13 October 2019

News Flash

गर्भगळीत

वेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा.

आजीने आपली सून निवडतानाही ती आपल्यासारखीच आस्तिक असेल याची काळजी घेतली होती.

लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

‘‘तरी मी सांगत होते, मोठी माणसं सांगतात त्यात काहीतरी तथ्य असतं. उगाच कशाला आगीशी खेळायचं?’’

वेदाची सासू वेदाच्या आईला हळू आवाजात सांगत होती. तरी त्यातले महत्त्वाचे शब्द समोरच्या पलंगावर झोपलेल्या वेदाच्या कानावर पडलेच. वेदाने आपल्या हाताकडे, वर-वर गेलेल्या सलाइनच्या टय़ूबकडे आणि टय़ूबला जोडलेल्या बाटलीकडे पाहिलं. तिच्या हातातून एक बारीकशी कळ गेली.

वेदाची आई म्हणाली, ‘‘हो. ही हल्लीची मुलं म्हणजे ना.. त्यात आमची आडमुठी वेदा! काय बोलायचं आपण तरी? नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं.’’

‘‘आमचा अथर्वही काही कमी नाहीये.’’ वेदाची सासू सांगू लागली.

वेदाने तिच्या समोर बसलेल्या, बोलण्यात गुंग झालेल्या दोन बायकांकडे पाहिलं. तिला जरा ग्लानी आल्यासारखं वाटलं. त्यांचे चेहरे अस्पष्ट दिसू लागले आणि बोलणंही कमी कमी ऐकू येऊ  लागलं. म्हणून तिने आपली नजर खोलीच्या छताकडे वळवली आणि करडय़ा-पांढऱ्या रंगांच्या आकारांकडे एकटक पाहत राहिली.

साधारणत: महिन्याभरापूर्वीची गोष्ट होती. वेदा गरोदर होऊन नुकतेच तीन महिने झाले होते. त्यामुळे तिच्या सासूने आणि आईने सगळ्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना ही ‘गोड बातमी’ सांगायला सुरुवात केली होती.

तेव्हा वेदा आईला म्हणाली होती, ‘‘एवढी आनंदाची बातमी इतक्या सावधपणे, अंदाज घेत कशाला सांगायची? आपल्याला समजलं तेव्हाच सरळ सांगून टाकायचं की!’’

तिची आई म्हणाली होती, ‘‘अगं, तसं नाही. पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात. काहीही होऊ  शकतं ना. म्हणून थोडं थांबायचं. सांभाळायचं जरा. कोणाच्या मनात काय असेल.. त्याने काही झालं तर..’’

‘‘काहीही काय? मनातल्या विचारांनी कधी अ‍ॅबॉर्शन..’’

वेदाला मधेच तोडत तिची आई म्हणाली, ‘‘बास! आता हा शब्दही तोंडात काय, मनातही आणायचा नाहीस तू पुढचे सहा महिने. नकारात्मक ऊर्जा असते असल्या शब्दांमध्ये. कळलं..?’’

‘‘काय? कोणी सांगितलं तुला हे? आणि समजा, तीन महिन्यांत झालंच मिसकॅरेज, तर ज्या तोंडाने गोड बातमी सांगितली, त्याच तोंडाने ही सॅड न्यूज सांगायची- झाला गर्भपात!’’

‘‘अरे, पुन्हा तेच. तीनदा म्हणालीस. तुझं ना मला काही समजतच नाही. कशावरून कुठे जाशील? पुरे झालं आता.’’

‘‘का? का पुरे झालं?’’ वेदा म्हणाली. ‘‘बोल की आता. तुम्हा लोकांचं ना असंच असतं. वाद म्हटलं की पळत सुटता ढुंगणाला पाय लावून. आई, तूच तर म्हणतेस ना, की नातेवाईक सुखदु:खं वाटून घ्यायला असतात म्हणून. मग कशाला एवढी लपवाछपवी? ट्रान्स्परन्सी का नको?’’

‘‘बरोबर आहे तुझं. पण..’’

‘‘माझं तर स्ट्रेट म्हणणंय. कशाला पिटायचे ढोल? मूल जन्माला घालणं हा त्या कपलचा प्रायव्हेट प्रश्नय. अगदी जवळच्या चार लोकांना सांगितलं तरी पुरे. आपली तर जंत्रीच असते.. या सोम्याला, त्या गोम्याला..!’’

‘‘बास झाला वितंडवाद. तुला नको झाली असतील नातीगोती; आम्हाला हवीयेत. आणि सांगितलं नाही की लोकांची मनं दुखावतात. तुला नाही कळायचं आत्ता. पण लवकरच कळेल, आई झालीस की.’’

विषय अजून पुढे वाढायला नको म्हणून वेदाची आई सरळ स्वयंपाकघरात गेली. तशी वेदा चरफडत म्हणाली,

‘‘हे वाक्य कितीदा ऐकवणारेस तू मला? या वाक्याला काही अर्थ तरी आहे का? आयुष्यात सारखं कळत राहतंच आपल्याला. आई होणं एवढं कशाला डोक्यावर घ्यायचं? आणि नातीगोती म्हणतेस, पण तुझ्या ऑपरेशनच्या वेळेला शेजारच्या गोखलेकाकूच आल्या ना डबा घेऊन! बेबीताई कुठे गेली होती तेव्हा? जाऊ  दे.. तुम्ही सगळ्या ना कंडिशन्ड कठपुतळ्या आहात, कठपुतळ्या!’’

वेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा. तिच्या बुद्धीच्या तलवारीला तर्कशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता अशी दुधार चढायची आणि त्याचा वापर करून ती अतार्किक आणि शेंडाबुडखा नसलेल्या गोष्टींवर सपासप तुटून पडायची. त्याशिवाय तिला राहवतच नसे. आपली पहिली नोकरीही तिने याच कारणाने पहिल्या दिवशीच सोडली होती!

एमबीए केल्यानंतर वेदा एका मध्यम आकाराच्या लॉजिस्टिक्स कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाली होती. वेदाचा बॉस दाक्षिणात्य माणूस होता आणि पूजा-देव-श्रद्धा यांबाबतीत अत्यंत कर्मठ होता. त्याच्या केबिनमध्ये तिरुपतीच्या बालाजीची भलीमोठी तसबीर होती. इंटरव्ह्य़ूच्या वेळेस केबिनमध्ये गेल्या गेल्या ती तसबीर वेदाला दिसली होती. पण त्यावेळी तिने तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं म्हणून दुर्लक्ष केलं होतं.

तिचा बॉस रोज सकाळी ऑफिसमध्ये आल्या आल्या बालाजीची मनोभावे पूजाअर्चा करून मगच कामाला सुरुवात करायचा. वेदाला त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. एवढंच असतं तरी फार काही अडलं नसतं. पण पूजा झाल्यावर ऑफिसातल्या प्रत्येकाला बालाजीला नमस्कार करून प्रसाद घ्यावा लागायचा. तसा तिथला रिवाजच होता.

नवीन असल्याने वेदाला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि सगळेजण देवबिव मानतातच, त्यामुळे श्रद्धाळू असतातच, असं गृहीत धरून वेदाला कुणी याबद्दल पूर्वकल्पनाही दिलेली नव्हती.

जेव्हा बॉसने बेल वाजल्यावर सगळेजण आपापली कामं सोडून केबिनमध्ये जाऊ  लागले तेव्हा वेदाने आपल्या सीनिअरला त्याबद्दल विचारलं.

‘‘अरे, तुझे किसीने बताया नहीं? ये रोज का आयएमपी वर्क है,’’ असं म्हणून त्याने वेदाला त्या ‘नमस्कारम् सेरेमनी’बद्दल सांगितलं.

वेदा म्हणाली, ‘‘आय कान्ट बिलीव्ह! आय कान्ट डू धिस.’’

सीनिअरने दचकून विचारलं, ‘‘व्हाय?’’

‘‘बिकॉज आय डोन्ट बिलीव्ह इन धिस नॉनसेन्स!’’

‘‘व्हॉट?’’

‘‘येस. आय अ‍ॅम अ‍ॅन एथेइस्ट. आय अ‍ॅम नॉट गोइंग टू डू धिस. अँड आफ्टरऑल इट्स अ‍ॅन ऑफिस..’’

सीनिअर तिला समजावत म्हणाला, ‘‘देख, भगवान को मैं मानता हूँ, लेकीन मुझे भी रोज रोज का ये सब अच्छा नहीं लगता. फिर भी पाच बरस कर रहाँ हूं. मजबुरी है. और तेरा तो आज पहलाही दिन है. एक दिन सर झुका दिया तो क्या फर्क पडेगा?’’

‘‘सर, पडता है फर्क. मुझे पडता है. मैं नहीं आऊंगी. यू कॅन गो.’’ असं म्हणून वेदा शांतपणे आपल्या डेस्कपाशी बसून राहिली. बाहेर आणखी एक कलीग आणि वेदा तेवढय़ाच उरल्या. त्या कलीगला जेव्हा वेदाने थोडं उत्साहित होऊन ‘व्हाय डोन्ट यू गो?’ असं विचारलं, तेव्हा तिने दबक्या आवाजात ‘एमसी’ असं उत्तर दिलं. मग तर वेदा आणखीनच वैतागली.

जेव्हा वेदा ‘नमस्कारम् सेरेमनी’ला आली नसल्याचं बॉसला समजलं, तेव्हा तातडीने त्याने तिला बोलावून घेतलं आणि विचारलं, ‘‘आप क्यूँ नहीं आई?’’

‘‘क्यूं की मैं नास्तिक हूँ.’’

‘‘दॅट्स ओके. आप ऑफिस के बाहर कुछ भी कर सकती हो. बट, इधर आपको नमस्कारम् के लिये आनाही पडेगा. आज ये कंपनी जो कुछ भी है, सब इनकीही कृपा से है. डू यू अंडरस्टँड?’’

‘‘सॉरी सर, बट आय कान्ट डू धिस.’’ वेदाने चेहरा सरळ ठेवत उत्तर दिलं.

बॉस तिला समजावत म्हणाला, ‘‘वेदा, सी, यू आर अ क्लेव्हर गर्ल अँड हॅव अ ब्राइट फ्यूचर. बहोत आगे जाओगी- लेकिन अगर तुम्हारे इंटलेक्ट को श्रद्धा की साथ मिली तो..’’

आता वेदाचं डोकं सटकलं. ती म्हणाली, ‘‘सर, डोन्ट प्रीच मी. नास्तिक होना अच्छा क्यूँ है, ये मैंने समजाया क्या आपको? नहीं ना? मैंने पूछा क्या, की आप रोज इस तसबीर पर आपका और ऑफिस का वक्त क्यूँ बरबाद करते हो? नहीं. तो आप क्यूँ मुझे श्रद्धबिद्धा बता रहे हो? आय अ‍ॅम अ ग्रोन अप् पर्सन. आय हॅव ब्रेन्स. आय कॅन डिसाइड व्हॉट शुड डू अँड व्हॉट आय शुड नॉट.. आय विल नॉट बेंड बिफोर धिस युसलेस तसबीर..’’

‘‘माइंड युअर टंग.. गेट आऊट फ्रॉम माय ऑफिस.’’

‘‘व्हाय?’’ वेदाही तडकली. ‘‘अगर आपको श्रद्धावान एम्प्लॉई चाहिये, तो अ‍ॅड में ऐसा लिखते क्यूँ नहीं? आप क्या निकालेंगे मुझे, मैं ही ये जॉब छोड रही हूँ!’’

घरी गेल्यावर जेव्हा आई-बाबांना वेदाने घडलेला प्रकार सांगितला, तेव्हा ते दोघं तिच्यावर चिडलेच. म्हणाले, ‘‘वेदा, हा काय प्रकार आहे, ऑ? या कारणासाठी कोणी जॉब सोडतं का?’’

‘‘म्हणजे काय बाबा? माझ्या तत्त्वांचा प्रश्न आहे हा.’’

‘‘पण केला एकदा नमस्कार- तर काय फरक पडणार आहे एवढा?’’

‘‘एकदा नाही बाबा, रोज करावा लागला असता. तुम्हाला- देवावर श्रद्धा असलेल्यांना ना, कळणारच नाही आम्हाला काय वाटतं ते. समजा, उद्या तुम्हाला सांगितलं, की रोज सकाळी पूजा करायची नाही, आरती म्हणायची नाही, गणपती बसवायचा नाही, तर काय होईल तुमचं? तडफड होईल ना मनाची? दु:ख होईल ना खूप! तसंच वाटलं असतं मलाही तिथे रोज नमस्कार करताना. आतल्या आत कोंडल्यासारखं.’’

‘‘अगं, हो. पण असं करून कसं चालेल? काही तडजोडी कराव्या लागतीलच ना?’’

‘‘मान्य. पण कोणत्या तडजोडी करायच्या याचा चॉइस तर माझा मला करू दे.’’

आई म्हणाली, ‘‘आणि काय गं, तुझा नाही ना विश्वास? ठीके. पण बालाजींना कशाला युसलेस म्हणायचं?’’ आईने डोळे मिटले आणि कानाच्या पाळ्या धरल्या.

‘‘का? तुम्ही नाही का ‘पाखंडी’, ‘धर्मबुडवे’ असं काय काय म्हणता, तेव्हा चालतं का? एवढंच नाही तर मारूनही टाकता. नाही, आता माझ्या लक्षात आलंय, की आपल्या समाजात सगळे सश्रद्धच आहेत, हे टेकन फॉर ग्रँटेडच असतं. कोणाचे विचार वेगळे असू शकतात, हे खिजगणतीतही नसतं आपल्या. आणि तसा एखादा सापडला, तर नोकरी-पैसा-सामाजिक नियम या ना कारणाने त्याला नको असलं तरी, त्याच्या मनाचा कोंडमारा होत असला तरी ठाकूनठोकून चौकटीत बसवून टाकतो आपण त्याला. मग हळूहळू तोही निबर होत जातो.’’

वेदा प्रखर बुद्धिवादी आणि नास्तिक होण्यामागे अनेक लहान-मोठी कारणं होती. त्यातली दोन कारणं मात्र अगदी ठसठशीत होती. पहिलं कारण- वेदाच्या घरचं अतिश्रद्धाळू वातावरण. आणि दुसरं म्हणजे वयात येताना शाळेत झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिबिरात घेतलेला सहभाग.

वेदाची आजी अत्यंत श्रद्धाळू आणि आस्तिक बाई होती. चारशे स्क्वेअर फुटांच्या फ्लॅटमध्ये तिने मोठ्ठा देव्हारा बांधून घेतला होता. त्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती, टाक आदी गोष्टी भरगच्च होत्या. त्याच्या आजूबाजूच्या भिंतींवर साईबाबा, स्वामी समर्थ, बालाजी, गजानन महाराज आदींच्या तसबिरी वेगळ्याने होत्याच. त्यात या सगळ्या देवतांमध्ये कोणीतरी यंदा तीर्थयात्रेला गेला म्हणून बाण आणला, कोणी आणखी कुठेतरी गेला तिथून फोटोफ्रेम आणली, वगैरे गोष्टींची भर पडायचीच.

वेदाच्या घरी दरवर्षी मोठ्ठं नवरात्र असायचं. आणि तेव्हा तिच्या आजीच्या अंगात यायचं. घागरी फुंकत फुंकत आजी नाचू लागायची. आणि अचानक एका क्षणी ती ओरडू, किंचाळू लागायची. तिचे केस अस्ताव्यस्त असायचे. कपाळ कुंकवाने भरलेलं असायचं. डोळे लालबुंद होऊन जायचे.

त्या दिवशी आजूबाजूचे, ओळखीतले लोक तिला वेगवेगळे प्रश्न विचारायला यायचे आणि आजी त्यावर उत्तरं द्यायची, उपाय सांगायची. बऱ्याचदा हे प्रश्न खासगी स्वरूपाचे- म्हणजे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न कधी होईल, किंवा व्यवसायात वृद्धी कधी होईल, अशा प्रकारचे असायचे. प्रश्न विचारल्यावर आजी आपल्या समोर ठेवलेल्या घागरीत डोकं खुपसायची. मग ‘आईचा उदो उदो’ म्हणत कुंकवाने त्या प्रश्नकर्त्यांचा मळवट भरायची. खर्जातल्या आवाजात, हळूहळू श्वास घेत घेत, अर्धमिटल्या डोळ्यांनी उत्तर द्यायची, ‘‘पुढचं वर्षभर माझी उपासना कर. शनिवारी उपास करायला लाव मुलीला. जा. कल्याण होईल तुझं.’’

बहुकेतदा पुढच्या वर्षभरात प्रश्नकर्त्यांची इच्छा पूर्ण झालेली असायची आणि मग आजीचं- म्हणजे ‘देवीआई’चं ऋण फेडायला प्रश्नकर्ता आजीची खणानारळाने ओटी भरत असे, जेवायला बोलावत असे आणि भरपूर दक्षिणाही देत असे.

आजीने आपली सून निवडतानाही ती आपल्यासारखीच आस्तिक असेल याची काळजी घेतली होती. जेणेकरून ती कायम आजीच्या हाताखाली राहील, ती सांगेल ते सगळं करेल. आणि जमलंच तर आपली गादीही चालवेल. त्यामुळे लग्न झाल्यानंतर जेव्हा वेदाची आई सासरी आली, तेव्हा घरातल्या कोणत्याच गोष्टींमध्ये काहीच बदल झाला नाही, की सासू-सुनांमध्ये बऱ्याचदा होणारा संघर्ष वा वादही झाला नाही. खरं तर असे संघर्ष चांगले असतात. त्यामुळे घर्षण होतं आणि वर्षांनुर्वष बसलेली घराची घडी जरा बदलते.. पाणी वाहतं राहतं. पण वेदाच्या आईने तर आपल्या सासूबाईंपुढे आधीच ‘देवीआई’ म्हणून गुडघे टेकले होते आणि आजी म्हणेल त्याला होकार द्यायचा असं ठरवलं होतं. साखर दुधात विरघळून जाते, तशी ती नव्या घरात निमूट होऊन गेली होती.

एवढंच नाही, तर पुण्यासारख्या मोठय़ा शहरात राहणाऱ्या वेदाच्या ‘सुशिक्षित’ घरात वेदाला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली तेव्हा आजीच्या सांगण्यावरून आईने तिला चार दिवस बाजूला बसवलं होतं. ‘‘तुला कावळा शिवला आहे, त्यामुळे तू स्वयंपाकघरात, देवघरात यायचं नाही, कोणालाही स्पर्श करायचा नाही,’’ असं आईने प्रेमाने वेदाला समजावलं होतं.

जेव्हा वेदाने ‘कावळा शिवला तर काय होतं?’ असं विचारलं, तेव्हा तिची आई म्हणाली, ‘‘कावळा खूप घाणेरडा असतो. उकिरडय़ावरचं, रस्त्यात पडलेलं काहीही खातो. तो शिवला की आपण अशुद्ध होतो. मग शुद्ध होण्यासाठी चार दिवस लागतात. म्हणून बाजूला बसायचं.’’

त्या चार दिवसांनंतर वेदाला आईने तेल-शिकेकाई लावून अंघोळ घालून दिली होती. तेव्हा वेदाने आईला विचारलं, ‘‘आई, परवा तू म्हणालीस की, आता तुला दर महिन्यातून एकदा बाजूला बसावं लागेल. पण त्यामुळे माझी शाळा सारखी बुडेल. मला नाही आवडत अभ्यास बुडवलेला.’’

आई गोड शब्दांत म्हणाली, ‘‘तसं नाही बाळा, पण या दिवसांत आपल्याला जरा आरामाची गरज असते. आपल्या शरीरातली सगळी घाण वाहून जात असते ना! मी पण बसते की नाही, असंच.’’

‘‘पण आम्हाला तर आमच्या बाईंनी सांगितलंय की, पाळी म्हणजे घाणबीण काही नसतं. उलट, चांगलंच असतं. आपल्या शरीरामधल्या हार्मोन्समध्ये दर महिन्याला जे बदल घडतात, त्याचं हे दृश्यरूप.’’

थोडं थांबून वेदाने विचारलं, ‘‘आई, आजीला तर मी कधीच बाजूला बसलेलं पाहिलं नाहीये. असं का?’’

‘‘ती देवीआई आहे ना, म्हणून.’’

‘‘म्हणजे देवीआई झालं तर बाजूला नाही बसावं लागत? मग मला पण व्हायचंय तसंच. मला शाळेत जायचंय, अभ्यास करायचाय आणि खेळायचंय. देवीआई व्हायला काय करावं लागतं?’’

‘‘किती प्रश्न विचारतेस गं?’’ असं म्हणून आईने वेदाचं डोकं खसाखसा पुसलं आणि मुद्दाम वेगळा विषय काढला.

याच काळात वेदाच्या शाळेत पाच दिवसांचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक शिबीर झालं होतं. त्यात हुशार आणि चौकस असलेल्या वेदाने सहभाग घेतला होता. त्यात शेवटच्या दिवशी एका डॉक्टरने सगळ्या मुलींना पाळी येणं म्हणजे काय, त्यातली जैविकता, ती का येते, गर्भाशय म्हणजे काय, आदी गोष्टी नीट समजावून सांगितल्या होत्या. तिने चित्रंही दाखवली होती. तसंच एक व्याख्यान बुवाबाजी, अंगात येणं आणि त्यातून होणारी फसवणूक याबद्दलचं होतं. या शिबिरामुळे तल्लख बुद्धीच्या वेदामधली कारणं शोधण्याची ठिणगी अजूनच पेटून उठली. आणि नंतर त्याची धगधगती ज्वालाच झाली.

त्या वर्षी तिने आजीच्या अंगात येण्याचं नीट निरीक्षण केलं. तेव्हा तिला समजलं की, आजी प्रश्नकर्त्यांना जी उत्तरं देते, ती कधीच ठोस नसतात. म्हणजे अमुक तारखेला नोकरी लागेल किंवा आर्थिक फायदा होईल, असं ती कधीच सांगत नाही. त्यात नेहमीच एक मोघमपणा, संदिग्धता असते.

त्या वर्षी ओळखीतल्या एका काकांनी त्यांच्या मुलाला नोकरी कधी लागेल, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा आजीने त्यांच्या मुलाविषयीची सगळी माहिती नीट विचारून सांगितलं की, वर्षभर मंगळवारी उपास कर आणि सहा महिन्यांतून एकदा असं दोनदा वणीच्या देवीला जाऊन ये. तिथे खणानारळाने ओटी भर. ब्राह्मणांना जेवू घाल.

आजीने ‘उपाय’ या नावाखाली जे काही सांगितलं होतं, ती सगळी नेहमीचीच कर्मकांडं होती. त्यात वेगळं असं काहीच नव्हतं, हे वेदाच्या लगेचच लक्षात आलं. तो मुलगा चांगल्या कॉलेजातून चांगल्या मार्काने आयटी इंजिनीअर झाला होता. नंतर एमबीए किंवा तसंच काहीतरी करायचंही त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे अशा मुलाला लवकरच.. म्हणजे सहा-सात महिन्यांत नोकरी मिळणं साहजिकच होतं. यासाठी कोणीही फार डोकं लावायची गरज नव्हती. आणि ही सगळी माहिती आजीने प्रश्न विचारून शिताफीने काढून घेतली होती.

कधी कधी ज्या लोकांना आजीने सांगितलेले उपाय करून काहीच फायदा होत नसे, त्यांना आजी मुद्दाम कठोर आवाजात डोळ्यांत डोळे घालून विचारायची, ‘‘तुमची भक्ती कमी पडली नि माझ्याकडे येता तोंड वर करून?’’ ते ऐकून लोक भीतीने त्यांच्या देवीआईपुढे डोकं टेकवायचे आणि ‘चुकलो, माफ करा’ अशी कबुली देऊन टाकायचे.

वेदाला नेहमी प्रश्न पडायचा, की असं असलं तरी लोक का बरं आजीकडे येत असावेत? तिच्या पाया पडत असावेत? आणि प्रश्न विचारत असावेत? तेव्हा वेदाला शिबिरात कोणीतरी केलेल्या भाषणातले मुद्दे आठवले.. सर्वसामान्य माणूस बऱ्याचदा तर्काने जगत नाही, आणि त्यामुळेच तो फसवला जातो. तर्क नको असण्याचं एक कारण असंही असतं की, विचार करून कारणांचा शोध घेण्याची प्रक्रिया ही सोपी, आरामाची नसते. ती त्रासदायक असते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सर्वसामान्य माणसाला कमी कष्टांत जास्तीत जास्त सुखी व्हायचं असतं. वेदाला वाटलं, त्यामुळेच आजीच्या बोलण्याने, उत्तर देण्याआधी घागरीत डोकं खुपसण्याने, एका फटकाऱ्यात मळवट भरण्याने, लाल डोळ्यांनी आणि खर्जातल्या आवाजाने लोक भारावून जातात. ते एक प्रकारचं संमोहनच असतं. त्याहीपलीकडे असते- भीती, सगळं काही ‘चांगलं’ होण्याची आस. या सगळ्यामुळे माणसांची मनं भुसभुशीत होतात आणि आजीसारख्यांना सहज अशी माती टोकरता येते.

वेदाने ठरवलं की, पुढच्या वर्षीच्या नवरात्रात आपण आजीला चॅलेंज करायचं. तिला खोडून काढायचं. आपण आपल्या घरापासूनच सुरुवात करायची. पण वेदाचा हा पण प्रत्यक्षात कधीच उतरला नाही. कारण त्या वर्षी आजी झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावली. त्यामुळे ‘देवीआईंनी कसं सुखाने निर्वाण केलं’ असं सगळे जण बोलू लागले आणि ते वेदाच्या मनाला सारखं बोचत राहिलं. परिणामी तिने आपली तर्कबुद्धी आणि विवेक आणखीनच कठोर केला. आयुष्यात जिथे जिथे अशा गोष्टी घडताना दिसतील, तिथे तिथे बोलायचंच असा तिने निश्चय केला.

याचा तडाखा वेदाच्या आईलाही बसला. वेदा कॉलेजात जायला लागल्यावर अचानक तिचं वजन वाढू लागलं. केस गळू लागले. हाता-पायांवरचे केस दिसू लागले आणि थोडी मिशीही दिसू लागली. चेहऱ्यावर फोड आले. डॉक्टरांना दाखवलं, चाचण्या केल्या आणि त्यावर उपचारही केले, तरी फार काही फरक पडत नव्हता.

खरं तर हे सगळं होण्याआधी वेदाचे केस लांबसडक, सरळ आणि मऊ  होते. त्यात तिच्या आईने शिकेकाई लावून, धूप वगैरे देऊन त्यांची खूप काळजी घेतली होती. त्यामुळे ते आणखीन चमकदार झाले होते. वेदाची त्वचा चांगली तुकतुकीत, मुलायम होती आणि त्यावर दिसणारही नाही एवढी बारीक लव होती. तिची अंगकाठी प्रमाणबद्ध होती. थोडक्यात, समाजात ज्या मुलींना ‘सुंदर’ असं म्हटलं जातं, त्यात वेदा फिट्ट बसत होती.

पण जेव्हा वेदाची त्वचा कोरडी होऊ  लागली तेव्हा तिची आई म्हणाली, ‘‘वाटलेलंच मला. सारखं सगळे म्हणायचे, कित्ती सुंदर आहे वेदा.. तिला ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये घाला.. हे करा, ते करा.. लोकांची नजर लागली माझ्या मुलीला.’’

‘‘आई, काहीही काय बोलत्येस? डॉक्टरांनी सांगितलं ना, हा पीसीओएस आहे म्हणून. हा लाइफस्टाईल प्रॉब्लेम आहे. मला जरा व्यायाम, खाणंपिणं पाळावं लागेल..’’

‘‘ते तू कर. पण माझं ऐक, एकदा माझ्यासोबत महाराजांकडे चल. ते सिद्धपुरुष आहेत. नक्की यावर उपाय करतील.’’

‘‘आई प्लीज, मी कोणाही भोंदू महाराजाकडे येणार नाहीये. मी पीसीओएसबद्दल नीट वाचतेय सगळं. त्यानुसार मला योग्य वाटेल तेच मी करणार आहे.’’

आई रडकुंडीला येऊन म्हणाली, ‘‘नशीबच फुटकं माझं. एवढी सुंदर मुलगी.. आणि..’’

‘‘सुंदर असणं हे सब्जेक्टिव्ह असतं. मी तेव्हाही सुंदर होते, आत्ताही आहे.’’

‘‘तू स्वत:च आपण सुंदर आहोत असं म्हणून काय उपयोग अगं?’’

‘‘म्हणजे मी तुला लोकांसाठी सुंदर असायला हवंय का? कठीण आहे. आणि लोक काय दोन्ही बाजूंनी बोलतात. तुला तोंडावर सांगत असतील- सुंदर आहे मुलगी; पण मागे म्हणत असतील- खूपच गोरी आहे, नाही? आणि फिगर पण जरा जास्त मेंटेन्ड आहे. आणि आताही बोलत असतील, की किती तोरा होता मुलीच्या सौंदर्याचा! पहा, काय झालं..’’

‘‘पण मुलीच्या जातीला लग्नबिग्न, पोरंबाळं अशा किती गोष्टी असतात अगं. सगळं नीट व्हायला हवं ना. ते काही नाही, आता मी सोळा सोमवारच करते.’’

‘‘आई, प्लीज- बास कर.’’ वेदा ओरडली, ‘‘मी माझा पार्टनर शोधायला समर्थ आहे. आणि नाहीच मिळाला, तर एकटी राहायलाही. तू असं काहीही करणार नाहीयेस. तसं केलंस तर मी हे घर सोडून जाईन कायमची. कळलं?’’ असं म्हणून वेदा तिथून निघून गेली.

नंतर वेदाच्या आईने सोळा सोमवार केले नाहीत, पण वेदाचं सगळं चांगलं व्हावं यासाठी पांढरे बुधवार मात्र केले. अर्थातच वेदाला न सांगता.

आणि खरंच, आईला सांगितल्याप्रमाणे वेदाने आपला जीवनसाथी- अथर्व तिच्यासारखाच निवडला. वेदाने त्याला आपल्या पीसीओएस आजाराची, कदाचित मूल होण्यात अचडणी येतील याबद्दलची सगळी कल्पना आधीच दिली होती आणि मगच त्याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतरही घरच्यांकडून कितीही दबाव येत असला तरी पुरेसा वेळ घेऊन मगच मूल होऊ  देण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला होता.

वेदा तीन महिन्यांची गरोदर झाल्यावर, आणि ही बातमी ‘ऑफिशियली’ सांगितली गेल्यावर लगेचच चंद्रग्रहण होणार होतं. ग्रहणाच्या दोन दिवस आधी नातेवाईकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जेव्हा चंद्रग्रहणात काय काय करून नये याबद्दलचे मेसेजेस खास वेदासाठी पोस्ट होऊ  लागले तेव्हा नेहमीप्रमाणे तिचा संयम सुटला.

खरं तर वेदाला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स- त्यातही नातेवाईकांचे ग्रुप्स तर अजिबातच आवडायचे नाहीत. कारण बऱ्याचदा त्यावर नवरा-बायको यावरचे टिपिकल फॉरवर्डेड जोक्स पोस्ट केले जायचे, नाही तर कसलाही शेंडाबुडखा नसलेल्या किंवा अर्बन लीजंडसारख्या तर्कहीन पोस्ट टाकल्या जायच्या. मध्यंतरी या ग्रुपवर कॅन्सरबद्दलची अशीच एक पोस्ट कोणीतरी टाकली होती. त्यातले काही सल्ले असे होते-

१. कॅन्सर होऊ  नये म्हणून रोज सकाळी कोमट पाणी प्यावं.

२. स्त्रियांनी एकच सॅनिटरी पॅड बारा तास घालू नये. त्याने पॅडला आलेली बुरशी आत जाऊन गर्भाशयाचा कॅन्सर होतो.

३. उन्हात जाताना स्त्रियांनी वक्षांवरून ओढणी घ्यावी, त्याने स्तनांचा कॅन्सर होत नाही. तसंच शक्यतो काळी ब्रा घालू नये.

अर्थातच, हे सगळं वाचून वेदाचा पारा चढला होता. मग तिने ती पोस्ट कशी ‘अनसायंटिफिक’ आहे हे सांगितलं होतं आणि हिरीरीने वाद घालून स्वत:ची प्रतिमा ‘तापट, फटकळ, आक्रस्ताळी’ अशी करून घेतली होती.

वेदाने जेव्हा अथर्वला या पोस्टबद्दल सांगितलं, तेव्हा तो म्हणाला होता, ‘‘कमॉन वेदा, तू किती जणांना विरोध करणारेस? अशा ग्रुप्समध्ये राहायचंच नाही त्यापेक्षा. मी एकाही ग्रुपचा मेंबर नाहीये. यू नो, मला वाटतं, की बऱ्याचदा लोक न वाचता, न समजून घेताच पोस्ट फॉरवर्ड करत असतात. आलं की फॉरवर्ड केलं!’’

‘‘मलाही ग्रुपमधून बाहेर पडावंसं वाटलं पहिल्यांदा. पण नंतर वाटलं, नाही, उलट आपण ग्रुप्समधून बाहेर पडलो तर या लोकांचं आणखीनच फावेल.’’

‘‘पण आपल्या डोक्याला ताप होतो त्याचं काय? आणि आता तर मीपण जाईन. मग कोणाशी शेअर करणार हे तू हे सगळं.. आईशी का सासूबाईंशी?’’ वेदाला हसू आलं आणि मग ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, ‘‘तुला जायलाच हवं का?’’

‘‘यप, शोन्या, हा गेलो नि हा आलो लगेच. म्हणजे डिलिव्हरीला मी इथंच असेन.’’

‘‘तेव्हा नसलास ना तू इथं, तर बघच.. छळ करीन तुझा नंतर बाळाचं शी-शू काढायला लावून!’’

खंडग्रास चंद्रग्रहण..

ग्रहणस्पर्श- २१.४२ , मध्य- २२.१ मोक्ष- २३.९

दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी १.४४ वाजल्यापासून ग्रहण वेधारंभ सुरू होत आहे. तरी बाल, वृद्ध, आजारी व्यक्तींनी आणि गर्भवती भगिनींनी दुपारी अंदाजे ०४.३५ नंतर वेध पाळावेत.

या काळात खालील गोष्टी करू नयेत.

वेधकाळात भोजन करू नये.

गर्भवतींनी स्वयंपाक करू नये. कापू, चिरू नये.

स्नान, जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध करावे.

ग्रहणकाळात गर्भवतींनी घराबाहेर पडू नये.

यूएसमधल्या राधाकाकूने हा मेसेज पोस्ट केला होता आणि त्यात मुद्दाम वेदाला टॅग केलं होतं – @Veda, this msg is specially for you. Pls follow it.

वेदाने विचारलं की, ‘नाही केलं फॉलो, तर काय होईल?’

त्यावर राधाकाकूने आश्चर्याने चकित झालेलं इमोटिकॉन्स टाकलं. पुढे लिहिलं की, ‘अगं, आता तू पुढचे काही महिने खूप काळजी घेतली पाहिजेस. आणि यानिमित्ताने माहेरी जा. मजा कर. ऑर्डर्स सोड आई-बाबांना, सासूबाईंना- हे हवंय, ते हवंय. आत्ताच दिवस आहेत तुझे, घे मजा करून..’ असं म्हणून राधाकाकूने हसणारा आणि मग डोळा मारणारा असे दोन इमोटिकॉन्स टाकले.

वेदाने मात्र आपली तलवार उपसली होती. ती म्हणाली की, ‘राधाकाकू, म्हणजे एकदा मूल झालं की मला काहीही झालं तरी चालेल, असंच म्हणायचंय ना? आणि समजा, मी नसते प्रेग्नंट आणि मला वाटलं असतं की, आज जरा मजा करावी, तर मी आई-बाबांना, आईंना ऑर्डर्स नाही वाटतं सोडू शकत? त्यासाठी मला मूलच काढायला हवं.. हो ना? ’

‘नाही, अगं, तसं नाही,’ असं म्हणत राधाकाकूने सारवासारव केली. ‘वेदा, अगं, काही परंपरा असतात ना, त्या मोठय़ांनी सांगितल्या की पाळायच्या. त्याने काही हार्म होत नाही. समजलं?’

वेदा म्हणाली की, ‘पण तुम्हाला असं का वाटतं, मला हार्म होणार नाहीये ते. मला त्रास होणार आहे, माझ्या मनाला खात राहणार आहे, टोचत राहणार आहे, की मला पटत नसलं तरी मी एक लॉजिकचा आधार नसलेली गोष्ट करते आहे.’

राधाकाकू म्हणाली की, ‘बरं. सॉरी. पण तरी काळजीपोटी वाटलं म्हणून सांगितलं गं तुला.’

वेदा मनातल्या मनात म्हणाली, ‘हं. काढलं यांनी नेहमीप्रमाणे भावनिक हत्यार!  काळजी वाटते म्हणून सांगते गं.’ आज्जीही असंच म्हणायची. आणि आता दोन्ही आयाही अगदी असंच म्हणतात शेवटी आणि समोरच्याला गप्प बसवतात. पण मी नाही गप्प बसणार.

तिने ग्रुपवर पोस्ट केलं, ‘आय अ‍ॅम गोइंग टू प्रूव्ह इट नाउ. ग्रहणात कामं केल्याने काहीही होत नाही. मी कुकिंग करणार. लेट्स सी, काय होतंय!’

यावर ग्रुपमध्ये कोणीच काही बोललं नाही. तर त्यातल्या काहींनी कृतीच केली. त्यांनी वेदाच्या सासूला आणि आई-बाबांना फोन करून वेदाने टाकलेला मेसेज सांगितला. म्हणून मग त्या तिघांनी फोनवर एक ‘कॉन्फरन्स’ घेऊन एक नामी शक्कल लढवली. घरातले सुऱ्या, नेलकटर असल्या गोष्टीच लपवून ठेवायच्या असं ठरवलं!

ग्रहणाच्या दिवशी सकाळी वेदाची सासू नेहमीपेक्षा लवकरच उठली आणि तिने सगळा- अगदी संध्याकाळचाही स्वयंपाक करून टाकला. खरं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी वेदाकडे असायची. वेदाने विचारल्यावर ती हसत हसत म्हणाली, ‘‘अगं, काही नाही, आज सकाळी लवकरच जाग आली. म्हणून म्हटलं, आहे वेळ तर करून टाकू संध्याकाळचंही. असंही संध्याकाळी तुला मळमळतं ना.’’

‘‘बरं ठीके.’’

‘‘तुझी कॉफी पण तयार आहे. फक्त मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचीये.’’ मग ती पुढे म्हणाली, ‘‘अगं, आता थोडय़ा दिवसांनी तू माहेरी जाशील. मग मला करावंच लागेल ना संध्याकाळचंही. म्हणून म्हटलं, आत्तापासूनच सवय करून घ्यावी.’’

आई एवढी स्पष्टीकरणं का देताहेत आपल्याला, असा विचार करत वेदाने अंघोळीसाठी पाणी सोडलं. मग ती बेडरूममध्ये गेली आणि कपाटात काहीतरी शोधू लागली. तिने विचारलं, ‘‘आई, नेलकटर कुठे गेलं इथलं?’’

सासू म्हणाली, ‘‘अं.. नेलकटर ना- माहीत नाही. असेल ना तिथंच.’’ पण तिच्या हावभावावरून वेदाला काहीतरी गडबड असल्याचं समजलं. तिने विचारलं, ‘‘आई, काय चाल्लंय? नेलकटर द्या मला. नखं कापायचीयेत. ऑफिसला जायचंय. उशीर होतोय.’’

‘‘वेदा, एक विनंती करते. आज हाफ डेने येशील?’’

‘‘का हो? काही काम आहे का?’’

‘‘नाही, ग्रहण आहे ना आज. ते दुपारनंतर लागतंय. त्याच्या आत तू घरी असलेलं चांगलं..’’

‘‘आई, काय बोलताय तुम्ही? घराच्या काचाबिचा सगळं लावून घेणार आहात की काय? प्लीज, मला नेलकटर द्या. उशीर होतोय.’’

सासू थोडं दबकत म्हणाली, ‘‘पण उद्या नखं कापली तर चालणार नाही का? ग्रहणात कापलेलं चांगलं नाही.’’

‘‘ओ गॉड! म्हणजे म्हणून तुम्ही सकाळी उठून सगळं केलंत,’’ असं म्हणून वेदा आतल्या खोलीत गेली आणि तिने अथर्वला फोन लावला. मग ती बराच वेळ दार लावून त्याच्याशी बोलत होती. अथर्व कामानिमित्ताने काही महिने दुबईला गेला होता. त्याने आपल्या आईला फोन करून समजावलं. वेदा अंघोळ करून, आवरून जेव्हा हॉलमध्ये गेली तेव्हा तिला खुर्चीवर बसलेली, खिडकीबाहेर कुठेतरी एकटक पाहणारी आणि मुसमुस रडणारी सासू दिसली. रडत असल्याने तिचं शरीर गदगदत होतं. ती काहीतरी पुटपुटत होती, ‘‘माझंच चुकलं. काळजी वाटते म्हणून केलं. आता माझा मुलगाही मला बोलायला लागला. हो, आहे मी अंधश्रद्धाळू! काय करणार? टाकून द्या मला एकटीला. द्या टाकून.’’

वेदा त्यांना जवळ घेऊन थोपटत म्हणाली, ‘‘आई, अहो, एवढं टोकाला कशाला जाताय? तुम्ही खूप चांगल्या सासूबाई आहात. खरंच. पण एक सांगू का, मला तुम्ही जे म्हणताय ना, त्यातलं काहीही पटत नाही. आपण शाळेत शिकलोय की नाही, ग्रहण कसं होतं, ते. मग शिकून फायदा काय?’’

‘‘तुझं म्हणणं पटतंय मला वेदा, पण तरी भीती वाटत राहते. काही झालं तर.. त्यापेक्षा पाळलं एक दिवस तर काय होणारेय?’’

त्यावर वेदाला ‘अपोकॅलिप्टो’ सिनेमा आठवला. त्यात आदिवासी ग्रहणाच्या दिवशी नरबळी देतात. ग्रहण लागायच्या आधीपासून एकेकाचा बळी द्यायला सुरुवात होते. ग्रहण लागतं, सगळीकडे अंधार पसरतो आणि सगळे जण घाबरतात. त्यांना वाटतं, सूर्यदेव आपल्यावर कोपला आहे, आता आपण मरून जाणार आहोत. मग त्यांचा पुजारी देवाला साकडं घातलो. आम्ही तुला बळी दिले आहेत, आता आम्हाला वाचव, असं आवाहन करतो आणि काही मिनिटांत ग्रहण सुटल्याने पुन्हा प्रकाश फाकतो. सगळे जण आनंदाने किंचाळतात. पुजारी जगाचा विनाश टळला असं घोषित करतो. आदिम काळापासून आपल्या मनात असलेली ही भीती आजही टेक्सॅव्ही माणसाच्या मनात तशीच आहे असं वेदाला वाटलं.

ऑफिसमध्ये गेल्या गेल्या वेदाच्या एका कलीगने- विंदपाजीने जेव्हा ‘आज कुछ काँटाबिटा तो नहीं?’ असं वेदाला जेव्हा विचारलं, तेव्हा तर तिला काहीच बोलावंसं वाटेना. विंदपाजीचं खरं नाव ‘हरविंदर’ होतं. तो दिल्लीचा होता आणि नोकरीसाठी पुण्यात स्थलांतरित झाला होता. पंजाबी असल्याने सगळेजण त्याला ‘विंदपाजी’ अशी हाक मारायचे.

वेदाने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत विचारलं, ‘‘क्यूँ?’’

‘‘अरे, भई, तुझे पता नहीं क्या, आज वो ग्रहण है ना.’’

‘‘तो?’’

‘‘मेरी वाइफ बोली की, वेदाजी को बोलिये आज कुछ काटेबिटे मत. उसकी एक आँटी है, उसकी लडकी ने गलती से ग्रहण में सब्जीवब्जी काटी और क्या हुआ पता है- उसे जो लडका हुआ ना, उसका उपर का होट फटा हुआ निकला यार.’’

‘‘या ग्रहणामुळे माझं डोकं कामातून जाणार आज बहुतेक..’’ वेदा म्हणाली.

विंदपाजीला जेमतेमच मराठी येत असल्याने तो तिच्याकडे नुसताच पाहत राहिला. मग वेदा म्हणाली, ‘‘देख विंद, स्त्री रहती है ना, उसके पास अंडे होते है, और पुरुष के पास शुक्राणू. स्पम्र्स. तो होता क्या है, मिलियन्स शुक्राणू अंडे को मिलने जाते है, और मीलन में एकही स्पर्म एक अंडेसे मिलता है और फलन होता है. और वो जब होता है, उसी वक्त बच्चा कैसा होगा, लडका होगा या लडकी, वो कैसा दिखेगा, काला होगा या गोरा, उसे कोई ‘हेरेडिटरी’ बीमारी होगी क्या, ये सब तय होता है. समझा? इट्स लाइक प्रोग्रॅमिंग.’’ प्रत्येक वाक्याबरोबर वेदाचा आवाज चढत जात होता. त्यामुळे ऑफिसातले सगळेजण तिच्याकडे पाहत होते. शेवटी टिपेच्या आवाजात ती म्हणाली, ‘‘और जो कटा हुआ होट है ना, उसे ‘क्लेफ्ट लिप’ कहते है. वो एक डिफॉर्मिटी है. उसका और ग्रहण का कोई संबंध नहीं है.. प्लीज गूगल इट..’’

०००

‘‘ए वेदा..’’ आईच्या आवाजाने वेदाची तंद्री भंगली. आई म्हणाली, ‘‘चल, उठून तयार हो. डॉक्टरीणबाई आल्यात. सोनोग्राफीला घेऊन जायला नर्स येतेय. चल.’’ असं म्हणून आई पुन्हा वेदाच्या सासूशी बोलू लागली. अर्धवट ग्लानीत असलेल्या वेदाला ऐकू आलं-

‘‘तुम्हाला उगाच टेन्शन नको म्हणून मी काही बोलले नाही. वेदा-अथर्वलाही मी चुगली करतेय असं वाटलं असतं. पण त्या दिवशी रात्री टीव्ही पाहता पाहता मला झोप लागली. तेव्हा वेदा हळूच गेली ना हो गच्चीवर. ग्रहण पाहायला. बरं झालं, मला जाग आली आणि मी लगेच वर गेले म्हणून. नाहीतर..’’

तेवढय़ात वेदाच म्हणाली, ‘‘शिट्! पण काही दिसलंच नाही. ढगच होते नुसते.’’

आई म्हणाली, ‘‘अगं, काय बाई आहेस का कोण आहेस तू? स्वत:चा जाऊ  दे, पण पोटातल्या या गोळ्याचा तरी विचार कर जरा आता.. आई जगदंबे, माफ कर गं. तूच होतीस म्हणून थोडक्यात निभावलं गं..’’ असं म्हणत वेदाची आई डोळे मिटून काहीतरी पुटपुटू लागली.

वेदा म्हणाली, ‘‘आई, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं. आणि ते शोधलं की सापडतं. आज मला जे ब्लीडिंग झालं ना, त्यामागेही काहीतरी कारण असणार बघ. कळेलच आता आपल्याला.’’

‘‘हाय! हाऊ आर यू वेदा?’’ डॉक्टरने हसत हसत वेदाचं केबिनमध्ये स्वागत केलं. तिच्यासमोर नर्सने रिपोर्ट्स ठेवले.

‘‘फाइन. सकाळपेक्षा खूपच बरं वाटतंय.’’ वेदा म्हणाली.

‘‘दॅट्स गुड. ब्लीडिंग झालं का परत?’’ डॉक्टरने रिपोर्ट्स पाहत विचारलं.

‘‘नाही झालं. अगदी फिकट स्पॉट्स होते. पण सकाळसारखं नाही झालं.’’

‘‘ओके. वेदा, रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. बेबीही नीट आहे. सकाळी मी पाहिलं तेव्हा हार्टबीट व्यवस्थित होते. पण तरी सोनोग्राफी करून आपण सगळं नीट आहे ना, हे एकदा कन्फर्म करून घेतलंय. नथिंग टू वरी अबाऊट.’’

‘‘व्वा, बरं झालं. आई जगदंबेनं ऐकलं माझं.’’ वेदाची आई म्हणाली आणि सासूबाईंनी डोळे मिटून हात जोडले.

डॉक्टर म्हणाल्या, ‘‘काकू, डोन्ट वरी. बाळाला काहीही झालेलं नाहीये.’’

‘‘पण डॉक्टर, हे ब्लीडिंग कशामुळे झालं? त्यामागचं कारण काय?’’ असं म्हणून वेदाने तिच्या आईकडे आणि सासूकडे पाहिलं. तिला वाटलं, आता कारण उघड होईल आणि आपण जिंकू. ती किंचित हसली. तिने पुढे विचारलं, ‘‘मी विचारतेय, कारण या दोघींना वाटतंय, मी ग्रहण न पाळल्याने, आणि ते पाहायला गेल्याने हे सगळं घडलंय.’’

डॉक्टर हसत म्हणाल्या, ‘‘वेदा, आम्ही डॉक्टर्स नेहमी असं म्हणतो की, मेडिकल सायन्सला आत्ता कुठे माणसाच्या शरीराचा इतकुसा भाग समजू लागलाय. सो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. आम्ही याला ‘थ्रेटन्ड मिसकॅरेज’ असं म्हणतो.’’ डॉक्टर थांबली आणि पुढे जे म्हणाली, त्यामुळे वेदा एकदम सुन्न झाली.

‘‘सॉरी, मला तुम्हा कोणाच्याही श्रद्धा दुखवायच्या नाहीयेत. बट आय डोन्ट नो व्हाय धिस अकर्ड.’’

वेदाला तेव्हा खरोखरीच गर्भगळीत झाल्यासारखं वाटलं.
प्रणव सखदेव

First Published on March 26, 2018 12:55 pm

Web Title: story of a pregnant woman