडे लक्ष नका देऊ फारसे. कोण लागून गेले ते? पंतप्रधान असले म्हणून काय झाले? ते तर निव्वळ प्यादे आहेत ब्रसेल्सच्या हातातले. आपल्यापुढील मुख्य समस्या रेन्झी ही नाही.. ब्रसेल्स आहे. त्या तिथे ब्रसेल्समध्ये काहीबाही निर्णय होणार आणि आपण ते चालवून घेणार? का? कशासाठी? नाही चालणार असे. आपण निर्धार करायला हवा. ‘ब्रसेल्स बोले आणि इटली हले’ असे चित्र दिसता कामा नये..’

वक्त्याच्या या वाक्यासरशी समोरच्या गर्दीतून उन्मादपूर्वक आरोळ्या उठतात. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. नवनाझींचे झेंडे, मुसोलिनीची छायाचित्रे अधिकच उंचावली जातात. आणि वक्ता सभा जिंकल्याच्या आनंदात भाषणाला पूर्णविराम देतो.

या वक्त्याचे नाव- मात्तिओ सॅल्विनी. जन्म- १९७३ चा. मिलानमधला. आजमितीचे वय ४३ वष्रे. सध्या नॉर्दन अलायन्स या पक्षाचा सरचिटणीस. आधी युरोपीय संसदेत अनेक पदांवर कामे केलेली. मुळात घरची आíथक परिस्थिती बऱ्यापकी. वडील खासगी उद्योगामध्ये चांगल्या पदावर आणि आई गृहिणी. मात्तिओच्या शिक्षणाविषयीचे तपशील सांगतात की- मिलान विद्यापीठात त्याने हिस्टॉरिकल सायन्स या विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, पदवीपर्यंत तो पोहोचू शकला नाही. इतिहासातील, भूतकाळातील सामग्रीवर विज्ञानाचा अभ्यास करणे मात्तिओला रुचले नाही, जमले नाही, की अन्य काही कारणे त्याची शैक्षणिक गाडी पदवीच्या भोज्यापर्यंतही न पोहोचण्यामागे होती, याची कल्पना नाही. कदाचित त्याचा चळवळ्या स्वभाव आणि त्यास अनुसरून असे भडकावू काम हेदेखील त्यामागचे कारण असावे. हेच कारण अधिक सयुक्तिक वाटते. विद्यापीठात असताना सामाजिक चळवळीत दाखल झालेल्या आणि त्यातच बुडून गेलेल्या पोराच्या शिक्षणाचे पुढे काय होणार, हे सांगायला एखाद्या ज्योतिषाने त्याची कुंडली मांडण्याची गरज नव्हतीच तशी.

मात्तिओने आपल्या राजकीय-सामाजिक चळवळींचा प्रारंभ ज्या ‘लिओनाकावालो’ केंद्रातून केला, ते डाव्या विचारसरणीशी अगदी घट्ट नाते असलेले. हे केंद्र मिलानमध्ये स्थापन झाले १९७५ मध्ये. निम्न आíथक स्तरातील कामगार व इतरांची वस्ती असलेल्या भागात. भोवतालाकडे डाव्या नजरेतून बघणाऱ्या तरुणांचा हा गट. गटात अमका अध्यक्ष, तमका पदाधिकारी असली औपचारिक उतरंड नव्हती. या भागातील लोकांना विविध चळवळींशी जोडून घेणे, काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिणे, थोडक्यात म्हणजे भोवतालातील घडामोडींविषयी लोकांना सजग राखणे हा या केंद्राचा मुख्य हेतू. या अशा डाव्या तरुणांच्या घोळक्यात कोण कुणाची कुंडली मांडायला बसलाय!

पण आज असे वाटते की, मात्तिओची कुंडली मांडण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. कुठल्या स्थानी कुठला ग्रह आहे. या आकाशीच्या हिशेबावर नव्हे, तर इटलीमधील आíथक, सामाजिक, राजकीय परिस्थिती काय आहे, या जमिनीवरील हिशेबावर. हा हिशेब मांडायचा, तर मात्तिओ आज ज्या नॉर्दन लीग पक्षाचा प्रमुख आहे त्याची सन २०१३ मध्ये काय स्थिती होती ते बघावे लागेल. २०१३ च का? तर त्या वर्षी मात्तिओने या पक्षाची धुरा खांद्यावर घेतली, म्हणून. मुळात या पक्षात येण्याआधी लिओनाकावालो या डाव्या समाजगट केंद्रातून उजव्या विचारसरणीच्या नॉर्दन लीगमध्ये त्याचा प्रवेश हा तसा नाटय़ात्मकच. तरुणपणी सारेच डावे असतात आणि काळाबरोबर सरकत सरकत त्यातील बहुतांश लोक उजवे होत जातात, असा सर्वसाधारण समज आहे. पण मात्तिओचा हा डावीकडून उजवीकडचा प्रवास तुलनेने अगदीच अल्पस्वल्प काळातला. मुदलात नॉर्दन लीग म्हणजे उत्तर इटली आणि मध्य इटली या भागांतील स्थानिक पक्षांची राजकीय आघाडी. तिची स्थापना झाली १९९१ मध्ये. तिचे संस्थापक प्रमुख उंबेर्तो बोसी. आपल्याकडील स्थानिक राजकीय पक्षांची कार्यक्रमपत्रिका जशी असते तशीच या नॉर्दन लीगचीही. स्थापनेचा पायाच प्रादेशिक अस्मिता असला की असे होणे स्वाभाविकच. या प्रादेशिक अस्मितावादी आघाडीचे काम मात्तिओ करू लागला तो जवळपास तिच्या स्थापनेपासूनच. प्रादेशिक स्वायत्तता ही या आघाडीची सर्वात प्राधान्यक्रमाची मागणी. आपल्याकडे अमक्या राज्याला स्वायत्तता द्या, अधिक आíथक अधिकार द्या, पॅकेज द्या, किंवा मग अमक्या राज्यातील अमक्या भागास महत्त्व द्या, त्या भागातील अमक्या लोकांना अधिक महत्त्व, अधिक अधिकार द्या.. अशा मागण्या होत असतात, तसलाच काहीसा हा प्रकार. उंबेर्तो बोसी यांनी नॉर्दन लीगची धुरा प्रदीर्घ काळ सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाला मात्तिओने आव्हान दिले. त्यावेळी हा पक्ष लाचखोरीच्या प्रकरणांमुळे अंतर्बा हादरून गेला होता. त्या पाश्र्वभूमीवर २०१३ मध्ये नॉर्दन लीगच्या नेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत बोसी यांना पराभव पत्करावा लागला. मात्तिओला पक्षातील जवळपास ८० टक्के लोकांचा भरभक्कम पािठबा मिळाला आणि पक्षाच्या सरचिटणीसपदावर तो विराजमान झाला. ‘नॉर्दन लीग पक्ष अखेरच्या घटका मोजत आहेच; आता मात्तिओला काम उरले आहे ते पक्षावर अंत्यसंस्कार करण्याचे. पक्षाचे श्राद्ध घालण्याचे..’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त झाली होती तेव्हा.

याला कारणही तसेच होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये इटलीत सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील इटली कॉमन गुड या आघाडीस स्पष्ट बहुमत मिळाले होते आणि नॉर्दन लीगच्या पारडय़ात पडली होती अवघी ४.०८ टक्के मते. म्हणजे अगदीच दारुण अवस्था. अशा अवस्थेत मात्तिओच्या हाती पक्षाची सूत्रे आली तेव्हा ही जी काही प्रतिक्रिया उमटली, ती त्या काळाला, वास्तवाला धरून आणि स्वाभाविकच होती. पण पुढे जे काही घडले आणि आज जे काही घडते आहे, ते फारच वेगळे आहे. म्हणजे मात्तिओसमोर नॉर्दन लीगचे कलेवरच पडले होते जणू. पण २०१३ पासून आजवर इटलीची राजधानी असलेल्या रोममधील तिबेर नदीतून राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाचे जे पाणी वाहून गेले आणि जे आज वाहते आहे, त्याने या पक्षात नवे प्राण फुंकले आहेत. जवळपास कलेवर झालेला हा पक्ष केवळ जिवंत करण्याचेच नव्हे, तर त्याला चांगला धष्टपुष्ट करून धावण्यास सज्ज करण्याचे श्रेय मात्तिओला आहे. त्याचसोबत परिस्थितीचेही अनुकूल दान त्याच्या बाजूने पडले, हेही विसरता कामा नये.

ही परिस्थिती नेमकी काय आहे? तिची पाश्र्वभूमी कोणती?

मुद्दे अनेक आहेत. इटलीतील विस्थापितांचा वाढता ओघ.. त्यामुळे इटलीच्या अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम.. त्याचे सामाजिक परिणाम.. इटलीची आजची आíथक परिस्थिती.. येत्या डिसेंबर महिन्यात मुख्यत: राज्यघटनेतील सुधारणांबाबत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व पंतप्रधान मात्तिओ रेन्झी यांनी घोषणा केल्यानुसार आजमावले  जाणारे सार्वमत.. आणि या सगळ्यांच्या पुढचा, पण महत्त्वाचा मुद्दा- इटलीतील सार्वत्रिक निवडणुकांचा. इटलीत गेल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या २०१३ मध्ये. जर का अधल्यामधल्या काळात काही उलथापालथ झाली नाही, तर पुढल्या निवडणुका होतील २०१८ च्या मे महिन्यात. आणि इटलीतील गेल्या ७० वर्षांचा राजकीय इतिहास लक्षात घेता पुढील दोन वर्षांत काही उलथापालथ होणारच नाही अशी खात्री कुणीच देऊ शकत नाही. ज्या देशाने गेल्या सात दशकांत ६३ सरकारे बघितली आहेत, तेथे ही अशी खात्री कोण, आणि कशी देणार? आणि ही खात्री न देण्यामागील एक सज्जड कारण म्हणजे येत्या डिसेंबरमध्ये देशात होत असलेल्या सार्वमताच्या निकालाची अनिश्चितता. हे सार्वमत घेतले जाईल ते इटलीच्या राज्यघटनेतील दुरुस्ती इटलीतील नागरिकांना हवी आहे की नाही, या प्रश्नावर. राज्यघटनेतील या प्रस्तावित दुरुस्तीकडे वळण्याआधी इटलीतील संसदीय रचना ढोबळमानाने जाणून घ्यावी लागेल. इटलीत आपल्याप्रमाणेच संसदेची वरिष्ठ व कनिष्ठ अशी दोन सभागृहे आहेत. त्यातील कनिष्ठ सभागृहाची- म्हणजे चेंबर ऑफ डेप्युटीज्मधील सदस्यांची संख्या ६३०, तर वरिष्ठ सभागृहातील- म्हणजे सिनेट ऑफ रिपब्लिकमधील सदस्यसंख्या ३१५. एखादा कायदा करायचा तर दोन्ही सभागृहांची संमती लागते. त्यामुळे दोन्ही सभागृहांत हाती बहुमत नसेल तर नवे कायदे करणे, असलेल्या कायद्यांत सुधारणा करणे ही बाब मोठी जिकिरीची होऊन बसते, असे सध्याच्या रेन्झी सरकारचे म्हणणे. त्यावर या सरकारने सुचवलेला तोडगा म्हणजे वरिष्ठ सभागृहातील- सिनेटमधील सदस्यसंख्या ३१५ वरून १०० इतकी कमी करणे आणि या सभागृहाला केवळ सल्ल्याचे अधिकार देणे. म्हणजेच त्याच्या संख्याबळात तसेच अधिकारांतही कपात करणे. इटलीतील सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे तिथे आíथक अस्थर्य ही बाबही तशी नेहमीचीच. सरकार स्थिर असेल तर आíथक स्थर्य येण्याच्या वाटा खुल्या होतील, अशी रेन्झी सरकारची मांडणी आहे. हे सारे प्रत्यक्षात यावे यासाठी घाट घातला गेला आहे तो राज्यघटनेतील दुरुस्तीचा. खरे म्हणजे या घटनादुरुस्तीला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी स्पष्ट बहुमताने मंजुरी दिलेली असली तरी ते बहुमत दोन-तृतियांश नव्हते. त्यामुळे ज्या राज्यघटनेत दुरुस्ती प्रस्तावित आहे त्याच राज्यघटनेतील तरतुदीनुसार त्यावर देशव्यापी सार्वमत घेणे अनिवार्य होऊन बसले आहे.

आणि याच अनिवार्य मार्गावर आपल्याला दिसतात आपापली भूमिका घेऊन आपापले झेंडे फडकावीत उभे असलेली दोन माणसे. दोघांचे नाव सारखेच.. मात्तिओ. मात्र, आडनावे वेगळी. एकाचे रेन्झी, दुसऱ्याचे सॅल्विनी. ‘आपला देश बदलण्याची तुमची इच्छा आहे? माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठीही नव्हे; आपल्या पुढल्या पिढय़ांसाठी? तर मग माझ्या बाजूने उभे राहा. आपण बदलू या हा देश. या बदलाची संधी आत्ता दवडलीत तर पुढची ३० वष्रे जो कुणी या देशाचा पंतप्रधान होईल तो गुलाम असेल आडमुठय़ा नोकरशाहीचा.. ब्लॅकमेिलग करणाऱ्या पुंड वृत्तींचा.. आणि निव्वळ नकारात्मक मानसिकतेचा. बोला- तुम्हाला काय हवे आहे? बदल? की जैसे थे स्थिती?’ अशी आवाहनपूर्ण भाषणे रेन्झी करताहेत खरे; पण आज स्थिती अशी आहे की, त्यांच्या या आवाहनाचा इटलीच्या नागरिकांवर खरोखर काही परिणाम होईल का, याबाबत शंका यावी. ही शंका येण्यामागील कारण-  रेन्झींसमोर उभ्या ठाकलेल्या मात्तिओ सॅल्विनीला आणि त्याच्या नॉर्दन लीगला नागरिकांकडून मिळत असलेला प्रतिसाद. हा प्रतिसाद केवळ त्याच्या सभांना, भाषणांना होणाऱ्या गर्दीवरून काढलेला अंदाजपंचे नाहीए. २०१३ मध्ये इटलीतील सार्वत्रिक निवडणुकांत नॉर्दन लीगला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती अवघी ४.०८ टक्के आणि २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने इटलीत सातत्याने घेण्यात येणाऱ्या जनमताचा आजचा कानोसा सांगतो की, याघडीला नॉर्दन लीगकडे झुकलेल्या मतांची टक्केवारी आहे- १६ ते १७ टक्के. केवळ तीन वर्षांत जनाधार जवळपास चारपटीने वाढतो, ही साधीसुधी गोष्ट नाही. आणि फक्त अंदाज नव्हे, तर मध्यंतरी काही ठिकाणी झालेल्या स्थानिक निवडणुकांत नॉर्दन लीगने मोठा मतगठ्ठा आपल्याकडे वळवला होता. मात्तिओमागचा हा वाढलेला जनाधार रेन्झी यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा त्यांना आधी चिंता आहे ती येत्या डिसेंबर महिन्यात होत असलेल्या घटनादुरुस्तीवरील सार्वमताची. ‘हे सार्वमत विरोधात गेले तर मी पंतप्रधानपद सोडेन. इतकेच काय, राजकारणसंन्यास घेईन,’ असे रेन्झी जाहीर करून बसले आहेत. त्यामुळे मात्तिओला मिळत असलेल्या पािठब्याने त्यांची झोप उडाली असणार यात शंका काय?

मग इथे मुद्दा उपस्थित होतो तो असा की, इटलीतील जनतेला राजकीय स्थर्य नको आहे का? रेन्झी जे करू बघत आहेत ते झाल्यास जे बदल घडतील त्यांचा स्वीकार करण्याची त्यांची तयारी नाही का? मग त्यांना हवे आहे तरी काय?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना जावे लागते ते मात्तिओने मांडलेल्या मुद्दय़ांकडे आणि त्यांच्या मांडणीकडे. या मांडणीला थोडी पाश्र्वभूमी ब्रेग्झिटची- देखील आहे. नॉर्दन लीगची विचारसरणी काय आहे? तर रूढ अर्थाने प्रादेशिकवादी म्हणावी अशी. केंद्रीय सत्ता ही सर्वोच्च आणि सर्वसामथ्र्यवान असता कामा नये. प्रादेशिक स्तरावरील शास्त्यांना अधिक अधिकार दिले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह. मुळात हा पक्ष प्रादेशिक धाटणीचा आणि तेवढय़ाच परिघाचा. पण मात्तिओच्या प्रभावामुळे म्हणा, प्रयत्नांमुळे म्हणा, किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा- या पक्षाचा परीघ वाढत गेला. आणि आजही वाढतो आहे. या वाढत्या परिघामागे बळ आहे ते मात्तिओने आखलेल्या व्यूहाचे. हा व्यूह द्विस्तरीय आहे. दोन वेगवेगळ्या स्तरांवर दोन वेगवेगळी लक्ष्ये.. आणि लढाईच्या भाषेत बोलायचे तर शत्रू- मात्तिओने निश्चित करून ठेवले आहेत. यातील पहिला शत्रू आहे इटलीबाहेरचा. दुसरा शत्रू इटलीतला.पहिल्या शत्रूशी लढा तसा अिहसक. दुसऱ्याशी लढा थेट राडेबाजीची भाषा करणारा. मात्तिओचा पहिला शत्रू युरोपीय महासंघ. दुसरा मध्यपूर्व, आशिया व आफ्रिकी देशांतून जगण्याच्या वाटा शोधत इटलीत आलेले विस्थापित.

आता युरोपीय महासंघाशी मात्तिओचे वाकडे असण्याचे कारण काय? खरे तर युरोपीय संसदेत त्याने अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे. पण मूळ पाया प्रादेशिकवादाचा असल्याने तेथेही तो प्रतििबबित झालाच. मग त्यास प्रादेशिकवाद म्हणा वा प्रादेशिक अस्मिता. ‘युरोपीय महासंघाने युरोपात घुसत असलेल्या विस्थापितांची काळजी करावी, त्यांना अटकाव कसा करता येईल ते बघावे. उगाच आपल्या महासंघातील देश शेती कुठली करतात, कशी करतात, त्यांनी शेती कशी करावी, या अशा बाबींमध्ये लक्ष घालू नये. ते आम्ही आमचे बघून घेऊ..’ हे मात्तिओचे मत. युरोपीय महासंघ विस्थापित व्यवस्थापनाच्या कामी अगदीच कुचकामी ठरलेला आहे, असेही त्याचे ठाम मत. ‘युरोपीय महासंघाच्या तालावर आपला देश आपण का नाचवायचा? आपले निर्णय आपणच घ्यायला हवेत. त्यांच्या हातचे बाहुले आपण बनता कामा नये..’ असे मात्तिओचे सांगणे. युरोपच्या युरो या चलनाबाबतची त्याची मते तर अगदीच टोकाची. ‘युरो म्हणजे मानवतेविरुद्धचा गुन्हाच आहे,’ हे त्याचे वक्तव्य सर्वाच्याच कायम ध्यानात राहील असेच. ‘रेन्झींना युरोप हवाय. आम्हाला नकोय..’ हे तो वारंवार सांगत असतो. लोकांच्या मनावर ठसवत असतो. रेन्झींना चिंता वाटत असणार ती मात्तिओच्या या असल्या वक्तव्यांनी लोक त्याच्याकडे मोठय़ा प्रमाणात वळले तर आपल्याला बाडबिस्तारा गुंडाळावा लागेल, याची. रेन्झी हे अखंड युरोपचे खंदे समर्थक. ‘ब्रिटन युरोपीय युनियनमधून बाहेर पडलाय तर ठीक आहे; पण त्यावरून युरोपीय युनियनचा अंत जवळ आला आहे असे कुणी मानू नये. जे झाले ते झाले. आता सगळ्यांनी मिळून विकासाचा, प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याची गरज आहे. आणि तो लिहिला जाईल याची मला खात्री आहे..’ ही त्यांची विचारधारा.

आता मात्तिओने उभ्या केलेल्या त्याच्या व्यूहातील दुसऱ्या शत्रूविषयी. हा शत्रू म्हणजे विस्थापित. २०१६ मध्ये इटलीत आलेल्या विस्थापितांची संख्या सुमारे एक लाख २८ हजार इतकी. आणखीन सुमारे दोन लाख ३५ हजार विस्थापित या देशात येण्याच्या तयारीत आहेत असे आकडेवारी सांगते. स्वत:च्या देशात वणवा पेटलेला असल्याने भिरभिरलेल्या अवस्थेत इतर ठिकाणी आश्रय शोधणारी ही माणसे. या विस्थापितांच्या विरोधात इटलीतील जनमानसात काहीशी नाराजी मुळात होतीच. म्हणजे- ‘काय या उपऱ्यांची आमच्या डोक्याला कटकट! आमच्या वाटय़ाच्या सुविधा त्यांना कशाला? त्यांचा भार आम्ही का सोसायचा?’ अशा प्रकारची. मात्तिओ त्यास पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसतो. ‘बाहेरच्या देशांतील विस्थापित इटलीत येऊन थडकताहेत. त्यांचे लोंढे म्हणजे एका रीतीने सार्वभौम इटलीवरचे आक्रमणच आहे. या आक्रमणखोर लोंढय़ांना इटलीने सवलती कशासाठी द्यायच्या? मग आता इटलीच्या नागरिकांनी एक करावे.. स्वत:च्या नागरिकत्वावर पाणी सोडावे आणि इटलीकडेच पुन्हा रीतसर आश्रय मागावा. तो मिळाला की मग काय फायदेच फायदे. या विस्थापितांना इटलीत येण्यापासून रोखलेच पाहिजे..’ ही मात्तिओची विस्थापितांसंदर्भातील वक्तव्ये प्रक्षोभक आणि त्यामुळेच टाळ्याखाऊ आहेत. इटलीतील काही प्रमुख शहरांमध्ये रोमवंशीयांच्या वस्त्या आहेत. बकाल, अस्वच्छ अशा स्थितीतल्या. या वस्त्यांमुळे शहरातील गुन्हेगारी वाढते आहे. त्या पाडून टाकल्या पाहिजेत, ही मात्तिओची मागणी त्याच्या स्वभावाला आणि राजकारणाला साजेशीच. युरोपीय युनियनला विरोध आणि बाहेरच्या लोंढय़ांना विरोध ही दोन प्रमुख अस्त्रे मात्तिओच्या भात्यात आहेत.

या दोन्ही अस्त्रांची धार वाढावी असा आणखी एक मुद्दा त्याच्या हाती आहे. तो म्हणजे- इटलीची आजची आíथक स्थिती. इटलीच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर चालू आíथक वर्षांत १.२ टक्के इतका असेल, असे गणित रेन्झी सरकारने आधी मांडले होते. पण त्या गणिताला वजाबाकीला सामोरे जावे लागले आहे. हा अंदाजदर घटवून ०.८ टक्क्यांवर आणण्याची वेळ त्यांच्यावर ऑक्टोबरअखेरीस आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला मंदीचा फटका, एकूण अर्थव्यवस्थेची मूढवत स्थिती, ब्रेग्झिटमुळे झालेले बदल, युरोला बसत असलेले धक्के, बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने हे सारे त्यास कारणीभूत आहेत- ही सरकारची कारणमीमांसा. आणि ‘परिस्थिती वाटते तेवढी वाईट नाही. आधीच्या काळाशी तुलना केली तर खूपच बरी आहे. ५० वर्षांच्या सरकारी रोख्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, हे सुलक्षणच की!’ ही आहे सरकारची दिलाशाची भाषा. पण ही कारणमीमांसा आणि दिलाशाची भाषा मात्तिओच्या पचनी अर्थातच पडलेली नाही. त्याने या आघाडीवरही सरकारला धारेवर धरण्याची संधी गमावलेली नाही.

म्हणजेच आजची स्थिती रेन्झी यांना अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय ती अधिक प्रतिकूल कशी होईल, हे बघण्याचे काम अर्थात मात्तिओ करणारच. त्यासाठी तो वापरणार त्याचे हातखंडा विषय. विविध विषयांवर त्याची काय मते आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या मतांचा लसावी काढला तर..? आíथक विषयावरील त्याची मते स्वदेशीला अवास्तव आणि अव्यवहार्य प्रोत्साहन देणारी. तशी धोरणे अवलंबिणे म्हणजे अस्मितेच्या नावाखाली स्वत:ला जगापासून विलग करण्यासारखेच. विशेषत: आत्ताची अर्थव्यवस्था एकमेकांच्या हितांशी कमालीची गुंतलेली असताना तसे करणे कसे शक्य होऊ शकेल, हा प्रश्नच! इटली ही युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था. असे असताना या पद्धतीची धोरणे राबवणे कठीणच. आणि राबवली, तर त्याचे परिणाम विपरीत होण्याची भीती. अल्पसंख्याक- विशेषत: मुस्लिमांबाबतची त्याची मते अत्यंत टोकाची. ‘इटलीतील मुस्लीम त्यांची जीवनशैली इतर नागरिकांवर लादू पाहत आहेत,’ हे त्याचे नेहमीचे पालूपद. ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्स यांनी ‘मुस्लिमांशी संवाद साधा,’ असे आवाहन मध्यंतरी केले. त्यावर मात्तिओचा कोण तीळपापड झाला! ‘पोप असे कसे सांगू शकतात? असे आवाहन करणे म्हणजे कॅथलिकांचा अपमान आहे,’ अशा शब्दांत त्याने आपली भावना त्यावेळी व्यक्त केली होती. कुटुंबव्यवस्थेवरची त्याची मते- ‘विकास वगरे ठीक आहे, व्यक्तिस्वातंत्र्य वगरे ठीक आहे.. पण शेवटी आपली पारंपरिक कौटुंबिक मूल्ये महत्त्वाचीच!’ ही. अशी व्यक्ती समिलगी संबंधांकडे कशी बघणार? ‘छे छे.. हे असले काही संबंध मला मान्य नाहीत. त्यामुळे समिलगी विवाह वगरे तर दूरचीच गोष्ट.’ समाजव्यवस्थेकडे मात्तिओ कसा बघतोय, तर ‘कॉस्मोपोलिटन रचना नको. वांशिक सरमिसळ नको आपल्याकडे..’ म्हणतोय तो.

या साऱ्या वक्तव्यांचा, दृष्टिकोनांचा लसावी- ‘मात्तिओ हा एक प्रतिगामी, वाचाळ, दंडेलशाही, हुकूमशाहीपसंत गृहस्थ आहे!’ असाच येतो. हा लसावी नीट निरखताना त्याचे एक टोक भूतकाळात दिसते आणि दुसरे वर्तमानकाळात. भूतकाळातील टोक पोहोचते ते मात्तिओच्याच देशातील एकेकाळच्या बलाढय़ हुकूमशाहाकडे.. मुसोलिनीकडे. ‘लोकशाही ही कागदावर, विचारप्रक्रियेत ठीक आहे, पण वास्तव पातळीवर ती एक चुकीची कल्पना आहे. समाजवाद म्हणजे निव्वळ बकवास आणि विनोद आहे..’ हा मुसोलिनीचा विचारव्यूह. मात्तिओ हा मुसोलिनीच्या विचारांचा कट्टर समर्थक. ‘मुसोलिनीचे प्रभावी नेतृत्व व कार्यकुशलता, इटलीप्रती असलेली अभंग निष्ठा माझ्यासाठी वंदनीय आहे,’ असे मात्तिओचे म्हणणे.

मात्तिओच्या व्यक्तित्वाच्या लसावीचे वर्तमान टोक पोहोचते ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे. दांडगाई, ‘दे धडक’ वृत्ती, वाचाळपणा (इटलीच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती लॉरा बोल्डिनी यांची तुलना सेक्स डॉलशी करण्याचे धारिष्टय़ भरसभेत मात्तिओ करू शकतो!), प्रतिगामी दृष्टिकोन अशी अनेक साम्ये  उभयतांमध्ये न शोधताही दिसतात. गेल्या एप्रिलमध्ये फिलाडेल्फियामध्ये या दोन समविचारींची भेट झाली. त्यानंतर ‘ट्रम्प यांच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी माझा पूर्ण पािठबा आहे,’ असे मात्तिओने सांगितले. तर- ‘तुम्ही नक्कीच इटलीचे पंतप्रधान व्हाल,’ अशा शुभेच्छा ट्रम्प यांनी मात्तिओला दिल्या. या दोघांना एकमेकांच्या शुभेच्छांचा किती फायदा होतो, हे लवकरच कळेल. ट्रम्प यांच्या भविष्याचा विचार बाजूला ठेवून मात्तिओच्या भविष्याचा विचार केला तर त्याजोडीला अर्थातच इटलीच्या भविष्याचा- आणि पर्यायाने युरोपच्या भविष्याचा विचार करावा लागेल. येत्या डिसेंबर महिन्यात इटलीत होणारे घटनादुरुस्तीवरील सार्वमत हे मात्तिओ आणि पंतप्रधान रेन्झी यांच्याही दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण सार्वमत विरोधात गेले तर रेन्झी राजीनामा देतील आणि त्या अस्थिर परिस्थितीत तातडीने सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता दाट. त्या झाल्या तर रेन्झींच्या डेमोक्रॅटिक पक्षाला यश मिळण्याची शक्यता अगदीच स्वल्प.

सध्या इटलीत सर्वाधिक अग्रेसर आहे तो फाइव्ह स्टार मूव्हमेंट हा पक्ष. ढोबळमानाने बघायचे तर हा पक्ष प्रस्थापितविरोधी अशा धाटणीचा. जागतिकीकरणास त्याचा विरोध. ठिकठिकाणच्या समस्यांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या अमेरिकेच्या स्वभावास या पक्षाचा आक्षेप. इटलीत तातडीने निवडणुका झाल्या तर सर्वाधिक पसंती या पक्षास मिळू शकते. अशावेळी मात्तिओ काय करू शकतो? ‘रेन्झी यांच्याविरोधात आघाडी उभारण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांत डावे-उजवे या भेदाचा काही अडथळा येईल असे मला अजिबातच वाटत नाही,’ असे मात्तिओने आधीच सांगून टाकले आहे. त्यामुळे आगामी सत्तागणिताची विविध पर्यायी समीकरणे त्याने मांडून ठेवली आहेत, हे स्पष्ट आहे. या समीकरणांतून मात्तिओ थेट इटलीचा पंतप्रधान होईलच असे तूर्तास तरी वाटत नाही. मात्र, देशाच्या राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव व नियंत्रण राहू शकते.

या परिस्थितीत इटलीतील राजकारण एक नवे वळण घेईल का? आजची परिस्थिती असे सांगते की, याची शक्यता दाट आहे. हे वळण इटलीसाठी पुढे जाणारे असेल की या देशास मागे नेणारे? यातील दुसरीच शक्यता अधिक. तसे झाले तर संपूर्ण युरोपावर त्याचा परिणाम होईल. आणि मुख्य म्हणजे इटलीच्या वाटचालीतील त्यापुढील वळण असू शकते ते युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचे. तसे झाले तर मात्तिओ-समर्थकलिखित इतिहासात मात्तिओची नोंद होईल : देशाच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी लढणारा एक योद्धा- अशी. सर्वसामान्यांच्या इतिहासात त्याची नोंद होईल- एक धडक-बेधडक, साधनशुचितेची फारशी पत्रास न बाळगणारा नेता- अशी. आणि जगाच्या इतिहासात..? इटलीचे पुढे काय होते, त्यावर ही ओळख अवलंबून राहील.

माणसाचे भवितव्य भूमीशी जोडलेले असते तसेच भूमीचे भवितव्य माणसाशी. इटलीचे काय होईल, आणि तेथील माणसांचे काय होईल, या प्रश्नांची उत्तरे या सूत्राशी बांधली गेली आहेत. त्या सूत्रातून काय बाहेर पडते? जनकौल कुणाला मिळेल.. मात्तिओ सॅल्विनीला की मात्तिओ रेन्झी यांना? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी थोडे थांबावे लागेल. थोडे म्हणजे येत्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतापर्यंत. ‘मात्तिओ’ या शब्दाचा इटालियन भाषेतील अर्थ ‘ईश्वराने दिलेली भेट’ असा. पण आता महत्त्वाची ठरणार आहे ती मतदारांनी दिलेली भेट. त्यामुळे तूर्तास मतदार राजा आहे. त्याच्या भेटीवर दोन्ही मात्तिओंचे भवितव्य अवलंबून आहे.. आणि अर्थातच इटलीचेही.
राजीव काळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:10 am

Web Title: matteo salvini
Next Stories
1 फ्रान्स : अस्वस्थतेचे अपत्य- मरी ल पेन
2 ऑस्ट्रिया : स्थलांतरितांच्या प्रश्नातून उगवलेलं नेतृत्व
3 इंग्लंड : नायजेल फराजचे भूत
Just Now!
X